‘स्कूल कनेक्ट अभियाना’स विद्यार्थी, पालकांचा उत्तम प्रतिसाद
शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित स्कूल कनेक्ट अभियानात मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. |
कोल्हापूर, दि. ९ मे: शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय
शैक्षणिक धोरण-२०२०ची यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यात येत असून या धोरणाच्या
अनुषंगाने येत्या शैक्षणिक वर्षापासून बारावीनंतर पदवी स्तरावरील अनेक अद्यावत आणि
महत्त्वाचे नवे अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू करण्यात येत आहेत. या अभ्यासक्रमांना
प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांनी आपली उज्ज्वल कारकीर्द घडविण्याच्या दिशेने वाटचाल
करावी, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे
केले.
शिवाजी विद्यापीठातर्फे
सन २०२४-२५ पासून बारावीनंतरचे अनेक पदवीस्तरीय अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत.
त्या अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी विद्यापीठाने आज दसरा चौकातील राजर्षी शाहू
स्मारक भवन येथे विशेष ‘स्कूल कनेक्ट अभियाना’चे आयोजन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरू डॉ. शिर्के
बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाला
इच्छुक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठामध्ये बहुतांश अभ्यासक्रम हे पदव्युत्तर स्तरावरील आहेत. महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठात प्रवेश घेता येत असे. काही वर्षांपूर्वीपासून विद्यापीठात बी.टेक. अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम तंत्रज्ञान अधिविभागात सुरू आहेत. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना नामांकित अभियांत्रिकी व सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये उत्तम पॅकेजच्या रोजगार संधी उपलब्ध झालेल्या आहेत. स्कूल ऑफ नॅनो-सायन्स अँड टेक्नॉलॉजीअंतर्गत बी.एस्सी.-एम.एस्सी. नॅनोसायन्स (पाच वर्षे एकात्मिक) अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. या दोन्ही अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. नॅनो-सायन्सचे तर अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण पूर्ण करून आता परदेशामध्ये पीएच.डी. संशोधनासह विविध आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पांवर काम करीत आहेत. आता त्यापुढे जाऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० अंतर्गत शिवाजी विद्यापीठ नवीन व अद्यावत अभ्यासक्रम सुरू करीत आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून बारावीनंतरचे बी.ए. स्पोर्ट्स, बी.ए. फिल्म मेकिंग, बी.कॉम. बँकिंग अँन्ड फायनान्स, बी.एस्सी.-एम.एस्सी. इकॉनॉमिक्स (पाच वर्षे एकात्मिक), बी.सी.ए., बी.एस्सी.-एम.एस्सी. (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग), बी.एस्सी.-बी.एड. (चार वर्षे एकात्मिक) आणि एम.बी.ए. (एकात्मिक चार वर्षे) हे अभ्यासक्रम सुरू करीत आहे. विद्यापीठाच्या ऑनलाईन व दूरस्थ शिक्षण केंद्रामार्फतही ऑनलाईन एम.बी.ए. सह इतरही अनेक महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. या अभिनव अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठात प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांनी आपले भवितव्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह डॉ. किरणकुमार
शर्मा (बी.एस्सी.-एम.एस्सी.-नॅनोसायन्स व तंत्रज्ञान), डॉ. कविता ओझा (बी.सी.ए.
आणि बी.एस्सी.-एम.एस्सी. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग), डॉ. शिवलिंगप्पा
सपली (बी.टेक.), डॉ. चेतना सोनकांबळे (बी.एस्सी.-बी.एड.), डॉ. विद्या कट्टी
(बी.एस्सी.-एम.एस्सी. इकॉनॉमिक्स), डॉ. शिवाजी जाधव (बी.ए. फिल्म मेकिंग), डॉ. शरद
बनसोडे (बी.ए.-स्पोर्ट्स), डॉ. आण्णासाहेब गुरव (बी.कॉम. बँकिंग अँड फायनान्स) व
एम.बी.ए. (४ वर्षे एकात्मिक) आणि डॉ. डी.के. मोरे यांनी ऑनलाईन व दूरस्थ शिक्षण
केंद्राच्या बी.ए. व बी.कॉम. अभ्यासक्रमांबाबत माहिती देऊन शंकासमाधान केले.
कार्यक्रमात सुरवातीला
मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांनी स्वागत व
प्रास्ताविक केले. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण
महाजन आणि विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार यांनी
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० या अनुषंगाने उपस्थितांना अवगत केले. अभिजीत लिंग्रस
यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment