Friday, 7 June 2024

पल्लवी कोरगांवकर यांच्याकडून विद्यापीठास

व्याख्यानमालेसाठी एक लाखाचा वाढीव निधी

 

उद्योजिका पल्लवी कोरगांवकर यांनी कै. प्रभाकरपंत कोरगांवकर व्याख्यानमालेसाठी एक लाख रुपयांचा धनादेश कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे सुपूर्द केला. सोबत कुलसचिव डॉ. विलास शिंदे.

कोल्हापूर, दि. ७ जून: शिवाजी विद्यापीठाच्या कै. प्रभाकरपंत कोरगांवकर स्मृती व्याख्यानमालेसाठी कोरगांवकर उद्योग समूहाच्या प्रमुख पल्लवी कोरगांवकर यांनी एक लाख रुपयांच्या वाढीव रकमेचा धनादेश कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे सुपूर्द केला.

शिवाजी विद्यापीठातर्फे उच्चशिक्षणाच्या बरोबरीने सामाजिक प्रबोधनाचा भाग म्हणून विद्यापीठ निधीतून तसेच विविध व्यक्ती, संस्था यांच्या देणगीमधून एकूण ३८ व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. कोल्हापूर येथील श्री. गोविंदराव कोरगांवकर धर्मादाय संस्था यांनी सन १९८९मध्ये शिवाजी विद्यापीठास २५ हजार रुपयांची देणगी दिली होती. त्या देणगीमधून कै. प्रभाकरपंत कोरगांवकर स्मृती व्याख्यानमालाविद्यापीठात सुरू करण्यात आली. या व्याख्यानमालेअंतर्गत ज्येष्ठ विचारवंत य.दि. फडके, प्रा. ग.प्र. प्रधान, प्रा. राम शेवाळकर, मेधा पाटकर, माजी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, ज्येष्ठ पत्रकार जगन फडणीस, माधव गडकरी, अशोक जैन, प्रा. एन.डी. पाटील, अविनाश धर्माधिकारी, शाम मानव, बाळासाहेब भारदे, मधु दंडवते, डॉ. नरेंद्र दाभोळकर, प्रकाश बाळ, आण्णा हजारे, डॉ. अरूण निगवेकर, डॉ. अनिल अवचट आदी अनेक नामवंत मान्यवरांनी अविस्मरणीय व्याख्याने दिली आहेत.

काळानुरुप बँकांच्या व्याजदराचे घटलेले दर आणि व्याख्यानमालेवरील वाढता खर्च यांचे व्यस्त प्रमाण लक्षात घेऊन श्रीमती कोरगावकर यांनी व्याख्यानमाला सुरळीत सुरू राहण्यासाठी वाढीव निधी देण्याचे ठरविले होते. त्यानुसार त्यांनी नुकतीच कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एक लाख रुपयांच्या वाढीव निधीचा धनादेश सुपूर्द केला. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी कोरगावकर यांना विद्यापीठ परिवाराच्या वतीने धन्यवाद दिले. कोरगावकर उद्योग समूह आणि कोरगावकर ट्रस्ट यांनी आपला सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा अव्याहतपणे सांभाळलेला असल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गारही काढले.

यावेळी श्रीमती कोरगावकर यांना ग्रंथभेट देऊन कुलगुरू डॉ. शिर्के यांनी त्यांचा गौरव केला. कुलसचिव डॉ. विलास शिंदे, भारत शास्त्री या प्रसंगी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment