‘संशोधन पद्धती’विषयक राष्ट्रीय परिसंवादाचे शिवाजी विद्यापीठात उद्घाटन
कोल्हापूर, दि. २० मार्च: विसावे शतक हे जीवशास्त्रीय आणि भौतिकीय संशोधनाचे होते, तर एकविसावे शतक हे समाजशास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे मत व्यवस्थापन शास्त्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. आनंद करंदीकर यांनी आज येथे व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाचा शिक्षणशास्त्र अधिविभाग आणि इंडियन कौन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्च, मुंबई (आयसीएसएसआर) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रिसर्च मेथडॉलॉजी, एथिकल कन्सिडरेशन्स इन एज्युकेशन ॲन्ड सोशल सायन्स रिसर्च’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन.जे. पवार होते. मानव्यविद्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.

इंटरनेटसारख्या माध्यमामुळे आज आपल्याकडे विविध प्रकारचा डाटा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्या सर्व माहितीचे योग्य व्यवस्थापन आणि विश्लेषण पद्धतींचा विकास करण्याची गरज असल्याचे सांगून डॉ. करंदीकर म्हणाले, या सर्व प्रकारच्या उपलब्ध माहितीच्या अनुषंगाने आपण जोपर्यंत शास्त्रीय प्रश्न उपस्थित करत नाही आणि मिळालेल्या उत्तरांचे विश्लेषण करत नाही, तोपर्यंत त्यातून योग्य संशोधन साकार होणार नाही. संख्यात्मक संशोधनापेक्षा गुणात्मक व अर्थपूर्ण संशोधन होण्याची गरज आज निर्माण झाली आहे. प्रादेशिक भाषांतून संशोधनाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.
दर्जेदार संशोधन संस्कृतीचा अद्याप आपल्याकडे विकास झालेला नाही. ती विकसित करण्यासाठी बुद्धीजीवी वर्गाचे परस्पर साहचर्य, वाद-संवाद या गोष्टी अत्यावश्यक असून ज्ञानाची भूक असणारा विद्यार्थी घडविल्याखेरीज दर्जेदार संशोधन संस्कृतीची निर्मिती अशक्य असल्याचेही डॉ. करंदीकर यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, संशोधकांनी संशोधनाकडे पाहण्याचा पारंपरिक, संकुचित दृष्टीकोन बदलून अधिक व्यापक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स’मधील विषय आपल्या संशोधनाचे विषय व्हायला हवेत. केवळ पदवी मिळविणे इतके मर्यादित ध्येय बाळगणाऱ्या आणि पीएच.डी. हे प्राथमिक संशोधन न मानता अखेरचा टप्पा मानणाऱ्या संशोधकांमुळे विद्यापीठीय संशोधनाचा एकूणच दर्जा खालावत चालला आहे. केवळ नेट-सेट परीक्षांना पर्याय आणि एपीआय गुणांक वाढविण्याचे साधन म्हणून संशोधनाकडे पाहिले जात असल्यामुळेही चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. संशोधकांनी संशोधकीय विश्वासार्हता आणि उच्च नैतिक मूल्यांची जोपासना करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ. एम.एस. पद्मिनी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. एन.आर. सप्रे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. रुपाली संकपाळ, डॉ. एम.व्ही. गुळवणी, डॉ. पी.एस. पाटणकर, डॉ. शरद नावरे, डॉ. निशा पवार, डॉ. वासंती रासम आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment