Saturday, 29 March 2014

विद्यापीठाची वेबसाइट आता अधिक ‘युझर फ्रेंडली’!



कोल्हापूर, दि. २९ मार्च: शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाइटच्या स्वरुपामध्ये कालसुसंगत बदल करण्यात आले असून ही साइट आता अधिक युझर फ्रेंडली करण्यात आली आहे.  वेबसाइटचे हे नवे रुप विद्यार्थ्यांना व वापरकर्त्यांना निश्चितपणे आवडेल, असा विश्वास कुलगुरू डॉ. एन.जे. पवार यांनी व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाची www.unishivaji.ac.in ही वेबसाइट यापूर्वी एकाच व्यक्तीकडून केंद्रीय स्वरुपात हाताळली जात असे. तिचे आता विकेंद्रीकरण करण्यात आले असून ज्या त्या विभागाकडे आपापली माहिती अपलोड करण्यासाठी युझर आयडी व पासवर्डसह अधिकार सोपविण्यात येणार आहेत. वेबसाइटचा लूक पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक व सुटसुटीत करण्यात आला असून वापरकर्त्याला अधिक सोप्या व सुलभ पद्धतीने नेव्हीगेशन करता येणार आहे. पूर्वी साइट एचटीएमएल स्वरुपात होती. तिला आता आधुनिक डॉट नेट प्रणालीची जोड देऊन ती अधिक डायनॅमिक करण्यात आली आहे. ही साइट इंटरनेट एक्स्प्लोरर आणि गुगल क्रोम या ब्राऊझर्सशी अधिक सुसंगत आहे. पूर्वीचे होम पेज क्लिष्ट वाटायचे. त्याऐवजी आता होमपेजवरील टॅबची संख्या वाढवून वापरकर्त्यांना हव्या त्या सेक्शनमध्ये जाऊन हवी ती माहिती घेणे सहजशक्य होणार आहे. विशेषतः स्टुडंट सेक्शनमध्ये विद्यार्थ्यांना प्रामुख्याने हवी असणारी विद्यार्थी कल्याण, परीक्षाविषयक माहिती, संशोधन आणि माजी विद्यार्थी अशा महत्त्वाच्या लिंक्स एकत्रित देण्यात आल्या आहेत. नेव्हीगेशनदरम्यान उद्भवणाऱ्या बहुतांश त्रुटी या नव्या लूकमध्ये दूर करण्यात विद्यापीठाला यश आले आहे.
विद्यापीठ आता पुन्हा नव्याने नॅकला सामोरे जात असताना विद्यापीठाची साइटही अधिक युझर फ्रेंडली करण्याच्या दृष्टीने कुलगुरू डॉ. एन.जे. पवार यांनी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. डी.टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तांत्रिक समिती नियुक्त केली होती. या समितीत डॉ. आर.के. कामत, श्रीमती एस.एस. खराडे, डॉ. एम.जे. जोशी यांचा समावेश होता.

Tuesday, 25 March 2014

धर्म व विज्ञानाचे अंतिम ध्येय एकच; मांडण्याच्या पद्धतीत फरक : कुलगुरू डॉ. एन.जे. पवार




कोल्हापूर, दि. २५ मार्च: धर्म आणि विज्ञान या दोहोंच्या मुळाशी मानव आणि त्याचे विश्वाबद्दलचे कुतूहल या गोष्टी असून त्यांचे अंतिम ध्येय एकच असले तरी संकल्पना मांडण्याच्या पद्धतीमध्ये मात्र मूलभूत फरक आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.जे. पवार यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठ आणि शहाजी लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या श्री दत्ताबाळ स्मृती व्याख्यानमालेधर्म आणि विज्ञान या विषयावर ते बोलत होते. लॉ कॉलेजच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौन्सिल ऑफ एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम होत्या.
सुमारे दीड तास रंगलेल्या आपल्या भाषणात कुलगुरू डॉ. पवार यांनी विश्वाची निर्मिती, त्यातील मानवाचे स्थान आणि त्याच्या जीवनातील धर्म व विज्ञान यांची अतिशय शास्त्रशुद्ध मांडणी करून उपस्थितांना अंतर्मुख केले. ते म्हणाले, विज्ञान नेहमीच बुद्धिप्रामाण्यवादाला महत्त्व देते तर धर्म हा भावना आणि अंतःप्रेरणांवर अवलंबून राहतो. त्यामुळे त्यात कित्येकदा भोळसटपणाही येतो. त्याच भोळेपणाला सद्यस्थितीत अंधश्रद्धांची जोड देऊन मूळ धर्माला हरवण्याचे काम करणाऱ्या प्रवृत्ती वाढू लागल्या आहेत, हे चिंताजनक आहे. सत्याचा शोध व वेध घेण्याचे मार्गदर्शन विज्ञान करते तर आत्मिक उन्नतीचा मार्ग धर्म दाखवितो. विज्ञान कारणमीमांसा, प्रयोगशीलता आणि पुरावा याला महत्त्व देते; तर, धर्म श्रद्धा, विचारशुद्धता व नैतिक मूल्यांवर अधिष्ठित असतो. त्यामुळे निसर्गातील अद्यापही न उलगडलेल्या सुप्त शक्ती नेमक्या काय आहेत, याचे उत्तर शोधण्यासाठी धर्म आणि विज्ञान यांची सांगड घालून काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
भवतालाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन पूर्णतः मानवकेंद्री असतो, त्याऐवजी तो पृथ्वीकेंद्री असला पाहिजे, असे सांगून कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, मानवाकडे मूलतः संस्कृती निर्माण करण्याची क्षमता आहे. स्वतःच्या आस्तित्वाबद्दल त्याला पडणारे प्रश्न त्याला इतर प्राणिमात्रांहून वेगळे ठरवतात. आपण कोण आहोत, इथे कसे आलो; हे सारे चक्र नेमके कुठे सुरू झाले आणि याचा शेवट काय होणार, याचे कुतूहल त्याच्या मनी आहे. स्वातंत्र्याची आणि नैतिक मूल्यांची त्याच्यात असलेली जाणीव आणि त्या जाणीवेतून तत्वज्ञानाच्या मार्गावर त्याची शोधयात्रा सुरू आहे.
विज्ञानाने मानवाला सतावत असलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात बरीच मजल मारल्याचे सांगून ते म्हणाले, साधारण १४ अब्ज वर्षांपूर्वी विश्वाची निर्मिती झाली. सूर्य आणि सूर्यमालेची निर्मिती साधारण ५०० कोटी वर्षांपूर्वी तर पृथ्वीची निर्मिती ४५० कोटी वर्षांपूर्वी झाली. पृथ्वीवर पहिला एकपेशीय सजीव निर्माण होण्यासाठी त्यानंतर २०० ते २५० कोटी वर्षे जावी लागली. त्यानंतर ५० कोटी वर्षांपूर्वी पहिला अस्थीमय प्राणी तयार झाला. ४५ कोटी वर्षांपूर्वी पाण्यात माशांचे युग अवतरले तर ३५ कोटी वर्षांपूर्वी सरिसृप वर्गातील प्राणी निर्माण झाला. साधारण २० कोटी वर्षांपूर्वी सस्तन प्राणी आणि पक्ष्यांचे युग अवतरले. त्यानंतर साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पहिला मानवसदृश प्राणी (प्राइमेट) तयार झाला. त्यानंतर होमिनाइडपासून ते आजच्या होमोसेपियन-सेपियन या आधुनिक मानवापर्यंतचा प्रवास पाच वेगवेगळ्या अवस्थांमधून उत्क्रांत झाला. या उत्क्रांतीदरम्यान मानवाच्या मेंदूच्या संरचनेत, क्षमतेत सुमारे ५० टक्के इतकी वृद्धी झाली. तोपर्यंत धरातलावर धर्म ही संकल्पना आस्तित्वात नव्हती. विश्वाची व्याप्ती आणि व्युत्पत्ती धर्माने मर्यादित स्वरुपात मांडली. अग्नीसारखा प्राथमिक शोध, चक्र (चाक) आणि शेतीसारखे मूलभूत शोध लावण्यात त्याचे मोठे योगदान राहिले. विज्ञानाने मात्र साधनांच्या जोरावर पुढची मजल मारली. इथेच धर्म आणि विज्ञान यांच्यातला संघर्ष सुरू होतो. मानवी उत्क्रांतीबरोबर संस्कृतीही विकसित झाली, पण मानवी इतिहासात धर्माचा उदय खूपच उशीराने झाला. विश्वातील सुप्त शक्तींचा शोध घेण्यातील धर्माच्या मर्यादा स्पष्ट झाल्यानंतर देव आणि दैवी शक्तीया संकल्पनांचा उदय झाला. माणूस ही देवाचीच निर्मिती असल्याचा विचार प्रवाह निर्माण झाला. आता तर धर्म आणि देव या संकल्पनांचा उदय कधी झाला, याचेही उत्तर विज्ञान देऊ पाहते आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. सुभाष देसाई यांनी दत्ताबाळ यांच्या कार्याची माहिती देऊन भूमिका स्पष्ट केली. डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. आर. नारायणा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. सविता रासम यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. यु.टी. पवार यांनी आभार मानले.

Friday, 21 March 2014

प्रामाणिक प्रयत्न, व्यावसायिक दृष्टीकोन यांच्या बळावर शैक्षणिक गुणवत्ता साधणे शक्य: डॉ. व्ही.एस. प्रसाद






कोल्हापूर, दि. २१ मार्च: प्रामाणिक प्रयत्न आणि व्यावसायिक दृष्टीकोन यांच्या बळावर निश्चितपणे शैक्षणिक गुणवत्ता साध्य करणे सहजशक्य आहे, असा विश्वास राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेचे (नॅक) माजी संचालक डॉ. व्ही.एस.प्रसाद यांनी आज येथे व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षामार्फत आज उच्चशिक्षणातील गुणवत्ता हमीसाठी संस्थात्मक क्षमता संवर्धन या विषयावर डॉ. प्रसाद यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन.जे. पवार होते.
डॉ. प्रसाद म्हणाले, कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये व्यवस्थापन, तेथील शिक्षक व कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी हे तीन घटक सर्वाधिक महत्त्वाचे असतात. या घटकांमध्ये परस्पर समन्वय आणि विश्वास जितका अधिक तितकी संस्थात्मक विश्वासार्हता अधिक वृद्धिंगत होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे कारभारातील पारदर्शकता, आधुनिक माहिती व्यवस्थापन प्रणालीचा अंगिकार, स्वयं-मूल्यमापन तसेच बाह्य-मूल्यमापन या गोष्टींमुळे संस्थात्मक सुधारणा आणि विश्वासार्हता वाढते. या सर्व गोष्टींमध्ये संस्थात्मक नेतृत्वाचाही महत्त्वाचा वाटा असतो. संस्थेशी निगडित विविध घटकांना पुढाकार घेऊन कामे मार्गी लावण्यास उद्युक्त करण्यात त्यांची भूमिका मोलाची ठरत असते. त्यांनी नागरिकांप्रती आणि विद्यार्थ्यांप्रती संस्थेची बांधिलकी वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहनपर भूमिका घेणे आवश्यक आहे. अपेक्षा आणि साध्यता यांमधील दरी जितक्या गतीने कमी करता येईल, तितक्या गतीने गुणवत्ता वृद्धीच्या दिशेने वाटचाल करणे शक्य होईल. स्वतःच्या क्षमता आणि मर्यादा ओळखून, मर्यादांवर कशी मात करता येईल, यांवरही गुणवत्ता वाढ अवलंबून असल्याचे डॉ. प्रसाद यांनी सांगितले.
यावेळी कुलगुरू डॉ. पवार म्हणाले की, संस्थेमध्ये परस्परविश्वास आणि संघभावनेचे वातावरण निर्माण झाले की गुणवत्ता हमीच्या दिशेने आपण अधिक जोमाने पावले टाकू शकतो. सर्वच पातळ्यांवर गुणवत्ता साध्य करण्याची आकांक्षा बाळगून त्या दिशेने संस्थेशी संबंधित सर्वच घटकांच्या कामाचा दर्जा कसा वाढविता येईल आणि त्यांच्या कामाचा एकत्रित परिणाम कसा साधता येईल, या दिशेने संस्थात्मक पातळीवर काम झाल्यास गुणवत्ता साध्य करणे अवघड जाणार नाही.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. ए.एस. भोईटे यांनी प्रास्ताविक केले तर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. व्ही.बी. जुगळे यांनी आभार मानले. यावेळी बीसीयुडी संचालक डॉ. अर्जुन राजगे, परीक्षा नियंत्रक डॉ. बी.एम. हिर्डेकर, वित्त व लेखाधिकारी श्री. व्ही.टी. पाटील, विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. बी.पी. साबळे आणि विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिविभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामाजिक गरजांनुसार भाषाविषयक धोरणांत बदल आवश्यक: डॉ. रमेश धोंगडे



शिवाजी विद्यापीठात भाषावार प्रांतरचनाविषयक राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन



कोल्हापूर, दि. २१ मार्च: समाजाच्या गरजांनुसार भाषाविषयक धोरणे बदलली पाहिजेत. तसे झाले तरच भाषेची समृद्धी योग्य दिशेने होत राहील, असे प्रतिपादन ज्येष्ठ भाषा वैज्ञानिक डॉ. रमेश धोंगडे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भाषावार प्रांतरचना: मराठी भाषा-बोली आणि अल्पसंख्याकांचे भाषिक प्रश्न या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी बीजभाषक म्हणून ते बोलत होते. वि.स. खांडेकर भाषा भवनात झालेल्या या कार्यक्रमात विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक डॉ. ए.बी. राजगे अध्यक्षस्थानी होते.
डॉ. धोंगडे म्हणाले, भाषेच्या संदर्भात बोलत असताना भाषा आणि बोली हे दोन फसवे शब्द आहेत. त्यांना कोणता शास्त्रीय आधारही नाही. केवळ वेगवेगळी नावे देऊन ते तरतील, असे होणार नाही. प्रत्यक्षात राजकीय निर्णयांमुळेच भाषेची बोली आणि बोलीची भाषा ही स्थित्यंतरे होत असतात. प्रत्येक भाषेची आणि बोलीची शैली वेगवेगळी आहे. त्यासंदर्भात अधिक संशोधन होणे गरजेचे असते. संशोधन न झाल्यास त्यांच्यासंदर्भातील कोणताही निर्णय हा त्यांच्या आस्तित्वासाठीच धोकादायक ठरू शकतो. भाषेच्या बाबतीतले सर्वच निर्णय राजकीय पातळीवर घेतले गेल्यास अडचणी वाढतील. तथापि, प्रमाण भाषा ही सर्वच व्यवस्थांमध्ये आवश्यक असते. त्यामुळे शासकीय आणि संस्थागत पातळीवर भाषासमृद्धीच्या दिशेने प्रयत्न सुरूच ठेवले पाहिजेत.
डॉ. धोंगडे पुढे म्हणाले, अल्पसंख्य भाषा म्हणजे नष्ट होणारी भाषा, असेही म्हणता येणार नाही. कारण संबंधित समूहगटात जोपर्यंत त्या भाषेचा वापर सुरू आहे, तोपर्यंत तिचे अस्तित्व नाकारणे योग्य नाही. राजकीय निर्णयांत बरेचदा अपरिहार्यता असते, ही गोष्ट लक्षात घेऊन आपण भाषेच्या वृद्धीसाठी तिची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. इतर प्राणिमात्रांत संप्रेषण क्षमता असते, पण मानवाला भाषेची निसर्गदत्त देणगी लाभली आहे. जन्मलेल्या मुलाच्या कानावर भाषा पडत राहिली पाहिजे, ही त्यासाठीची पूर्वअट आहे. वयाच्या १५व्या वर्षानंतर ही क्षमता कमी होते, हे लक्षात घेऊन तोपर्यंतच्या कालखंडात व्यक्तिगत, सामाजिक पातळीवर भाषासमृद्धीला गती दिली पाहिजे.
अध्यक्षीय भाषणात डॉ. राजगे यांनी भाषेचे अस्तित्व आणि विकास यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, ज्या बोलीला लिपी मिळाली, तिचा भाषा स्वरुपात अधिक गतीने विकास होत गेला. म्हणून इतर भाषा लोप पावल्या असे होत नाही; त्यांचा हवा तितका विकास होत नाही, इतकेच! भाषिक अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवर, समस्यांवर भाषातज्ज्ञांनी गांभिर्याने विचारविमर्श करण्याची गरज आहे.
सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून डॉ. धोंगडे यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. अशोक सोलनकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. आंबेडकर केंद्राचे संचालक डॉ. कृष्णा किरवले यांनी चर्चासत्र आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. चर्चासत्राचे समन्वयक डॉ. प्रकाश कुंभार यांनी आभार मानले.

यशोमुद्रा आणि यशोवेणू
महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे परिपूर्ण असे दोन नवीन टंक निर्माण करण्यात आले असून यशोमुद्रा आणि यशोवेणू असे त्यांचे नामकरण करण्यात आले आहे. येत्या दोन महिन्यांत त्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच येत्या वर्षभरात एकूण ५ नवीन टंक निर्माण करण्यात येणार आहेत, अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. अशोक सोलनकर यांनी यावेळी दिली. मराठी भाषेच्या वृद्धीसाठी चांगल्या योजना व उपक्रमांचेही स्वागत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.