Tuesday 21 May 2024

‘कॉमेलिनेसी ऑफ इंडिया’ संदर्भग्रंथाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन

 

शिवाजी विद्यापीठात 'कॉमेलिनेसी ऑफ इंडिया' या संदर्भग्रंथाचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. मयूर नंदीकर, डॉ. रितेश कुमार चौधरी, डॉ. एस.आर. यादव आणि डॉ. राजाराम गुरव.


कोल्हापूर, दि. २१ मे: ‘कॉमेलिनेसी ऑफ इंडिया हा संदर्भग्रंथ वनस्पतीशास्त्राच्या भावी संशोधकांसाठी एक महत्त्वाचा ठेवा आहे. अशा प्रकारचे संशोधन व संदर्भसंचय आपल्या हातूनही व्हावा, यासाठीची प्रेरणा वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासक व संशोधकांनी यापासून घ्यावी, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. राजाराम गुरव आणि डॉ. मयूर नंदीकर यांनी अनेक वर्षांच्या परिश्रमातून संयुक्तपणे सिद्ध केलेल्या कॉमेलिनेसी ऑफ इंडिया अर्थात केना कुळातील भारतीय वनस्पती या महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथाचे प्रकाशन अधिविभागाच्या नीलांबरी सभागृहात नुकतेच करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते. कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह एमेरिटस संशोधक प्राध्यापक डॉ. एस. आर. यादव आणि पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. रितेश कुमार चौधरी यांच्या हस्ते या ग्रंथाचे अनावरण करण्यात आले.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, सन २०१३मध्ये पीएच.डी.चे संशोधन पूर्ण केल्यानंतरही या विषयातील संशोधन जारी ठेवून डॉ. मयूर नंदीकर आणि त्यांचे मार्गदर्शक डॉ. राजाराम गुरव यांनी एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला. त्यांच्या या समर्पणवृत्तीमुळेच वनस्पतीशास्त्राच्या एका शाखेमधील महत्त्वाचा संदर्भग्रंथ साकार झाला. अशा प्रकारच्या संशोधनासाठी खूप संयम लागतो तसेच वेळही द्यावा लागतो. त्याखेरीज भरीव असे संशोधन साकारणे अशक्य आहे, याची जाणीव ठेवून नवसंशोधकांनी आपल्या संशोधनकार्याला दिशा द्यावी, असेही त्यांनी सांगितले. यापुढील काळातही वनस्पतीशास्त्र अधिविभागातील संशोधकांकडून उत्तमोत्तम संशोधन साकारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ. रितेश कुमार चौधरी म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागातील संशोधकांनी वनस्पतीशास्त्राच्या संशोधनात, विशेषतः पश्चिम घाटावरील वनस्पतींच्या वेगवेगळ्या प्रजातींविषयी संशोधन, संवर्धन या अनुषंगाने मोलाचे योगदान दिले आहे. या परिसरातील संशोधनामध्ये मलाही काही वाटा उचलता आला, याचे समाधान वाटते. डॉ. एस.आर. यादव यांनी तर ग्रासेस ऑफ महाराष्ट्र या ग्रंथाच्या रुपाने अमूल्य संशोधकीय ठेवा निर्माण करून ठेवला आहे. त्याच संशोधकीय परंपरेतून डॉ. गुरव व नंदीकर यांचा संदर्भग्रंथ साकारला आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

डॉ. मयूर नंदीकर यांनी संदर्भग्रंथाची प्रस्तुतता आणि त्याचा प्रकाशनापर्यंतचा १५ वर्षांचा प्रवास सांगितला. ते म्हणाले, पारंबी प्लांट रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या या ग्रंथात आफ्रिका आणि आग्नेय आशियातील १३१ प्रजातींसह भारतातील कोमेलिनेसी कुटुंबातील विविध प्रजातींची टीपांसह माहिती दिली आहे. त्यांची छायाचित्रे, रेखाचित्रे आणि आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN) यांनी दर्शविलेल्या धोक्याचे मूल्यमापन आहे. निसर्ग संवर्धनवादी, वनस्पतिशास्त्राचे विद्यार्थी आणि वनस्पतीप्रेमींसाठी म्हणून ते महत्त्वाचे ठरते. स्कॉटिश वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. हेन्री नॉल्टी (रॉयल बोटॅनिक गार्डन एडिनबरा) यांची प्रस्तावना ग्रंथास लाभली आहे, हेही याचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. राजाराम गुरव यांनी या ग्रंथाच्या निर्मिती प्रक्रियेविषयी माहिती दिली. ते म्हणाले, सन १८७९मध्ये ब्रिटीश अभ्यासक आल्फ्रेड यंग यांनी पश्चिम महाराष्ट्रातून या प्रजातींमधील काहींचे संकलन केले होते आणि त्यांची माहिती ब्रिटीश म्युझियममध्ये होती. ही माहिती आजवर कधीही प्रकाशात आली नव्हती. डॉ. नंदीकर यांच्या संशोधनाद्वारे आणि आता या ग्रंथाद्वारे ती माहिती वनस्पतीशास्त्रांना उपलब्ध झाली आहे, ही फार मोठी उपलब्धी असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. मनोज लेखक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. घाणे यांनी आभार मानले.

 

संदर्भग्रंथाची वैशिष्ट्ये:

   प्रख्यात ब्रिटीश वनस्पतीशास्त्रज्ञ सी. बी. क्लार्क यांच्या १८८१मधील कॉमेलिनेसीवरील मोनोग्राफनंतरचे महत्त्वाचे ठळक कार्य.

   १२ नवीन नावे आणि प्रजाती

   १३ नवीन समानात्म प्रजाती

   १०८ द्विपदींचे (Binomial) वर्गीकरण

   १३१ नावांसाठी ५१६ द्विपदींची नोंद

   केना कुळातील वनस्पती त्यांची प्रदेशनिष्ठता आणि ओळख

   गुणसूत्रांची संख्या निश्चितीकरण

   १०० पेक्षा जास्त रेखाचित्रे आणि छायाचित्रे

   या लेखनासाठी जगभरातील ५० हू अधिक पादपालयाचा (herbaria) अभ्यास. त्यात लंडनचे ब्रिटिश म्युझिअम कीव, इंग्लंड यांचा समावेश. 

No comments:

Post a Comment