Tuesday, 25 March 2014

धर्म व विज्ञानाचे अंतिम ध्येय एकच; मांडण्याच्या पद्धतीत फरक : कुलगुरू डॉ. एन.जे. पवार




कोल्हापूर, दि. २५ मार्च: धर्म आणि विज्ञान या दोहोंच्या मुळाशी मानव आणि त्याचे विश्वाबद्दलचे कुतूहल या गोष्टी असून त्यांचे अंतिम ध्येय एकच असले तरी संकल्पना मांडण्याच्या पद्धतीमध्ये मात्र मूलभूत फरक आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.जे. पवार यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठ आणि शहाजी लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या श्री दत्ताबाळ स्मृती व्याख्यानमालेधर्म आणि विज्ञान या विषयावर ते बोलत होते. लॉ कॉलेजच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौन्सिल ऑफ एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम होत्या.
सुमारे दीड तास रंगलेल्या आपल्या भाषणात कुलगुरू डॉ. पवार यांनी विश्वाची निर्मिती, त्यातील मानवाचे स्थान आणि त्याच्या जीवनातील धर्म व विज्ञान यांची अतिशय शास्त्रशुद्ध मांडणी करून उपस्थितांना अंतर्मुख केले. ते म्हणाले, विज्ञान नेहमीच बुद्धिप्रामाण्यवादाला महत्त्व देते तर धर्म हा भावना आणि अंतःप्रेरणांवर अवलंबून राहतो. त्यामुळे त्यात कित्येकदा भोळसटपणाही येतो. त्याच भोळेपणाला सद्यस्थितीत अंधश्रद्धांची जोड देऊन मूळ धर्माला हरवण्याचे काम करणाऱ्या प्रवृत्ती वाढू लागल्या आहेत, हे चिंताजनक आहे. सत्याचा शोध व वेध घेण्याचे मार्गदर्शन विज्ञान करते तर आत्मिक उन्नतीचा मार्ग धर्म दाखवितो. विज्ञान कारणमीमांसा, प्रयोगशीलता आणि पुरावा याला महत्त्व देते; तर, धर्म श्रद्धा, विचारशुद्धता व नैतिक मूल्यांवर अधिष्ठित असतो. त्यामुळे निसर्गातील अद्यापही न उलगडलेल्या सुप्त शक्ती नेमक्या काय आहेत, याचे उत्तर शोधण्यासाठी धर्म आणि विज्ञान यांची सांगड घालून काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
भवतालाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन पूर्णतः मानवकेंद्री असतो, त्याऐवजी तो पृथ्वीकेंद्री असला पाहिजे, असे सांगून कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, मानवाकडे मूलतः संस्कृती निर्माण करण्याची क्षमता आहे. स्वतःच्या आस्तित्वाबद्दल त्याला पडणारे प्रश्न त्याला इतर प्राणिमात्रांहून वेगळे ठरवतात. आपण कोण आहोत, इथे कसे आलो; हे सारे चक्र नेमके कुठे सुरू झाले आणि याचा शेवट काय होणार, याचे कुतूहल त्याच्या मनी आहे. स्वातंत्र्याची आणि नैतिक मूल्यांची त्याच्यात असलेली जाणीव आणि त्या जाणीवेतून तत्वज्ञानाच्या मार्गावर त्याची शोधयात्रा सुरू आहे.
विज्ञानाने मानवाला सतावत असलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात बरीच मजल मारल्याचे सांगून ते म्हणाले, साधारण १४ अब्ज वर्षांपूर्वी विश्वाची निर्मिती झाली. सूर्य आणि सूर्यमालेची निर्मिती साधारण ५०० कोटी वर्षांपूर्वी तर पृथ्वीची निर्मिती ४५० कोटी वर्षांपूर्वी झाली. पृथ्वीवर पहिला एकपेशीय सजीव निर्माण होण्यासाठी त्यानंतर २०० ते २५० कोटी वर्षे जावी लागली. त्यानंतर ५० कोटी वर्षांपूर्वी पहिला अस्थीमय प्राणी तयार झाला. ४५ कोटी वर्षांपूर्वी पाण्यात माशांचे युग अवतरले तर ३५ कोटी वर्षांपूर्वी सरिसृप वर्गातील प्राणी निर्माण झाला. साधारण २० कोटी वर्षांपूर्वी सस्तन प्राणी आणि पक्ष्यांचे युग अवतरले. त्यानंतर साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पहिला मानवसदृश प्राणी (प्राइमेट) तयार झाला. त्यानंतर होमिनाइडपासून ते आजच्या होमोसेपियन-सेपियन या आधुनिक मानवापर्यंतचा प्रवास पाच वेगवेगळ्या अवस्थांमधून उत्क्रांत झाला. या उत्क्रांतीदरम्यान मानवाच्या मेंदूच्या संरचनेत, क्षमतेत सुमारे ५० टक्के इतकी वृद्धी झाली. तोपर्यंत धरातलावर धर्म ही संकल्पना आस्तित्वात नव्हती. विश्वाची व्याप्ती आणि व्युत्पत्ती धर्माने मर्यादित स्वरुपात मांडली. अग्नीसारखा प्राथमिक शोध, चक्र (चाक) आणि शेतीसारखे मूलभूत शोध लावण्यात त्याचे मोठे योगदान राहिले. विज्ञानाने मात्र साधनांच्या जोरावर पुढची मजल मारली. इथेच धर्म आणि विज्ञान यांच्यातला संघर्ष सुरू होतो. मानवी उत्क्रांतीबरोबर संस्कृतीही विकसित झाली, पण मानवी इतिहासात धर्माचा उदय खूपच उशीराने झाला. विश्वातील सुप्त शक्तींचा शोध घेण्यातील धर्माच्या मर्यादा स्पष्ट झाल्यानंतर देव आणि दैवी शक्तीया संकल्पनांचा उदय झाला. माणूस ही देवाचीच निर्मिती असल्याचा विचार प्रवाह निर्माण झाला. आता तर धर्म आणि देव या संकल्पनांचा उदय कधी झाला, याचेही उत्तर विज्ञान देऊ पाहते आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. सुभाष देसाई यांनी दत्ताबाळ यांच्या कार्याची माहिती देऊन भूमिका स्पष्ट केली. डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. आर. नारायणा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. सविता रासम यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. यु.टी. पवार यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment