Thursday, 24 April 2025

महर्षी वि.रा. शिंदे क्रांतीकारी लोकोत्तर व्यक्तीमत्त्व: राजन गवस

 प्रा. एन.डी. पाटील लिखित महर्षींवरील पुस्तकाचे विद्यापीठात प्रकाशन

शिवाजी विद्यापीठात प्रा. एन.डी. पाटील लिखित 'महर्षी विठ्ठल रामजी शिंदे: एक उपेक्षित महात्मा' या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी (डावीकडून) डॉ. राजन गवस, डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. सरोज पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. टी.एस. पाटील आणि डॉ. रणधीर शिंदे.

शिवाजी विद्यापीठात प्रा. एन.डी. पाटील लिखित 'महर्षी विठ्ठल रामजी शिंदे: एक उपेक्षित महात्मा' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना डॉ. राजन गवस.

शिवाजी विद्यापीठात प्रा. एन.डी. पाटील लिखित 'महर्षी विठ्ठल रामजी शिंदे: एक उपेक्षित महात्मा' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना डॉ. राजन गवस. मंचावर (डावीकडून) डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. सरोज पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. टी.एस. पाटील आणि डॉ. रणधीर शिंदे.


(पुस्तक प्रकाशन समारंभाचा व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. २४ एप्रिल: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे क्रांतीकारक लोकोत्तर व्यक्तीमत्त्वाचे धनी होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाच्या वतीने शिंदे यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन.डी. पाटील लिखित महर्षी विठ्ठल रामजी शिंदे: एक उपेक्षित महात्मा या पुस्तकाचे प्रकाशन आज श्रीमती सरोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे आणि प्राचार्य टी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. राजन गवस म्हणाले, महर्षी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणाचे अंगीकृत कार्य करीत असताना स्वकीयांकडूनच अपमान, अवहेलना आणि उपेक्षा झेलली. मात्र, ते सदैव निरपेक्ष वृत्तीने कार्य करीत राहिले. यशापयशाच्या परीघात ते कधीही नव्हते. केवळ आपले काम करीत राहणे, एवढेच त्यांना ठाऊक होते. म्हणूनच प्रा. एन.डी. पाटील यांनी त्यांच्या कार्याला एकतारीवरचे गाणे म्हटले. यात महर्षींबरोबर त्यांच्या भगिनींसह सारे कुटुंबीय सहभागी होते. एन.डी. पाटील यांच्यामध्ये एक कवी दडलेला होता. त्या अंगाने त्यांनी महर्षी शिंदे यांना शापित म्हटले. महर्षी शिंदे यांना केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेचे यथायोग्य मापन करण्याचे महत्त्वाचे काम एन.डी. पाटील यांनी केले. एका रात्रीत लिहीलेल्या या पुस्तकाच्या माध्यमातून ते आता वाचकांसमोर येत आहे, याचा आनंद मोठा असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले, प्रा. एन.डी. पाटील यांनी महर्षी शिंदे यांना उपेक्षेच्या छायेतून बाहेर काढण्याचे मोठे काम एकविसाव्या शतकात केले आहे. तर, गो.मा. पवार आणि रणधीर शिंदे यांनी महर्षींच्या अनुषंगाने दस्तावेजीकरणाचे महत्त्वाचे काम हाती घेऊन तडीस नेले आहे.

यावेळी डॉ. सरोज पाटील यांनी प्रा. एन.डी. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, एन.डी. पाटील यांनी सुरवातीपासून आपल्या मूल्यांना प्राणापलिकडे जपले. त्यांच्याशी जुळवून घेताना प्रारंभी दमछाक झाली, मात्र, त्या मूल्यांशी तडजोड करण्याचा विचार कधी मनी आला नाही. हेच मूल्यसंस्कार मुलांनीही आत्मसात करून पुढे चालविले आहेत, यापेक्षा मोठे सुख आणि समाधान दुसरे असू शकत नाही. जगभरात जी माणसे मोठी झाली, त्यांच्यापाठी ठाम उभ्या राहणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनींचाही समाजाने सकारात्मक दखल घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

प्रा. टी.एस. पाटील म्हणाले, प्रा. एन.डी. पाटील यांनी आपला सामाजिक, राजकीय व्याप सांभाळून अक्षरशः रात्रीचा दिवस करून लेखन केले आहे. त्यांच्या भाषणांचे आणि मुलाखतींचे संकलनाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठामधील विविध अध्यासनांनी धोरण निर्मितीमध्ये योगदान देण्यासाठी पुढे येणे अपेक्षित आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विविध संशोधन प्रकल्पांची यादी करून टप्प्याटप्प्याने त्यांच्यावर काम सुरू करावे. महामानवांनी विसाव्या शतकात हाताळलेल्या प्रश्नांचे एकविसाव्या शतकातील स्वरुप आणि त्यावरील उपाय या अनुषंगानेही काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

यावेळी अरिष्ट काळाचे भयसूचन या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा केशवसुत पुरस्कार मिळाल्याबद्दल एकनाथ पाटील यांचा डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुखदेव एकल यांनी आभार मानले. कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, सुरेश शिपूरकर, डॉ. प्रभंजन माने, डॉ. अवनीश पाटील, डॉ. मेघा पानसरे, प्रसाद कुलकर्णी, व्यंकाप्पा भोसले, डॉ. गिरीश मोरे, डॉ. भारती पाटील, नामदेवराव कांबळे, डॉ. सिंधु आवळे, डॉ. रघुनाथ कडाकणे, किसन कुराडे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment