Friday, 21 March 2014

सामाजिक गरजांनुसार भाषाविषयक धोरणांत बदल आवश्यक: डॉ. रमेश धोंगडे



शिवाजी विद्यापीठात भाषावार प्रांतरचनाविषयक राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन



कोल्हापूर, दि. २१ मार्च: समाजाच्या गरजांनुसार भाषाविषयक धोरणे बदलली पाहिजेत. तसे झाले तरच भाषेची समृद्धी योग्य दिशेने होत राहील, असे प्रतिपादन ज्येष्ठ भाषा वैज्ञानिक डॉ. रमेश धोंगडे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भाषावार प्रांतरचना: मराठी भाषा-बोली आणि अल्पसंख्याकांचे भाषिक प्रश्न या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी बीजभाषक म्हणून ते बोलत होते. वि.स. खांडेकर भाषा भवनात झालेल्या या कार्यक्रमात विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक डॉ. ए.बी. राजगे अध्यक्षस्थानी होते.
डॉ. धोंगडे म्हणाले, भाषेच्या संदर्भात बोलत असताना भाषा आणि बोली हे दोन फसवे शब्द आहेत. त्यांना कोणता शास्त्रीय आधारही नाही. केवळ वेगवेगळी नावे देऊन ते तरतील, असे होणार नाही. प्रत्यक्षात राजकीय निर्णयांमुळेच भाषेची बोली आणि बोलीची भाषा ही स्थित्यंतरे होत असतात. प्रत्येक भाषेची आणि बोलीची शैली वेगवेगळी आहे. त्यासंदर्भात अधिक संशोधन होणे गरजेचे असते. संशोधन न झाल्यास त्यांच्यासंदर्भातील कोणताही निर्णय हा त्यांच्या आस्तित्वासाठीच धोकादायक ठरू शकतो. भाषेच्या बाबतीतले सर्वच निर्णय राजकीय पातळीवर घेतले गेल्यास अडचणी वाढतील. तथापि, प्रमाण भाषा ही सर्वच व्यवस्थांमध्ये आवश्यक असते. त्यामुळे शासकीय आणि संस्थागत पातळीवर भाषासमृद्धीच्या दिशेने प्रयत्न सुरूच ठेवले पाहिजेत.
डॉ. धोंगडे पुढे म्हणाले, अल्पसंख्य भाषा म्हणजे नष्ट होणारी भाषा, असेही म्हणता येणार नाही. कारण संबंधित समूहगटात जोपर्यंत त्या भाषेचा वापर सुरू आहे, तोपर्यंत तिचे अस्तित्व नाकारणे योग्य नाही. राजकीय निर्णयांत बरेचदा अपरिहार्यता असते, ही गोष्ट लक्षात घेऊन आपण भाषेच्या वृद्धीसाठी तिची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. इतर प्राणिमात्रांत संप्रेषण क्षमता असते, पण मानवाला भाषेची निसर्गदत्त देणगी लाभली आहे. जन्मलेल्या मुलाच्या कानावर भाषा पडत राहिली पाहिजे, ही त्यासाठीची पूर्वअट आहे. वयाच्या १५व्या वर्षानंतर ही क्षमता कमी होते, हे लक्षात घेऊन तोपर्यंतच्या कालखंडात व्यक्तिगत, सामाजिक पातळीवर भाषासमृद्धीला गती दिली पाहिजे.
अध्यक्षीय भाषणात डॉ. राजगे यांनी भाषेचे अस्तित्व आणि विकास यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, ज्या बोलीला लिपी मिळाली, तिचा भाषा स्वरुपात अधिक गतीने विकास होत गेला. म्हणून इतर भाषा लोप पावल्या असे होत नाही; त्यांचा हवा तितका विकास होत नाही, इतकेच! भाषिक अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवर, समस्यांवर भाषातज्ज्ञांनी गांभिर्याने विचारविमर्श करण्याची गरज आहे.
सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून डॉ. धोंगडे यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. अशोक सोलनकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. आंबेडकर केंद्राचे संचालक डॉ. कृष्णा किरवले यांनी चर्चासत्र आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. चर्चासत्राचे समन्वयक डॉ. प्रकाश कुंभार यांनी आभार मानले.

यशोमुद्रा आणि यशोवेणू
महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे परिपूर्ण असे दोन नवीन टंक निर्माण करण्यात आले असून यशोमुद्रा आणि यशोवेणू असे त्यांचे नामकरण करण्यात आले आहे. येत्या दोन महिन्यांत त्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच येत्या वर्षभरात एकूण ५ नवीन टंक निर्माण करण्यात येणार आहेत, अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. अशोक सोलनकर यांनी यावेळी दिली. मराठी भाषेच्या वृद्धीसाठी चांगल्या योजना व उपक्रमांचेही स्वागत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment