कोल्हापूर, दि. २५ जून: तांत्रिक नाविन्यता
अतिशय जागरूकतेने राबविण्याचे धोरण स्वीकारणारे देशच महासत्ता म्हणून पुढे येऊ शकतात.
त्यामुळे, भारतामध्ये तांत्रिक नाविन्यता निर्माण होणे आवश्यक
आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्र अधिविभागाच्या
निवृत्त प्राध्यापिका डॉ.उत्तरा सहस्त्रबुद्धे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या
राज्यशास्त्र अधिविभागामार्फत आयोजित डॉ. अंजली पाटील स्मृती व्याख्यानमालेत 'महासत्तांचा
उदय व अस्त' या विषयावर डॉ.सहस्त्रबुध्दे प्रमुख वक्त्या म्हणून
बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के होते. प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद
पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.सहस्त्रबुद्धे
म्हणाल्या, कोणत्याही देशाचे ध्येय,
उद्दीष्ट गाठण्यासाठी त्या देशाची लष्करी आणि आर्थिक क्षमता वाढविणे
आवश्यक असते. ध्येय आणि
क्षमता यांची सांगड म्हणजे त्या-त्या देशाची सत्ता होय. एखाद्या देशाची फक्त आर्थिक
क्षमता चांगली असूनही त्यांच्याकडे सक्षम लष्करी सामर्थ्य नसेल तर तो देश महासत्ता
म्हणून ओळखला जाऊ शकत नाही. देशाचे भौगोलिक स्थानही फार महत्त्वाचे असते. भारताच्या भौगोलिक रचनेमध्ये आपला
देश हिंदी महासागराच्या जवळ आहे. सौम्य सत्ता कोठेही दाखविता येऊ शकत नाही. परंतु,
त्याचा प्रभाव पडू शकतो. लष्करी आणि आर्थिक क्षमतेचे योग्य संतुलन राखणारा
देश महासत्ता होऊ शकतो. यातील दोन्हीपैकी एकाचा ऱ्हास झाल्यास संतुलन बिघडू शकते. इंग्लंड
आणि फ्रान्स एकोणीसाव्या शतकातील मध्यापासून युरोपातील मोठे देश होते. पहिल्या आणि
दुसऱ्या महायुद्धामुळे त्यांची आर्थिक क्षमता खचली. त्यांनी त्यांचे लष्करी सामर्थ्य
युद्धकाळात टिकवून न ठेवल्यामुळे त्यांची महासत्ता ही ओळख टिकू शकली नाही. शीतयुद्धाच्या
काळात अमेरिका आणि सोविएट युनियन मोठी सत्ता होती. सोविएट युनियनचे पुढे विघटन होऊन
ऱ्हास झाला. त्यांचे अर्थकारण बिघडलेले होते आणि ते रूळावर आणण्यामध्ये त्यांना यश
आलेले नाही. एकविसाव्या शतकामध्ये तीन मोठ्या सत्तांचा उदय होण्यास सुरूवात झाली. यामध्ये
प्रामुख्याने रशिया, भारत आणि चीन हे देश. चीन हा देश महासत्ता
होईल, असे दिसून येते. रशिया, चीन आणि भारत या देशांचा विचार
करताना नकाशाकडे पाहिले तर एका अर्थाने आशियाचा उदय होत आहे. अमेरिका महासत्ता म्हणून
पुढे येऊन कामे करीत असला तरी भारत, रशिया आणि चीन या देशांचा
भविष्यकालीन महासत्ता म्हणून उदय होत आहे.
उच्च तंत्रज्ञान आणि सातत्याने नाविन्याचा ध्यास घेणारे देशच
महासत्ता होऊ शकतात, हे अमेरिकेच्या उदाहरणावरुन लक्षात घ्यायला हवे.
अध्यक्षीय मनोगतात
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, महासत्ता होण्याचे देशाचे स्वप्न साकार करण्याची मोठी जबाबदारी शैक्षणिक संस्था
आणि युवा वर्गावर आहे. चीन आणि रशियाच्या भौगोलिक परिस्थितीपेक्षा भारताची भौगोलिक
परिस्थिती उजवी आहे. या माध्यमातून, आंतरराष्ट्रीय धोरण अभ्यास
करण्याची मोठी संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेली आहे.
याप्रसंगी, प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
राज्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ.प्रकाश पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
डॉ. नेहा वाडेकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. अक्षय जहागीरदार यांनी सूत्रसंचालन
केले, तर डॉ. जयश्री कांबळे यांनी आभार मानले.
यावेळी, डॉ.अंजली पाटील यांच्या ज्येष्ठ भगिनी श्रीमती विजयमाला
देसाई, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ.भारती पाटील,
ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, दशरथ पारेकर,
विद्यार्थी, शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
-----
No comments:
Post a Comment