Thursday, 16 May 2024

शिवाजी विद्यापीठ सीमावासीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कटिबद्ध

 विद्यापीठाच्या सवलत योजनाविषयक कार्यशाळांना सीमाभागात उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवाजी विद्यापीठाच्या विशेष सवलत योजनेची माहिती देण्यासाठी बेळगाव येथे आयोजित कार्यशाळेप्रसंगी विद्यापीठाच्या समिती सदस्यांसमवेत उपस्थित विद्यार्थी, पालक आणि नागरिक.

शिवाजी विद्यापीठाच्या विशेष सवलत योजनेची माहिती देण्यासाठी बेळगाव येथे आयोजित कार्यशाळा संपल्यानंतरही अधिक माहिती जाणून घेण्यासाठी विद्यार्थी, पालकांनी विद्यापीठाच्या समिती सदस्यांभोवती गर्दी केली. 


कोल्हापूर, दि. १६ मे: हीरकमहोत्सवी शिवाजी विद्यापीठ आपल्या स्थापनेपासूनच दक्षिण महाराष्ट्रासह सीमावर्ती उत्तर कर्नाटकातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास विद्यापीठाच्या विशेष समितीने सीमावासियांना दिला.

कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या संकल्पनेतून शिवाजी विद्यापीठाने गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत योजना राबविण्यास सुरवात केली आहे. या योजनेची माहिती सीमाभागातील नागरिकांना देण्यासाठी विद्यापीठाने विशेष समिती स्थापन केली आहे. या समितीने ९ मे ते १४ मे २०२४ या कालावधीत सीमाभागातील विविध ठिकाणी विशेष कार्यशाळा घेऊन शिक्षक, विद्यार्थी, पालकांसह नागरिकांना या योजनेविषयी अवगत केले. या कार्यशाळांना सीमावासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे १५० ते २०० विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याबाबत पसंती दर्शविली आहे.

या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील ८६५ गावांतील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठाने शैक्षणिक प्रवेशाबाबत विशेष सवलत योजना जाहीर केली आहे. याअंतर्गत अनुदानित अभ्यासक्रमांमध्ये १० टक्के राखीव जागा तसेच या जागांमधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आले आहे. विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी सीमावासीय वि्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क २५ टक्के माफ करणेत आले आहे. या योजनेद्वारे विद्यापीठात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना  वसतिगृह सुविधा निश्चितपणे दिली जाईल. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. अर्थात वसतिगृह सुविधा मोफत असेल. अशी योजना राबवणारे शिवाजी विद्यापीठ महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ आहे.

विद्यापीठ प्रशासनाने या योजनेचा सीमाभागात प्रचार, प्रसार आणि अंमलबजावणी प्रभावीपणे केल्यामुळे पहिल्या वर्षी ४४, तर गेल्या वर्षी ८८ अशा एकूण १३२ विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यंदाही सदर योजनेची माहिती देण्यासाठी निपाणी येथील देवचंद महाविद्यालय (दि. ९ मे), भालकी येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालय (दि. १३ मे), खानापूर येथील शिवस्मारक आणि बेळगाव येथील संत तुकाराम सांस्कृतिक सभागृह (दोन्हीकडे दि. १४ मे) या ठिकाणी कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाच्या योजनेची माहिती देण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीमध्ये डॉ. प्रकाश पवार, डॉ. जगन कराडे, प्रा. उदय पाटील डॉ. संतोष सुतार, डॉ. कविता वड्राळे आणि डॉ. नवनाथ वळेकर यांचा समावेश होता. सर्व समिती सदस्यांनी योजनेविषयीची माहिती देऊन उपस्थितांच्या शंकांचे समाधानही कार्यशाळांमध्ये केले. या सर्व ठिकाणी असणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी कार्यशाळांत उत्स्फूर्त सहभाग घेऊन कार्यशाळांच्या व योजनेच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले. विद्यार्थी, पालकांसह नागरिकांचाही मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यशाळांना लाभला.

शिवाजी विद्यापीठासह कोल्हापूरवासीय नागरिक नेहमीच सीमावासियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. विद्यापीठाच्या या योजनेमुळे विद्यार्थी व पालकांची होणारी शैक्षणिक कुचंबणा थांबेल. त्यांना उच्चशिक्षणाच्या आणि करिअरच्या विविध संधी प्राप्त होतील, अशी भावना कार्यशाळांना उपस्थित नागरिकांनी समिती सदस्यांशी बोलताना व्यक्त केली.

No comments:

Post a Comment