Thursday, 6 June 2024

शिवाजी विद्यापीठातील शिवराज्याभिषेक दिनाची प्रभात मंगलमय

 शिवशाहीर डॉ. राजू राऊत यांच्या सादरीकरणासह विविध उपक्रमांना उत्साही प्रतिसाद

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यास अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासमवेत (डावीकडून) डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. महादेव देशमुख, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. प्रकाश गायकवाड, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. रामचंद्र पवार, डॉ. सागर डेळेकर, डॉ. सरिता ठकार आणि डॉ. सुहासिनी पाटील.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठातर्फे काढण्यात आलेल्या शिवज्योत प्रभातफेरीमध्ये सहभागी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आदी.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठातर्फे काढण्यात आलेल्या शिवज्योत प्रभातफेरीमध्ये सहभागी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित मर्दानी खेळ सादरीकरणामध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनाही सामावून घेण्यात आले.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात मर्दानी खेळ सादरीकरण आयोजित करण्यात आले.


शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात 'शिवकीर्ती' हा स्वरचित पोवाडा व भूपाळी सादर करताना प्रख्यात शिवशाहीर डॉ. राजू राऊत.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात 'शिवकीर्ती' हा स्वरचित पोवाडा व भूपाळी सादर करताना प्रख्यात शिवशाहीर डॉ. राजू राऊत.


कोल्हापूर, दि. ६ जून: शिवाजी विद्यापीठात आज शिवराज्याभिषेक दिन अत्यंत उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांसह राजमाता जिजाऊ साहेब यांना अभिवादन, ज्येष्ठ शाहीरांचे पोवाडे, शिवज्योत प्रभातफेरी आणि मर्दानी खेळांचे प्रदर्शन आदी उपक्रमांमुळे आज विद्यापीठातील सकाळ मंगलमय झाली.

शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यास कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुष्प वाहून अभिवादन केले. आजच्या मंगलदिनाच्या पार्श्वभूमीवर या पुतळ्यास अत्यंत आकर्षक विद्युतरोषणाई आणि फुलांच्या माळांची आरास करण्यात आली होती. या प्रसंगी संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीत सादर केले. यानंतर कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या नेतृत्वाखाली पुतळ्यापासून विद्यापीठ परिसरातून शिवज्योत प्रभातफेरी काढण्यात आली. मुख्य प्रशासकीय भवन इमारतीसमोर फेरीची सांगता करण्यात आली.

त्यानंतर मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर मान्यवरांच्या उपस्थितीत मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. शिवाजी पेठेतील मर्दानीराजा सुहासराजे ठोंबरे आखाडा व श्री खंडोबा-वेताळ तालीम मर्दानी खेळ पथक यांनी शाहीर मिलींदा सावंत, कृष्णात ठोंबरे, वस्ताद आनंदराव ठोंबरे, किरण जाधव आणि त्यांच्या आबालवृद्ध सहकाऱ्यांनी हे सादरीकरण करून उपस्थितांना खिळवून ठेवले.

विद्यापीठातील आजच्या शिवराज्याभिषेक दिनाचे मुख्य आकर्षण म्हणजे ज्येष्ठ शिवशाहीर डॉ. राजू राऊत यांचे पोवाडा सादरीकरण होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये शिवकीर्ती हा अत्यंत श्रवणीय पोवाडा आणि शिवराज्याभिषेक दिनाची स्वरचित भूपाळी व शिव-पसायदान शाहीर डॉ. राऊत यांनी त्यांच्या खास शैलीत आणि आधुनिक डिजीटल उपकरणांच्या साथीने सादर करून उपस्थितांना सुमारे तासभर मंत्रमुग्ध करून सोडले. त्यांना अजित आयरेकर आणि महेश ऊर्फ राजू पाटील यांची साथ लाभली. यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते डॉ. राऊत आणि त्यांच्या साथीदारांचा शाल व ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमानंतर शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संग्रहालयामध्ये राजमाता जिजाऊ साहेब यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजिस केंद्राचे संचालक व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. सागर डेळेकर यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी विकास विभाग आणि संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग यांनी कार्यक्रमांचे संयोजन केले. डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment