कोल्हापूर, दि. २१ मार्च: प्रामाणिक प्रयत्न आणि व्यावसायिक दृष्टीकोन यांच्या बळावर निश्चितपणे शैक्षणिक गुणवत्ता साध्य करणे सहजशक्य आहे, असा विश्वास ‘राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदे’चे (नॅक) माजी संचालक डॉ. व्ही.एस.प्रसाद यांनी आज येथे व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षामार्फत आज ‘उच्चशिक्षणातील गुणवत्ता हमीसाठी संस्थात्मक क्षमता संवर्धन’ या विषयावर डॉ. प्रसाद यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन.जे. पवार होते.
डॉ. प्रसाद म्हणाले, कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये व्यवस्थापन, तेथील शिक्षक व कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी हे तीन घटक सर्वाधिक महत्त्वाचे असतात. या घटकांमध्ये परस्पर समन्वय आणि विश्वास जितका अधिक तितकी संस्थात्मक विश्वासार्हता अधिक वृद्धिंगत होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे कारभारातील पारदर्शकता, आधुनिक माहिती व्यवस्थापन प्रणालीचा अंगिकार, स्वयं-मूल्यमापन तसेच बाह्य-मूल्यमापन या गोष्टींमुळे संस्थात्मक सुधारणा आणि विश्वासार्हता वाढते. या सर्व गोष्टींमध्ये संस्थात्मक नेतृत्वाचाही महत्त्वाचा वाटा असतो. संस्थेशी निगडित विविध घटकांना पुढाकार घेऊन कामे मार्गी लावण्यास उद्युक्त करण्यात त्यांची भूमिका मोलाची ठरत असते. त्यांनी नागरिकांप्रती आणि विद्यार्थ्यांप्रती संस्थेची बांधिलकी वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहनपर भूमिका घेणे आवश्यक आहे. अपेक्षा आणि साध्यता यांमधील दरी जितक्या गतीने कमी करता येईल, तितक्या गतीने गुणवत्ता वृद्धीच्या दिशेने वाटचाल करणे शक्य होईल. स्वतःच्या क्षमता आणि मर्यादा ओळखून, मर्यादांवर कशी मात करता येईल, यांवरही गुणवत्ता वाढ अवलंबून असल्याचे डॉ. प्रसाद यांनी सांगितले.
यावेळी कुलगुरू डॉ. पवार म्हणाले की, संस्थेमध्ये परस्परविश्वास आणि संघभावनेचे वातावरण निर्माण झाले की गुणवत्ता हमीच्या दिशेने आपण अधिक जोमाने पावले टाकू शकतो. सर्वच पातळ्यांवर गुणवत्ता साध्य करण्याची आकांक्षा बाळगून त्या दिशेने संस्थेशी संबंधित सर्वच घटकांच्या कामाचा दर्जा कसा वाढविता येईल आणि त्यांच्या कामाचा एकत्रित परिणाम कसा साधता येईल, या दिशेने संस्थात्मक पातळीवर काम झाल्यास गुणवत्ता साध्य करणे अवघड जाणार नाही.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. ए.एस. भोईटे यांनी प्रास्ताविक केले तर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. व्ही.बी. जुगळे यांनी आभार मानले. यावेळी बीसीयुडी संचालक डॉ. अर्जुन राजगे, परीक्षा नियंत्रक डॉ. बी.एम. हिर्डेकर, वित्त व लेखाधिकारी श्री. व्ही.टी. पाटील, विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. बी.पी. साबळे आणि विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिविभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment