शिवाजी विद्यापीठातर्फे महाराजांच्या रोजनिशीच्या अनुवादासह चरित्रग्रंथाचे प्रकाशन
कोल्हापूर, दि. १५ एप्रिल: वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी कोल्हापूरच्या सर्वांगीण
प्रगतीच्या लोककल्याणकारी विचार-उद्देशाने युरोप अभ्यास दौऱ्यावर गेलेले छत्रपती
राजाराम महाराज (दुसरे) हे आधुनिक युगाचे अग्रदूत आणि प्रबोधनाचा शुक्रतारा होते, असे गौरवोद्गार ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.
जयसिंगराव पवार यांनी आज येथे काढले.
छत्रपती राजाराम महाराज
यांच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठ आणि बी. एन. पाटणकर
ट्रस्टतर्फे डॉ. रघुनाथ कडाकणे अनुवादित 'यात्रा
युरोपची रोजनिशी (१८७०)' आणि प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण
लिखित 'छत्रपती राजाराम महाराज (करवीर दुसरे)' या दोन ग्रंथांचा प्रकाशन सोहळा मेन राजाराम हायस्कूलच्या सभागृहात आज
सायंकाळी झाला. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि
खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला.
डॉ. पवार म्हणाले, तलवारीचे युग संपून यंत्रयुग सुरू झाले
होते. अशा काळात केवळ वीस वर्षांचा हा कोल्हापूरचा राजा धार्मिक मान्यता झुगारून
युरोप दौऱ्यावर जातो. तेथील सर्व प्रकारच्या आधुनिक संस्था, उद्योगांना भेटी देतो.
मान्यवरांशी चर्चा करतो आणि कोल्हापूरचे सर्वांगीण विकासाचे एक चित्र मनोमनी
ठरवतो. परंतु दुर्दैवाने भारताकडे परत येताना त्यांचा मृत्यू होतो. जर या छत्रपतींना
आणखी आयुष्य मिळाले असते, तर आज आपल्याला आधुनिक कोल्हापूर पाहायला मिळाले असते. संभाजी
महाराजांच्यानंतर स्वराज्य पूर्णपणे अडचणीत आलेले असताना पाटणकर घराणे छत्रपतींशी
एकनिष्ठेने राहिले. त्यांच्याच घराण्यातील दत्तक आलेले राजाराम महाराज दुसरे यांचे
अल्पायुषी असताना झालेले निधन कोल्हापूरसाठी दुर्दैवाचे ठरले.
डॉ. यशवंतराव थोरात यांनी
जगाच्या इतिहासातील घडामोडींचे संदर्भ देत कोल्हापूरला १९ व्या शतकाच्या मुख्य
प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने छत्रपती राजाराम महाराजांनी युरोप अभ्यास दौरा केला
होता, असे सांगितले. ते
म्हणाले, जे इंग्रज आपल्यावर राज्य करत आहेत. त्यांच्या देशातील परिस्थिती
पाहून त्यानुसार आपल्या संस्थानामध्ये काही करता येईल का याची चाचपणी ते करत होते.
तिथल्या दौऱ्यानंतर कोल्हापूरच्या विकासाच्या आकांक्षांची ब्ल्यू प्रिंट त्यांच्या
मनामध्ये तयार झाली असावी.
डॉ.
थोरात म्हणाले, वास्तव आणि कल्पनाशक्ती यातील मोकळ्या जागेत इतिहासकार तर्काच्या आधारे
सर्जनशील विश्लेषण करतो. डॉ. पठाण यांनी राजाराम महाराज (दुसरे) यांच्याविषयी
सूक्ष्म, चिकित्सक दृष्टीचे लेखन केले. राजाराम महाराजांच्या
रोजनिशीचा डॉ. कडाकणे यांनी अनुवाद केला, तो भविष्यात इतिहास
संशोधनासाठी उपयुक्त ठरेल. राजाराम महाराज युरोपला गेल्याचा काळ, युरोप व इंग्लंडमधील स्थिती, अन्य राष्ट्रातील
तत्कालीन युद्ध स्थिती, कष्टकऱ्यांचे शोषण, असे अनेक पदर समजून घेणे यामुळे शक्य होईल.
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के
म्हणाले, छत्रपती राजाराम महाराज यांच्या रोजनिशीमधून स्टडी टूर ही संकल्पना
नेमकेपणाने स्पष्ट होते. ही संकल्पना राबविणारे ते पहिले छत्रपती होते.
चरित्रग्रंथाचे
लेखक डॉ. पठाण म्हणाले, पाटणकर घराण्यात जन्मलेले राजाराम महाराज (दुसरे) वयाच्या १६ वर्षी येथील
संस्थानात दत्तक आले. ते प्रखर बुद्धिमत्तेचे होते. अवघ्या दीड वर्षात अस्सलखित
इंग्रजी बोलू लागले. त्यांनी युरोपच्या दौऱ्यात तेथील राजकारभार अनुभवला, विद्यापीठात गेले, विविध व्याख्याने ऐकली, नव्या गोष्टी शिकण्यावर भर दिला. मात्र, ते परत येताना
आजारपणात त्यांचे निधन झाले. इटलीतील मंत्रिमंडळाने बैठक घेऊन त्यांच्या दहनसंस्काराला
मान्यता दिली. त्यांचे स्मारक इटलीमध्ये उभारले, असे अनेक
संदर्भ या ग्रंथात आहेत.
डॉ.
कडाकणे म्हणाले, राजाराम महाराज (दुसरे) यांनी युरोप दौऱ्यात रोजनिशीत अत्यंत
पारदर्शक, खऱ्या घटना व संदर्भासह इंग्रजीत लिहिल्या. एक राजा विविध संदर्भासह
रोजनिशी लिहितो, तत्कालीन सामाजिक परिस्थितीसोबत
राजकारभाराचे अनेक पदर त्यात दाखवतो. त्या रोजनिशीचे अनुवादवाचन सर्वांनाच दिशादर्शक
ठरेल.
अध्यक्षीय मनोगतात खासदार
शाहू छत्रपती महाराज म्हणाले, अल्पायुष्यात राजाराम महाराजांनी शिक्षणासाठी घेतलेली भूमिका
महत्त्वाची आहे. तत्कालीन परिस्थितीत परदेशात जायला कोणी तयार नसताना राजाराम
महाराज (दुसरे) 'स्पिरीट ऑफ इन्क्वायरी'च्या बळावर इंग्लंडला गेले.
ब्रिटिश कसे राज्य करतात, याची उत्सुकतेने माहिती घेतली. यापुढच्या
काळातही कोल्हापूरचा इतिहास आणि व्यक्ती यांवर लिखाण होण्याची गरज त्यांनी व्यक्त
केली.
यावेळी विक्रमसिंह पाटणकर
यांनीही मनोगत व्यक्त केले. बाळ पाटणकर यांनी प्रास्ताविकात छत्रपती राजाराम
महाराज दुसरे यांचे स्मारक कोल्हापुरात व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी केले.
कार्यक्रमाला माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. बी.
पी. साबळे, डॉ. रमेश जाधव, डॉ. रणधीर
शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. अवनिश पाटील, डॉ. श्रीराम पवार, डॉ. वसंत भोसले, आनंद माने, व्यंकाप्पा
भोसले, सुरेश शिपूरकर, सुनीलकुमार लवटे,
ऋतुराज इंगळे, नकुल पाटणकर, सिद्धार्थ पाटणकर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment