Monday, 7 September 2026

विद्यापीठ-उद्योग सहकार्यातून कोल्हापुरात ग्रीन हायड्रोजन प्रकल्प चाचणी

शिवाजी विद्यापीठ–एव्हलॉन पॉवर प्रायव्हेट लिमिटेड समूहात संशोधन सहकार्य

 



कोल्हापूर: भविष्यातील स्वच्छ ऊर्जेचा महत्त्वाचा पर्याय असलेल्या ग्रीन हायड्रोजनच्या क्षेत्रात कोल्हापुरात महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. शिरोली एमआयडीसी येथे एव्हलॉन पॉवर प्रायव्हेट लिमिटेडच्या पुढाकाराने व शिवाजी विद्यापीठ संशोधन सहकार्यातून उभारलेल्या १०० किलोवॅट क्षमतेच्या ग्रीन (हरित) हायड्रोजन निर्मिती चाचणी प्रकल्पाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राजनीश कामत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठ आणि अॅव्हलॉन पॉवर यांच्या संशोधन व उद्योग सहकार्याचा हा महत्त्वाचा टप्पा असून, महाराष्ट्रातील ग्रीन हायड्रोजन क्षेत्रातील सुरुवातीच्या मोठ्या प्रकल्पांपैकी हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रीन हायड्रोजन निर्मितीचे तंत्रज्ञान, त्याची चाचणी आणि औद्योगिक वापराच्या शक्यता तपासण्यात येणार आहेत. इलेक्ट्रोलायझरच्या माध्यमातून पाण्याचे हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विभाजन केले जाते. नवीकरणीय ऊर्जेपासून तयार केलेल्या विजेचा वापर करून पाण्याच्या विघटनातून हायड्रोजन निर्मिती केली जाते, त्यामुळे त्याला ‘ग्रीन (हरित) हायड्रोजन’ म्हटले जाते. भविष्यात उद्योग, वाहतूक आणि ऊर्जा क्षेत्रात स्वच्छ इंधन म्हणून त्याचा वापर वाढण्याची शक्यता आहे.  

हा उपक्रम भारत सरकारच्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनच्या (National Green Hydrogen Mission) व महाराष्ट्र राज्याच्या हरित हायड्रोजन धोरणाच्या उद्दिष्टांशी सुसंगत असून, देशात हरित हायड्रोजनचे उत्पादन, तंत्रज्ञान विकास, संशोधन आणि कौशल्यनिर्मितीला चालना देण्याच्या राष्ट्रीय प्रयत्नांना स्थानिक पातळीवर बळ देणारा आहे. या माध्यमातून विद्यापीठातील संशोधन उद्योगापर्यंत पोहोचविण्यास तसेच नवीन तंत्रज्ञानाची चाचणी व प्रत्यक्ष वापरासाठी आवश्यक विकास करण्यास मदत होणार आहे.

हायड्रोजन वायूच्या निर्मिती प्रक्रियेनुसार आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेच्या स्रोतानुसार हायड्रोजनचे विविध प्रकार पडतात. त्यांना वेगवेगळ्या रंगांची नावे देऊन वर्गीकृत केले जाते:

हायड्रोजनचे मुख्य प्रकार

1.       ग्रीन हायड्रोजन : सौर किंवा पवन ऊर्जेसारख्या पुनर्वापरयोग्य ऊर्जेचा वापर करून पाण्याचे विद्युत विघटन करून हा तयार केला जातो. यात अजिबात प्रदूषण होत नाही. कार्बन डायऑक्साइड वायूचे उत्सर्जन होत नाही.

2.       ग्रे हायड्रोजन : नैसर्गिक वायूचा वापर करून तयार केला जाणारा हायड्रोजन. सध्या जगात सर्वाधिक वापर याच पद्धतीचा होतो, पण या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड हवेत सोडला जातो.

3.       ब्लू हायड्रोजन : निर्मिती प्रक्रिया 'ग्रे हायड्रोजन'सारखीच असते, पण यात निर्माण होणारा कार्बन हवेत न सोडता 'कार्बन कॅप्चर अँड स्टोरेज' तंत्रज्ञानाद्वारे साठवून ठेवला जातो.

4.       ब्लॅक / ब्राऊन हायड्रोजन : कोळशाचा वापर करून तयार केला जाणारा हायड्रोजन. यामुळे सर्वात जास्त प्रदूषण होते.

 

ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय?

सौरऊर्जा किंवा पवनऊर्जा यांसारख्या पुनर्वापरयोग्य ऊर्जेचा वापर करून जेव्हा पाण्याचे विद्युतविपघटन केले जाते आणि हायड्रोजन वायू वेगळा केला जातो, तेव्हा त्याला ग्रीन हायड्रोजन म्हणतात.

या प्रक्रियेत इलेक्ट्रोलायझर या उपकरणाच्या साहाय्याने पाण्याचे हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायू मध्ये विभाजन केले जाते. या संपूर्ण उत्पादनादरम्यान कोणताही कार्बन डायऑक्साइड सोडला जात नसल्याने हे पूर्णपणे 'झिरो-कार्बन' किंवा कार्बन विरहित स्वच्छ इंधन ठरते.

ग्रीन हायड्रोजनचे उपयोग

ग्रीन हायड्रोजन भविष्यातील उर्जेचा मुख्य स्रोत मानला जातो, त्याचे प्रमुख उपयोग खालीलप्रमाणे आहेत:

औद्योगिक वापर: पोलाद, सिमेंट, खते आणि पेट्रोकेमिकल उद्योगात कोळसा आणि नैसर्गिक वायूच्या ऐवजी स्वच्छ पर्याय म्हणून.

वाहतूक क्षेत्र : अवजड वाहने, ट्रक्स, बस, ट्रेन, जहाजे आणि विमानांसाठी इंधन पेशी द्वारे ऊर्जा पुरवण्यासाठी.

ऊर्जा साठवणूक : अतिरिक्त सौर किंवा पवनऊर्जा हायड्रोजनच्या स्वरूपात साठवून ती भविष्यात वीज निर्मितीसाठी वापरणे.

घरगुती व व्यावसायिक वापर: नैसर्गिक वायूच्या पाइपलाइनमध्ये मिसळून स्वच्छ इंधन पुरवणे.

साठवणूक आणि वाहतूक

हायड्रोजन हा अत्यंत हलका आणि ज्वलनशील वायू असल्याने त्याची साठवणूक आणि वाहतूक करणे एक मोठे आव्हान असते:

उच्च दाबाखाली साठवण: हायड्रोजन वायू ३५० ते ७०० बार इतक्या प्रचंड दाबाखाली विशेष टँकमध्ये साठवला जातो.

द्रव स्वरूपात साठवण: हायड्रोजनचे द्रवात रूपांतर करण्यासाठी त्याला अत्यंत कमी तापमानावर (मायनस २५३ अंश सेल्सिअस) थंड केले जाते.

अमोनिया किंवा एलओएचसी: सुरक्षित वाहतुकीसाठी हायड्रोजनचे रूपांतर अमोनिया किंवा लिक्विड ऑरगॅनिक हायड्रोजन कॅरिअर्समध्ये केले जाते.

निर्मितीचा खर्च

प्रकार

सरासरी उत्पादन खर्च (प्रति किलो)

ग्रीन हायड्रोजन (सध्याचा खर्च)

रु. 8०० ते रु. १२००/किग्रॅ

ग्रे/ब्लू हायड्रोजन (फॉसिल फ्युएलपासून)

रु. ७०० ते रु. १०००/किग्रॅ

भविष्यातील लक्ष्य (२०३० पर्यंत)

रु. २५० ते रु. ३००/किग्रॅ

सध्या ग्रीन हायड्रोजन निर्मितीचा खर्च फॉसिल फ्युएलच्या तुलनेत जास्त असला, तरी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे पुढील काही वर्षांत हा खर्च कमालीचा कमी होण्याचा अंदाज आहे.

प्रमुख आव्हाने

प्रचंड निर्मिती खर्च: इलेक्ट्रोलायझर उपकरणांची किंमत आणि नवीकरणीय विजेचा खर्च सध्या जास्त आहे.

साठवणूक आणि सुरक्षितता: हायड्रोजन हा अत्यंत सूक्ष्म वायू असल्याने तो गळती होण्याची शक्यता जास्त असते, तसेच तो वेगाने पेट घेणारा वायू आहे. हायड्रोजन अत्यंत सूक्ष्म आणि वेगाने पेट घेणारा वायू आहे हे पूर्णपणे खरे आहे. तसेच, हायड्रोजन अशुद्ध असेल (विशेषतः त्यात ऑक्सिजन किंवा हवा मिसळली असेल), तर ज्वालाग्राहीता आणि स्फोटाचा धोका कित्येक पटीने वाढतो.

पाण्याची उपलब्धता: १ किलो ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी सुमारे ९ ते १० लिटर शुद्ध (डिस्टिल्ड) पाण्याची गरज असते.

पाच पायाभूत सुविधांचा अभाव: कार्यक्षम हरित हायड्रोजन निर्मिती, हरित हायड्रोजन साठवणूक, हायड्रोजन पाइपलाइन, रिफ्यूलिंग स्टेशन आणि विशेष वाहतूक टँकर्सची सध्या जगभरात कमतरता आहे.

कुलगुरू प्रा. राजनीश कामत म्हणाले, “हरित हायड्रोजन निर्मितीमुळे निसर्गाला कोणतीही हानी होत नाही.” संशोधनातून विकसित होणारे तंत्रज्ञान ‘टाइम टू मार्केट’च्या माध्यमातून लवकरात लवकर उद्योग आणि समाजापर्यंत पोहोचणे आवश्यक असून, विद्यापीठ–उद्योग सहकार्य त्यासाठी महत्त्वाचे आहे. या प्रकल्पामुळे कोल्हापूर भविष्यात हरित हायड्रोजन हब/ व्हॅली बनू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एव्हलॉन पॉवरचे संचालक वरुण जैन यांनी प्रास्ताविकामध्ये हरित हायड्रोजन प्रकल्पाचे महत्त्व स्पष्ट करताना “ग्रीन हायड्रोजन हा कोल्हापूरकरांसाठी एक मोठे पाऊल आहे,” असे सांगितले. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात संशोधन, तंत्रज्ञान विकास आणि औद्योगिक वापराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी नमूद केले. तर नवोपक्रम, नवसंशोधन व साहचार्य संचालक प्रा. सागर डेळेकर यांनी या प्रकल्पाविषयी हरित हायड्रोजनच्या क्षेत्रातील विद्यापीठाचे संशोधन, तंत्रज्ञान विकास आणि भविष्यातील सहकार्याच्या संधी याबाबत माहिती दिली.

प्र-कुलगुरू प्रा. ज्योती जाधव यांनी शैक्षणिक संशोधनाचे प्रत्यक्ष तंत्रज्ञान आणि उद्योगातील उपयोगात रूपांतर करण्यासाठी विद्यापीठ–उद्योग भागीदारी आवश्यक असल्याचे सांगितले. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी, “शिवाजी विद्यापीठ आणि जैन समूहाचे हे उद्योग क्षेत्रातील महत्त्वाचे पाऊल आहे,” असे सांगितले. स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत पर्यावरणाच्या दृष्टीने ग्रीन हायड्रोजनचे महत्त्व वाढत असून विद्यापीठ–उद्योग सहकार्यामुळे या क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे प्रा. के. एम. गरडकर, डॉ. ज्योतिप्रकाश यादव, डॉ. हेमराज यादव. डॉ. प्रमोद कोयले, प्रा. के. डी. सोनावणे, डॉ. ई. उडाचन, इत्यादी प्राध्यापकवर्ग, तसेच एव्हलॉन पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र जैन, संचालिका आशा सौ. एस. जैन, प्रवीणकुमार आंबेसकर व उद्योग क्षेत्रातून कोल्हापूरच्या उद्योग क्षेत्रातून कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री. कमलाकांत कुलकर्णी, सचिव श्री. नितीन वाडीकर, खजिनदार श्री. प्रसन्नकुमार तेरदाळकर, MAC चे अध्यक्ष श्री. मोहन कुशिरे, IIF – कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष श्री. सतीश कडूकर, SMAC चे अध्यक्ष श्री. जयदीप चौगुले, खजिनदार श्री. बदाम पाटील यांच्यासह श्री. अतुल पाटील, श्री. एम. वाय. पाटील, श्री. भीमराव खाडे, श्री. प्रवीण पटेल, श्री. रामराजे बदले, कोल्हापूर चेंबर्स चे श्री. राजू पाटील, श्री. भारत ओसवाल, श्री. जितेंद्र राठोड आणि श्री. सुबोध पांगवकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पंडित कंदले व आभार श्री. प्रवीणकुमार अंबेसकर यांनी केले. 

कोल्हापूर आणि तेथील औद्योगिक क्षेत्रासाठी ग्रीन हायड्रोजन अत्यंत महत्त्वाचा आणि क्रांतीकारक ठरणारा आहे. कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख कास्टिंग, फाउंड्री, ऑटोमोबाईल आणि अभियांत्रिकी हब मानले जाते.

कोल्हापुरातील उद्योगांसाठी ग्रीन हायड्रोजनचे महत्त्व खालील मुद्द्यांवरून स्पष्ट होते:

१. कोल्हापुरातील फाउंड्री आणि मेटल उद्योगांसाठी पर्याय

कोल्हापुरात २०० हून अधिक फाउंड्री आणि मेटल प्रोसेसिंग युनिट्स आहेत.

·         या उद्योगांमध्ये धातू वितळवण्यासाठी आणि भट्ट्या चालवण्यासाठी सध्या प्रचंड प्रमाणात कोळसा, डिझेल आणि एलपीजी वापरला जातो.

·         या जीवाश्म इंधनांऐवजी ग्रीन हायड्रोजनचा वापर केल्यास भट्ट्यांचे प्रदूषण शून्यावर येईल आणि स्वच्छ ऊर्जा मिळेल.

२. जागतिक निर्यात आणि 'कार्बन टॅक्स' पासून संरक्षण

कोल्हापुरातील फाउंड्रीज आणि इंजिनिअरिंग सुटे भाग अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्यात होतात.

·         युरोपियन युनियनने लागू केलेल्या नियमांमुळे जास्त कार्बन उत्सर्जन करणाऱ्या उत्पादनांवर जास्त कर आकारला जाणार आहे.

·         कोल्हापुरातील उद्योगांनी ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञान स्वीकारल्यास त्यांची उत्पादने 'ग्रीन किंवा झिरो-कार्बन' ठरतील, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांची स्पर्धात्मकता टिकून राहील.

३. इंधन आणि उत्पादन खर्चात बचत

·         सध्या आयात केलेल्या डिझेल, फर्नेस ऑइल आणि नैसर्गिक वायूचे दर सातत्याने वाढत आहेत.

·         भविष्यात कोल्हापुरातच स्थानिक पातळीवर हायड्रोजन निर्मिती झाल्यास उद्योगांना स्वस्त आणि शाश्वत इंधन उपलब्ध होईल.

४. टेक्स्टाईल आणि साखर कारखान्यांसाठी उपयुक्त

कोल्हापूर आणि इचलकरंजी परिसरातील साखर कारखाने, डिस्टिलरी आणि वस्त्रोद्योग यांना प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर वाफेची आणि ऊर्जेची गरज असते.

·         हायड्रोजन बॉयलरचा वापर करून हा उद्योग हरित ऊर्जेकडे वळू शकतो.

·         साखर कारखान्यांमधील बायोडायजेस्टर किंवा सांडपाण्यापासून हायड्रोजन तयार करण्याच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

५. नवीन रोजगार आणि तंत्रज्ञान हब

शिवाजी विद्यापीठ आणि एव्हलॉन पॉवर यांच्या १०० किलोवॅट प्रकल्पाच्या चाचणीमुळे कोल्हापूर हरित ऊर्जेच्या संशोधन आणि नवोपक्रमाचे केंद्र बनेल.

·         यामुळे स्थानिक तरुणांना ग्रीन हायड्रोजन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रोलायझर मेंटेनन्स आणि क्लीन-टेक क्षेत्रात उच्च कौशल्याचे नवीन रोजगार मिळतील.

थोडक्यात, ग्रीन हायड्रोजनमुळे कोल्हापूरच्या पारंपारिक आणि प्रदूषणकारी उद्योगांना 'पर्यावरणपूरक आणि आधुनिक' बनण्याची मोठी संधी मिळणार आहे.

Saturday, 5 September 2026

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे - कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

 कोल्हापूर, दि.05 सप्टेंबर - आदिलशाही आणि मुघल साम्राज्याशी लढा देणारे शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे होते, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिध्द कादंबरीकार श्रीमती मेधा देशमुख भास्करन (बेंगलोर) यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्रामार्फत गणित अधिविभागामधील रामानुजन सभागृहामध्ये 'आर्ट अँड लिटरेचर क्लब अंतर्गत' प्रसिध्द इंग्रजी कादंबरीकार श्रीमती मेधा देशमुख भास्करन (बेंगलोर) यांची मुलाखत तसेच संशोधक विद्यार्थ्यांशी संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्याप्रसंगी कादंबरीकार देशमुख भास्करन बोलत होत्या.लेखिका प्रमिला जरग, मित्रा देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

देशमुख भास्करन मुलाखतीमध्ये पुढे म्हणाल्या, कादंबरीचे लेखन करताना अत्यंत उच्च दर्जाचे शब्द वापरून लोकांना शब्दकोश पाहण्यास भाग पाडले जावू नये. कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती साध्य करण्यासाठी भाषा अडथळा ठरू शकत नाही. संयम असेल तर कोणतीही भाषा आत्मसात करता येते. नेपोलियन बोनापार्टवर एक लाखाहून अधिक पुस्तके इंग्रजीमधून लिहिलेली आहेत.तसेच, जागतिक पातळीवरील अनेक योद्धे, महायोद्‌ध्यांवर इतिहासकारांनी हजारो पुस्तके इंग्रजीमध्ये लिहिली आहेत.परंतू, जागतिक स्तरावर शिवरायांवर एकही पुस्तक इंग्रजीमध्ये उपलब्ध नव्हते.यातूनच, छत्रपती शिवाजी महाराजांवर इंग्रजीमधून लेखन करण्याची प्रेरणा मिळाली.वैश्विक पातळीवर शिवरायांचे कर्तृत्व योग्य प्रकारे पोहोचावे यासाठी इंग्रजी भाषेतून बायो-फिक्शन आणि चरित्रात्मक लेखन केले.शिवरायांवर पुस्तक लिहिण्यापूर्वी सुमारे 10 वर्षे 50 पेक्षा जास्त एेतिहासिक ग्रंथांचा आणि कागदपत्रांचा सखोल अभ्यास केला. शिवराय विरूध्द औरंगजेब हा केवळ राजकीय संघर्ष नव्हता तर एका आक्रमाकाविरूध्द स्वत:च्या मातीचे आणि लोकांचे रक्षण करण्यासाठी उभारलेले स्वराज्य होते.ज्येष्ठ इतिहासकार डॉ.जयसिंगराव पवार लिखित 'चिकित्सा' या पुस्तकाच्या प्रेरणेतून 'लाईफ अँड डेथ ऑफ संभाजी' या पुस्तकासाठीची प्रेरणा मिळाली. अत्यंत विपरीत परिस्थितीत स्वराज्याचे रक्षण करताना संभाजी राजेंंनी दाखवलेली निष्ठा ही भारतीय इतिहासातील अतुलनीय शौर्यगाथा आहे.

शाहू संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ.मंजुश्री पवार आणि इतिहास अधिविभागप्रमुख डॉ.अवनीश पाटील यांनी मुलाखत घेतली. सूत्रसंचालन अभय गायकवाड यांनी केले तर डॉ.देविकाराणी पाटील यांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रमानंतर कादंबरीकार मेधा भास्करन यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देवून एेतिहासिक घटनांचे लेखन करताना घटना कोणत्या परिस्थितीत आणि कशा प्रकारे मांडली गेली हे कसे पाहावे लागते याचे वर्णन केले.

           याप्रसंगी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.रघुनाथ धमकले, डॉ.रणधीर शिंदे, डॉ.नंदकुमार मोरे, डॉ.अरूंधती पवार, अनिता पवार यांचेसह इतिहास प्रेमी जनता, विविध अधिविभागातील संशोधक विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठयाप्रमाणात उपस्थित होते.

-----

Friday, 4 September 2026

राष्ट्रीय युवा संसदेसाठी डॉ. प्रल्हाद माने समूह समन्वयक व परीक्षक

डॉ. प्रल्हाद माने


कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. प्रल्हाद माने यांची भारत सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या १८व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेसाठी समूह समन्वयक व राष्ट्रीय परीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. संसदीय कार्य मंत्रालयाचे उपसचिव अनिल कुमार यांचे या बाबतचे पत्र त्यांना नुकतेच मिळाले आहे .

युवाशक्तीमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव दृढ करणे, संसदीय कार्यपद्धतीची माहिती तरुणांपर्यंत पोहोचविणे आणि त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करणे, या व्यापक उद्देशाने राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचे आयोजन केले जाते. २०२६-२७ या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या मूल्यांकनासाठी देशभरातील सहभागी विद्यापीठे व महाविद्यालयांची बारा झोनमध्ये विभागणी करण्यात आली असून, प्रत्येक झोनसाठी समूह समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये डॉ. माने यांच्यावर पाच राज्यांतील सात विद्यापीठे व महाविद्यालयांच्या मूल्यांकनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशातील सेंट्रल युनिव्हर्सिटी, जम्मू राज्यातील जम्मू विद्यापीठ, कर्नाटक  राज्यातील बेंगळुरू येथील रेवा विद्यापीठ, आर. व्ही. कॉलेज आणि  एन. एम. आय. एम. एस. विद्यापीठ,  तामिळनाडूतील अलगप्पा विद्यापीठ तसेच महाराष्ट्रातील वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ या संस्थांचा त्यामध्ये समावेश आहे.

डॉ. माने यांनी यापूर्वी १४वी, १५वी, १६वी आणि १७वी राष्ट्रीय युवा संसद स्पर्धांच्या मूल्यांकनात सक्रिय सहभाग घेतला आहे. संसदीय कार्य मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या स्पर्धांच्या आयोजन व मूल्यांकन प्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी विद्यापीठाच्या युवा संसदेने तीन वेळा राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून दिल्लीतील संसद भवन परिसरातील बालयोगी सभागृहात पुरस्कार प्राप्त केले आहेत.

डॉ. माने हे शिवाजी विद्यापीठाच्या नेतृत्व विकास केंद्राचे समन्वयक असून, विद्यार्थी वसतिगृहाचे मुख्य अधीक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. विद्यापीठाच्या विविध समित्यांवर ते सक्रियपणे कार्यरत असून, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या समाजशास्त्र अभ्यास समितीचे अध्यक्ष म्हणूनही ते जबाबदारी सांभाळत आहेत.

Wednesday, 2 September 2026

बदलत्या सामाजिक परिस्थितीतही खांडेकरांचे साहित्य प्रस्तुत: डॉ. भालचंद्र मुणगेकर

विद्यापीठात वि.स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभ

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित वि.स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभात बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर.

शिवाजी विद्यापीठात आयोजित वि.स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभात बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर. मंचावर (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, सुचेता कोरगांवकर, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. माणिकराव साळुंखे आणि डॉ. अतुल कापडी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित वि.स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभात बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर. समोर मोठ्या संख्येने उपस्थित मान्यवर व श्रोते.

शिवाजी विद्यापीठात आयोजित वि.स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभात विविध ग्रंथ व विशेषांकांचे  कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी (डावीकडून) डॉ. सुनीलकुमार लवटे, सुचेता कोरगांवकर, प्रा. मिलिंद जोशी, डॉ. विजय चोरमारे, चंद्रकांत पोतदार, नीलम माणगावे, डॉ. सागर देशपांडे, अखिल मेहता आणि डॉ. रणधीर शिंदे.

(कार्यक्रमाची लघुचित्रफीत)





कोल्हापूर, दि. २ सप्टेंबर: मानवी जीवनातील नैतिक द्वंद्व, स्त्री-पुरुष संबंध, सामाजिक विषमता, शिक्षणाचे उद्दिष्ट आणि शोषणमुक्त समाजाची आकांक्षा यांचा वेध घेणारे, वि. स. खांडेकरांचे साहित्य आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीतही तितकेच प्रस्तुत आहे. त्यांच्या साहित्याचा गाभा मानवी जीवनाच्या सार्वकालिक प्रश्नांशी जोडलेला असल्याने नव्या पिढीने खांडेकरांना केवळ अभ्यासक्रमापुरते न पाहता त्यांच्या साहित्याचा नव्याने शोध घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी आज केले.

शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि आंतरभारती शिक्षण मंडळ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वि. स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्षाच्या सांगता समारंभात ‘वि. स. खांडेकर : सुवर्ण स्मरण’ या विषयावर विशेष स्मृती व्याख्यान देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव होत्या. आंतरभारती शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुचेता कोरगावकर, माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. सुनीलकुमार लवटे, खांडेकरांचे नातू डॉ. अतुल कापडी प्रमुख उपस्थित होते.

खांडेकरांच्या ‘ययाती’ची आजची प्रस्तुतता १९६०च्या दशकापेक्षाही अधिक असल्याचे सांगताना डॉ. मुणगेकर यांनी ‘क्रौंचवध’मधील दिनकर-सुलोचना यांच्या नात्यातून शारीरिक वासनेपलीकडील आंतरिक प्रेम, तर ‘ययाती’मधून पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्रीच्या शोषणाचे टोकदार चित्रण खांडेकरांनी केले असल्याचे नमूद केले. मानवी जीवनातील विविध टोकांमधील संघर्ष आणि त्याचा आलेख मांडणारा साहित्यिक म्हणून खांडेकरांचे महत्त्व अधोरेखित होते, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. मुणगेकर यांनी खांडेकरांच्या विविध साहित्यकृतींच्या आधारे त्यांच्या लेखनातील मानवी जीवनाचा व्यापक पट उलगडला. ते म्हणाले, खांडेकरांच्या साहित्यातून उपभोगवाद, पुरुषप्रधान मानसिकता आणि मानवी वासनेचा संघर्ष, प्रेम, त्याग, नैतिकता आणि हिंसेविषयीची भूमिका आजच्या समाजातील अनेक प्रश्नांशी थेट संवाद साधते. खांडेकर केवळ अलंकारिक भाषेचे साहित्यिक नव्हते, तर मानवी जीवनाचे भाष्यकार होते. जीवनात निर्मळता, सुसंस्कृतपणा, ध्येयनिष्ठा आणि शोषणमुक्त समाज निर्माण व्हावा, हे त्यांच्या साहित्यामागील मूलभूत स्वप्न होते. त्यामुळे त्यांच्या साहित्याची प्रासंगिकता काळाच्या पुढेही टिकून राहते.

“‘क्रौंचवध’चा माझ्या जीवनावर मोठा प्रभाव”

‘क्रौंचवध’मधील दिनकरच्या व्यक्तिरेखेने मला इतके प्रभावित केले की, माझ्या आयुष्याची वाटचालही त्याच मार्गाने व्हावी, अशी इच्छा निर्माण झाली. विद्यार्थीदशेतील त्या साहित्यिक अनुभवाने मला जीवन जगण्याची प्रेरणा दिली. गेल्या पन्नास वर्षांच्या माझ्या जीवनप्रवासात खांडेकरांचे ऋण अग्रस्थानी आहे आणि अखेरच्या श्वासापर्यंत ते माझ्यावर राहील, अशी कृतज्ञ भावना डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी यावेळी व्यक्त केली.

माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी खांडेकरांचे साहित्य हे केवळ एका पिढीपुरते मर्यादित नसून आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या युगातही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ते म्हणाले, तंत्रज्ञानामुळे माणूस अधिक सामर्थ्यवान झाला असला, तरी तो अधिक ‘माणूस’ झाला आहे का, हा प्रश्न आज विचारण्याची गरज असून खांडेकरांच्या साहित्याचा केंद्रबिंदू असलेली माणुसकी, नैतिकता, संवेदना, सामाजिक बांधिलकी आणि जीवनदृष्टी आजच्या पिढीला दिशादर्शक ठरू शकते. विद्यार्थ्यांच्या हातात केवळ पदवी नव्हे, तर विचार; केवळ कौशल्य नव्हे, तर विवेक आणि रोजगारासाठीच नव्हे, तर जीवनासाठी शिक्षण देणे, हीच खऱ्या अर्थाने खांडेकरांना आदरांजली ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी वि. स. खांडेकर यांचे शिवाजी विद्यापीठाशी स्थापनेपासूनच अतूट नाते राहिले असल्याचे सांगितले. ते म्हणाले, विद्यापीठाच्या पहिल्या अधिसभेचे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून खांडेकरांनी प्रारंभीच्या काळात विद्यापीठाला मार्गदर्शन केले, तर ज्ञानपीठ पुरस्कारानंतर त्यांना मानद डी.लिट. पदवी देणारे महाराष्ट्रातील शिवाजी विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ ठरले. शिवाजी विद्यापीठाने साकारलेले खांडेकरांचे स्मृती संग्रहालय म्हणजे विद्यापीठाने खांडेकरांविषयी जपलेल्या आदरभावाचेच प्रतीक आहे.

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही साहित्यिकांच्या प्रत्यक्ष विचारांतून आणि अनुभवांतून मिळणाऱ्या संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, आज माहिती आणि भाषणे काही क्षणांत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून उपलब्ध होत असली, तरी प्रत्यक्ष दिग्गज साहित्यिकांचे विचार ऐकताना मिळणारा भावनिक आणि मानवी स्पर्श कृत्रिम बुद्धिमत्तेला पर्याय ठरू शकत नाही. खांडेकरांच्या साहित्यात केवळ एका पिढीला नव्हे, तर पुढील पिढ्यांनाही घडविण्याची क्षमता असल्याने अशा साहित्यिकांच्या विचारांशी विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष संवाद घडविणारे कार्यक्रम सातत्याने होत राहणे आवश्यक आहे.

यावेळी सुचेता कोरगावकर आणि डॉ. अतुल कापडी यांनीही खांडेकरांविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला डॉ. शरद नावरे, बी.एस. पाटील, डॉ. बी.एम. हिर्डेकर, डॉ. प्रवीण चौगुले, डॉ. अनिल गवळी, चंद्रकांत पोतदार, तनुजा शिपूरकर, डॉ. आर.जी. कुलकर्णी, डॉ. सागर देशपांडे यांच्यासह शिक्षक, आंतरभारती संस्थेतील शिक्षक व सेवक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खांडेकरांविषयी ग्रंथचर्चा व विशेषांकांचे प्रकाशन

दिवसभरात झालेल्या सत्रांमध्ये पुणे येथील प्रा. मिलींद जोशी व ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वि.स.खांडेकर यांचे असंग्रहित लेखन व त्यांच्याविषयीचे ग्रंथ’ या विषयीचे सत्र पार पडले. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते. या सत्रात वि.स. खांडेकर लिखित वृंदावन (कादंबरी), आगरकर चरित्र, स्मृतींची चाळता पाने (संकीर्ण), अर्ध्यदान (काव्यसंग्रह प्रस्तावना) या ग्रंथांसह आंतरभारती: उगम आणि विकास (लेखक- डॉ. सुनीलकुमार लवटे), कुमारांसाठी वि.स. खांडेकर (ले. नीलम माणगावे), वि.स. खांडेकर: साहित्यिक आणि माणूस (ले. राम देशपांडे), वि.स. खांडेकर चरित्र (ले. डॉ. लवटे), वि.स. खांडेकर: एक ध्येयवादी शिक्षक (ले. जया दडकर) या पुस्तकांचेही प्रकाशन झाले. त्याचबरोबर साप्ताहिक साधना, दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका, जडण-घडण, मेहता ग्रंथजगत या नियतकालिकांच्या खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष विशेषांकांचेही प्रकाशन करण्यात आले.