Monday, 1 May 2023

विद्यापीठे व शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी एकत्रित काम करावे: मंत्री दीपक केसरकर

शिवाजी विद्यापीठाकडून विकसित 'शालेय शिक्षणासाठीच्या आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणाली'चे उद्घाटन

शिवाजी विद्यापीठाने विकसित केलेल्या 'शालेय शिक्षणात आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणाली'चे उद्घाटन करताना महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर. शेजारी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ. सुधीर देसाई आदी.

शिवाजी विद्यापीठात 'शालेय शिक्षणात आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणाली'च्या उद्घाटन समारंभात बोलताना महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर. सोबत (डावीकडून) जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे.

महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन अभिवादन केले. या प्रसंगी त्यांच्यासमवेत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार आदी उपस्थित होते.


कोल्हापूर, दि. १ मे: आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणालीचा अवलंब करून शालेय शैक्षणिक संकल्पनांचे सुलभीकरण करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने विशेष अॅप विकसित करून शालेय शिक्षण क्षेत्राला महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. त्यामुळे येथून पुढच्या काळात शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी विद्यापीठे आणि शालेय शिक्षण विभाग यांनी एकत्रित काम केल्यास अधिकाधिक शैक्षणिक विकास साधणे शक्य होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या शालेय शिक्षणात आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणालीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार आदी उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या वतीने नाविन्यपूर्ण योजना उपक्रमांतर्गत ही प्रणाली विकसित करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाला अर्थसाह्य केले आहे.

शिवाजी विद्यापीठाने निर्माण केलेली आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणाली ही केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरती मर्यादित न ठेवता महाराष्ट्रातील विदर्भासह सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा मनोदय जाहीर करून मंत्री केसरकर म्हणाले, भारताने जगाचे नेतृत्व केले पाहिजे, असे स्वप्न भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व शैक्षणिक व्यवस्थांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. आजघडीला शालेय शिक्षण, तंत्रशिक्षण आणि उच्च व तंत्र शिक्षण यांच्यामधील सीमारेषा पुसल्या जाणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांचे कलागुण ओळखून त्यांना घडवित असताना वयापेक्षा ज्ञानाला महत्त्व देण्याची आवश्यकता आहे. आज आम्ही शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके, कपडे, पादत्राणे वगैरे बाबी पुरवितो, मात्र त्याच्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता ही उत्तम मार्गदर्शनातूनच येईल. त्यासाठी भाषा, विज्ञान व गणित या विषयांमध्ये त्याला रुची निर्माण व्हावी, या दिशेने काम करण्याची आवश्यकता आहे. शिवाजी विद्यापीठाने निर्माण केलेल्या या आधुनिक प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या विज्ञानविषयक संकल्पना अधिक सुस्पष्ट होऊन त्यांना त्यात रुची निर्माण होईल. त्यातून केंद्रीय स्पर्धा परीक्षांमध्येही ते यशस्वी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपण शिवाजी विद्यापीठात सुमारे ५० वर्षांनंतर आल्याचे सांगून मंत्री श्री. केसरकर यांनी विद्यापीठाच्या बांधणीमध्ये महत्त्वाचा वाटा उचलणारे आर्किटेक्ट व अभियंते आर.एस. बेरी यांच्या आठवणी जागविल्या. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठाने पर्यावरण क्षेत्रात केलेले काम आणि गेल्या साठ वर्षांच्या वाटचालीत शैक्षणिक व संशोधनाच्या क्षेत्रात सातत्याने उंचावत ठेवलेली गुणवत्ता याबद्दल मंत्री केसरकर यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून विकसित करण्यात आलेल्या या प्रणालीमध्ये सध्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तीन विषयांच्या १०४ संकल्पनांचे आधुनिक आभासी वास्तविकता तंत्रज्ञानाच्या आधारे सुलभीकरण करण्यात आले आहे. विज्ञानातील अवघड व क्लिष्ट संकल्पना विद्यार्थ्यांना समजण्यास त्यामुळे सोपे होणार आहे. ही प्रणाली प्रशासनाच्या सहकार्याने जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळांमधील आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी या प्रणालीचे निर्माते व विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे डॉ. सुधीर देसाई आणि डॉ. वैशाली भोसले यांनी या आभासी वास्तविकता तंत्रज्ञान प्रणालीचे सादरीकरण केले. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी शिवपुतळा, ग्रंथभेट व पुष्पगुच्छ देऊन मंत्री दीपक केसरकर यांचे स्वागत केले. प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तत्पूर्वी, शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात प्रविष्ट झाल्याबरोबर मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यापीठासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे दर्शन घेऊन अभिवादन केले.

 

शिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र दिन उत्साहात

 

शिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र दिनानिमित्त कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने प्रशासकीय महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग असणारी लेझीम प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

(शिवाजी विद्यापीठात महिला कर्मचाऱ्यांचे लेझीम सादरीकरण- व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. १ मे: शिवाजी विद्यापीठात आज महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

आज सकाळी ठीक ८ वाजता कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्र संचालक डॉ. रामचंद्र पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थिनींसह सामूहिक राष्ट्रगीत, राज्यगीत तसेच विद्यापीठ गीत गायन करण्यात आले. कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले. सर्व उपस्थितांना कुलगुरूंनी महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थी विकास विभागातर्फे विद्यापीठातील प्रशासकीय कर्मचारी महिलांच्या लेझीमपथकाचा कार्यक्रम मुख्य प्रशासकीय भवन इमारतीसमोर सादर करण्यात आला. यामध्ये सहभागी महिला कर्मचाऱ्यांचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी अभिनंदन केले. चहापानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Saturday, 29 April 2023

व्यवस्थापनाचे ‘मास्टरपीस’ बना: प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील

एमबीए अधिविभागाच्या सिंहावलोकन उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवाजी विद्यापीठाच्या एमबीए अधिविभागातर्फे आयोजित सिंहावलोकन उपक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. समोर विविध महाविद्यालयांतून आलेले व्यवस्थापनशास्त्राचे विद्यार्थी व शिक्षक.

शिवाजी विद्यापीठाच्या एमबीए अधिविभागातर्फे आयोजित सिंहावलोकन उपक्रमाच्या उद्घाटन समारंभात (डावीकडून) डॉ. प्रकाश राऊत, डॉ. आण्णासाहेब गुरव, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व डॉ. दीपा इंगवले.

शिवाजी विद्यापीठाच्या एमबीए अधिविभागातर्फे आयोजित सिंहावलोकन उपक्रमामध्ये निपाणी येथील केएलई जी.आय. बागेवाडी कॉलेजचा चमू सर्वसाधारण विजेतेपदाचा मानकरी ठरला.

 

कोल्हापूर, दि. २९ एप्रिल: विद्यापीठीय शिक्षण घेऊन आपण व्यवस्थापनशास्त्राचे मास्टर तर बनालच, पण या शिक्षणापलिकडे इतरांपेक्षा काही अधिक कलाकौशल्ये आत्मसात करून विद्यार्थ्यांनी मास्टरपीस बनावे. त्या दृष्टीने त्यांना तयार करणारा सिंहावलोकन हा उपक्रम आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी काल (दि. २८) येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या एम.बी.ए. अधिविभागाच्या वतीने आयोजित ''सिंहावलोकन २०२३'' या एकदिवसीय व्यवस्थापन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या उपक्रमांत अधिविभागासह विविध १६ महाविद्यालयांतील ४५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. यावेळी शिवाजी विद्यापीठ संशोधन व विकास फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रकाश राऊत, विभागाचे संचालक डॉ. आण्णासाहेब गुरव आणि डॉ. दीपा इंगवले उपस्थित होते.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले की, आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी नवनवीन कलाकौशल्ये अवगत करणे गरजेचे आहे. जिद्द, चिकाटी, प्रचंड मेहनत, कष्ट करण्याची तयारी असेल तरच जीवनात यशस्वी होता येते. सिंहावलोकन या व्यवस्थापन कार्यक्रमातील बिझनेस प्लॅन, बिझनेस क्विझ, ॲड सम्राट, ॲड मॅड शो, रायझिंग बुल्स आदी स्पर्धांमुळे स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तिचा त्यांनी लाभ करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. व्यवस्थापकीय कार्यक्रमांमुळे विविध प्रकारची तर्क-कौशल्ये व समस्या सोडवणूक कौशल्ये प्रभावीपणे वापरता येतात. त्याद्वारे आपली बलस्थाने, दुर्बलस्थाने यांच्या अनुषंगाने विश्लेषणही करता येते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

डॉ. प्रकाश राऊत यांनी संशोधनाच्या बळावरच देशाचा आर्थिक, सामाजिक विकास अवलंबून असल्याने विद्यार्थ्यांनी संशोधन कौशल्ये विकसित करणे व जोपासणे गरजेचे असल्याचे सांगितले.

यावेळी एम. बी. ए. विभागाचे संचालक डॉ. आण्णासाहेब गुरव यांनी प्रास्ताविक केले आणि डॉ. दीपा इंगवले यांनी आभार मानले. याप्रसंगी डॉ. रामदास बोलके, डॉ. तेजश्री घोडके, जयश्री लोखंडे व दिपाली पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आयोजनास भारत डेअरी (स्फुर्ती) चे संचालक धवल मेहता, हर्षद भोसले (फॅशन टॅग, राजारामपुरी), शुभम उडाळे (फोटोग्राफी), सीए ए. एस. पाटील, पेटीएम वेल्थ सेंटर, धनश्री पब्लीकेशन, ॲड ऑन मल्टिसर्व्हीसेस, गेट ॲक्टीव्ह डिझाइनिंग आदींचे सहकार्य लाभले.

सिंहावलोकन उपक्रमांतर्गत झालेल्या विविध स्पर्धा व विजेते यांची माहिती पुढीलप्रमाणे-

सिंहावलोकन उपक्रमाचे सर्वसाधारण विजेतेपद निपाणी येथील केएलई संस्थेच्या जी.आय. बागेवाडी कॉलेजच्या बीबीएच्या चमूने पटकावले. त्यांनी स्पर्धेतील रु. ११,१११/- चे पारितोषिक पटकावले.

Ø  बिझनेस क्वीझ- द आयक्यू वॉर:

या स्पर्धेत ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात सहभागी विद्यार्थ्याची व्यवसायिक ज्ञान व कौशल्ये यांची चाचणी घेण्यात आली. बिझनेस क्विझच्या तीन फेऱ्यांतून विजेत्यांची निवड करण्यात आली.

विजेते असे- रनरअप- श्रध्दा शिंदे व कावेरी सावंत आणि विनरअप- रिशी झा व सोहम करंबळेकर, केएलई सोसायटी बीबीए कॉलेज, निपाणी.

Ø  चातुर्य बिझनेस प्लॅन:

या स्पर्धेत ८ विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये विद्यार्थ्याची तांत्रिक, आर्थिक, विपणन आणि मानव संसाधन पैलूंसह त्यांची नाविन्यपूर्ण व्यवसाय योजना सादर करण्याची क्षमता तपासण्यात आली. विजेते असे- रनरअप- रिषी झा आणि सौरभ बेडकर व विनरअप- सुरज कांबळे, सोहम करंबळेकर केएलई सोसायटी बीबीए कॉलेज निपाणी.

Ø  रायझिंग बुल्स स्टॉक ट्रेडिंग:

या स्पर्धेत ६० विद्यार्थी सहभागी झाले. स्टॉक ट्रेडिंग शेअर मार्केट यांसंदर्भात विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा उपयोग आभासी स्टॉक ट्रेडिंगसाठी, व्यवसाय वाढ व वृद्धीसाठी कौशल्य तपासणी करण्यात आली. विजेते रनरअप- विश्वजीत आबदार तसेच विनरअप- आदित्य पाटील  डीवायपी कॉलेज इंजिनिअरींग, कसबा बावडा.

Ø  पोस्टर प्रेझेंटेशन:

स्पर्धेत २० विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर पोस्टर प्रेझेंटेशन केले. यामध्ये विजेते रनरअप- मुस्कान नायकवडी, डॉ. घाळी कॉलेज, गडहिंग्लज आणि विनरअप- भावना जनमाने आणि सृष्टी वागडे.

Ø  कार्पोरेट चाणक्य रोल प्ले:

या स्पर्धेत ४ विद्यार्थी गट सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी दिलेल्या व्यावसायिक परिस्थितीवर भूमिका मांडली. यातून त्यांच्या उद्योग व्यवसायविषयक ज्ञानाची तपासणी करण्यात आली.  विजेते- रनरअप जयेश पाटील, मित पगारिया यांना तर विनरअप- संयुक्ता कलांत्री, प्रिती वैष्णव, सुझान डिसुझा, डीकेटीई, इचलकरंजी.

Ø  ॲड सम्राट ॲड मॅड शो:

या स्पर्धेत विद्यार्थ्यांची ऑडिओव्हिज्युअल स्वरुपात जाहिरात निर्मितीची सर्जनशीलता तपासण्यात आली. विजेते- रनरअप- श्रेअस नवले, अथर्व पाटील, प्रथमेश ठोंबरे, आदित्य धूमाळ आर आय टी कॉलेज इस्लामपूर व विनरअप- स्नेहल चौगुले सायली सरदेसाई, पूजा घाटगे, प्रतिक्षा गायकवाड, ऋतुजा कुंभार, डीकेटीई इचलकरंजी.

Ø  ट्रेझर हंट:

यात ६० विद्यार्थी सहभागी झाले. यात एजीपीएम अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विनरअप ठरले.


Friday, 28 April 2023

इतिहास समजून घेण्यासाठी मोडी लिपी महत्त्वाचे माध्यम: डॉ. वसंत भोसले

 

मोडी लिपी तज्ज्ञ व मार्गदर्शक वसंत सिंघण यांचा त्यांच्या योगदानाबद्दल सपत्निक सत्कार करताना डॉ. वसंत भोसले. शेजारी डॉ. रामचंद्र पवार.

कोल्हापूर, दि. २८ एप्रिल: मोडी लिपी हे इतिहास समजून घेण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. या लिपीचे शिक्षण देण्याचा शिवाजी विद्यापीठाचा उपक्रम स्तुत्य असून हा अभ्यासक्रम तीन महिन्यांचा करावा, अशी सूचना ज्येष्ठ संपादक डॉ. वसंत भोसले यांनी आज येथे केली.

शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार केंद्राच्या मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाच्या सांगता समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार होते.

डॉ. भोसले म्हणाले, इतिहासाकडे आपण खूप संकुचित दृष्टीने पाहतो. इतिहास अभ्यासण्याची आणि जतन करण्याची व्यापक दृष्टी युरोपियन माणसांकडून आपण घ्यायला हवी. मोडी लिपीच्या अभ्यासातून इतिहासाची अनेक भाषिक साधने आपल्याला अभ्यासता येणे शक्य आहे. अनेक ठिकाणी चित्र, शिल्पकलेच्या माध्यमातूनही इतिहास पाहता, शिकता येतो. या सर्व साधनांचा अतिशय गांभिर्यपूर्वक अभ्यास करण्याची आज मोठी गरज आहे. वस्तुनिष्ठ इतिहास सामोरा येण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त अधिकृत व विश्वासार्ह साधनेही उपलब्ध होणे आवश्यक असते. केवळ अभियांत्रिकी, वैद्यकीय आदी विद्याशाखांच्या अभ्यासाच्या मागे लागण्यापेक्षा जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या विषयांचा, कला-कौशल्यांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्याची नितांत गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

यावेळी मोडी लिपीचे हजारो विद्यार्थी घडविणारे वसंत सिंघण यांचा केंद्रातर्फे डॉ. भोसले यांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना श्री. सिंघण यांनी, मोडीतील बारकावे तपासणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच, विद्यार्थ्यांनी मोडीमध्ये आढळणाऱ्या ९ भाषांच्या संदर्भांचा अभ्यास करावा, अशी इच्छा व्यक्त केली. 

यावेळी संचालक डॉ. रामचंद्र पवार अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, शिक्षण घेण्यासाठी वयाचे बंधन नसते, हे मोडी लिपीच्या अभ्यासकांकडे पाहून लक्षात येते. आपला इतिहास कसा लिहावा, याबाबतचे ज्ञान आपण प्राप्त करण्याची गरज आहे. अभ्यासक्रम पूर्ण होत असताना यापुढेही सर्वांनी अभ्यास व संशोधनाच्या बाबतीत एकसंघपणाने कार्यरत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अमर पाटील व लक्ष्मण तराळ यांनी स्वागत केले. डॉ. आनंद पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर संदीपराव जाधव, श्रद्धा गोंगाणे, सुहेल बोबडे यांनी संयोजन केले. क्षितिजा पाटील यांनी सूत्रसंचालन  केले, तर योगिता खबाले यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला रवींद्र खैरे, आर. एम. जाधव, निखिल चव्हाण, अमर घाटगे, महेश नायकवडी, सौरभ पोवार यांच्यासह विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, 26 April 2023

सुगंधी वनस्पतींमधील तेलाचे प्रमाण मोजण्याच्या उपकरणास पेटंट

 शिवाजी विद्यापीठातील संशोधकांच्या संशोधनास यश

सुगंधी वनस्पतींमधील तेलाचे प्रमाण मोजण्यासाठी विकसित करण्यात आलेले उपकरण

कुलगुरू डॉ. राजनीश कामत

डॉ. गणेश निगवेकर

डॉ. क्रांतीवीर मोरे

डॉ. मानसिंगराज निंबाळकर

डॉ. तुकाराम डोंगळे


कोल्हापूर, दि. २६ एप्रिल: सुगंधी वनस्पतींमधील तेलाचे प्रमाण मोजण्यासाठी विशेष पोर्टेबल उपकरणाची निर्मिती करण्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना यश आले असून या संशोधनास भारतीय पेटंट प्राप्त झाले आहे.

शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक व सध्या डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्यासह सहाय्यक प्राध्यापक डॉ. तुकाराम डोंगळे, डॉ.गणेश निगवेकर, डॉ. क्रांतिवीर मोरे आणि डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांचा या संशोधन चमूमध्ये समावेश आहे.

सुगंधी वनस्पतींमधील तेल सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी निर्माण केलेल्या उपकरणासाठी हे पेटंट मिळाले आहे. या उपकरणामध्ये तेलाचे प्रमाण मोजण्यासाठी अस्थिर सेंद्रिय संयुगे (Volatile oil compound sensor) सेन्सर वापरला आहे. सेन्सरचे आउटपुट मायक्रो-कंट्रोलरद्वारे दिले जाते, तेव्हा सॅम्पलमधील तेलाचे प्रमाण दर्शविले जाते. हे उपकरण अगदी हाताच्या तळव्यावर मावण्याइतके असून ते सहज हाताळता येते. प्रत्यक्ष चाचणीच्या ठिकाणीही त्यामुळे सहज वापरता येऊ शकते.

सुगंधी वनस्पतींच्या लागवडीमधून होणारा नफा हा त्या वनस्पतीमधील तेलाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. हे तेलाचे प्रमाण वनस्पतीचे वय, हवामान आणि जमिनीची उत्पादनक्षमता आदी घटकांवर अवलंबून असते. योग्य वेळी पिकाची काढणी केली तरच जास्तीत जास्त तेल मिळून शेतकऱ्यांचा नफा वाढू शकतो. परंतु वनस्पतीमध्ये तेल योग्य प्रमाणात तयार झाले आहे की नाही, हे ओळखण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या पद्धती अत्यंत खर्चिक व वेळखाऊ असल्याने तसेच त्या शेतकऱ्यांना उपलब्ध नसल्याने त्यांच्याकडून चुकीच्या वेळी पिकाची कापणी केली जाते आणि त्यामुळे त्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागते. यामुळेच बरेचसे शेतकरी सुगंधी पिकांच्या लागवडीपासून दूर चाललेले आहेत. मात्र आता शिवाजी विद्यापीठाच्या या अभिनव संशोधनामुळे थेट शेतामध्ये जाऊन या उपकरणाच्या सहाय्याने पिकामध्ये तेलाचे प्रमाण किती आहे, याचा अंदाज बांधता येणे शक्य आहे. हे उपकरण शेतामध्ये कितीही वेळा चाचणीसाठी वापरता येते. यामध्ये थोडा बदल करून इतर वनस्पतींच्या तेलाची चाचणी करता येऊ शकते. किंबहुना विविध वनस्पतींसाठी एकच उपकरण तयार करता येणेही शक्य आहे. भविष्यात याच्या मध्ये कृत्रिम बुद्धिमतेचा वापर करून या उपकरणाची अचूकता वाढवता येऊ शकते, अशी माहिती डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांनी दिली आहे.

या संशोधक चमूला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांचे मार्गदर्शन सहकार्य लाभले.

 सुगंधी वनस्पतींची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान: कुलगुरू डॉ. शिर्के

शिवाजी विद्यापीठाच्या संशोधक चमूने सुगंधी वनस्पतींमधील तेलाची चाचणी करण्यासाठी विकसित केलेले पोर्टेबल उपकरण हा एक अत्यंत महत्त्वाचा शोध असून सुगंधी वनस्पतींची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या चाचणी शेतकऱ्यांना परवडत नाहीत. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याच्या शेतात जाऊन तेथील वनस्पतीमधील तेलाचे प्रमाण मोजणे शक्य होणार आहे. यामुळे शेतकऱ्याचे अकाली कापणीमुळे होऊ शकणारे संभाव्य नुकसान टाळले जाईल. अशा समाजोपयोगी संशोधनाबद्दल सर्वच संशोधक अभिनंदनास पात्र आहेत, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केली आहे.