Wednesday, 30 April 2014

शिवाजी विद्यापीठात व्यापक वृक्षगणना सुरू



   
पर्यावरण शास्त्र विभागाचा उपक्रम
 कोल्हापूर, दि. २९ एप्रिल: परिसरातला कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजनचा पुरवठा करणारा शिवाजी विद्यापीठाचा परिसर जणू कोल्हापूर शहराचे फुप्फुसच आहे. पण, या फुप्फुसाची कार्बन शोषून घेण्याची नेमकी क्षमता किती आहे, याचा आता शास्त्रशुद्ध अभ्यास केला जात आहे. विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाने विद्यापीठाच्या ८५२ एकर क्षेत्रावरील वृक्षगणना करण्याचा आणि या वृक्षांच्या प्रजातींनुसार त्यांच्या आणि पर्यायाने संपूर्ण परिसराच्या कार्बन ग्रहण क्षमता मापनाचा शास्त्रीय उपक्रम हाती घेतला आहे.
गेल्या काही वर्षांत विद्यापीठांतील विविध विभाग आणि संबंधित घटकांनी विद्यापीठ परिसरात वृक्षलागवड केली आहे. यामध्ये विद्यापीठाचा उद्यान विभाग, पर्यावरण शास्त्र विभाग, वनस्पतीशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांचा समावेश आहे. या सर्व विभागांच्या प्रयत्नांमुळे विद्यापीठ परिसर हरित होऊन पर्यावरण पूरक होण्यास मदत झाली आहे. पर्यावरण शास्त्र विभागाच्या वृक्षगणनेच्या उपक्रमातून सर्व जुन्या-नव्या वृक्षसंपदेची गणना होऊन त्यांच्या निसर्ग संतुलनातील महत्त्वपूर्ण कार्याची नोंद होणार आहे.
या उपक्रमासंदर्भात माहिती देताना पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. पी.डी. राऊत म्हणाले की, जागतिक तापमानवाढीस कारणीभूत असणाऱ्या हरितगृह वायूंपैकी (Green House Gases) एक असलेल्या कार्बन डायऑक्साईडचे वातावरणातील वाढलेले प्रमाण कमी करण्यासाठी सध्या जगभर संशोधन सुरू आहे. त्या संशोधनाचाच एक भाग म्हणून जंगले, वने, गवताळ कुरणे यांची कार्बन शोषून घेण्याची क्षमता तपासणे आणि अशा कार्बन कुंडांचे (Carbon Sink) संवर्धन करणे आदी गोष्टी केल्या जात आहेत. निसर्गातील अशा विविध घटकांच्या कार्बन शोषून घेण्याच्या क्षमतेला कार्बन ग्रहण क्षमता (Carbon Sequestration Potential) असे म्हणतात. जागतिक तापमानवाढीच्या समस्येवर मात करण्यासाठी या संकल्पनेकडे मोठ्या आशेने पाहिले जात आहे.
जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून गेल्या २२ एप्रिलपासून पर्यावरण शास्त्र विभागाने सदर वृक्षगणनेला प्रारंभ केला आहे. याअंतर्गत परिसरातील सर्व वृक्षांची गणना, प्रजातींची नोंद, त्यांच्या खोडाचा परीघ, उंची या बाबींचे मापन करण्यात येत असून त्यावरुन त्यांचे जैव-वस्तुमान (बायोमास) काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर झाडाचा फुलोरा, फळे, पक्ष्यांची घरटी, मधमाशांचे पोळे, कीटकांची नोंद आदी परिसंस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबींची देखील मोजदाद करण्यात येणार आहे. या अभ्यासातून विद्यापीठ परिसरातील वृक्षसंपदेचे व अनुषंगिक परिसंस्थेच्या सद्यस्थितीचे आकलन होण्यास मदत होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या वृक्षगणनेतून विद्यापीठ परिसराच्या कार्बन ग्रहण क्षमतेचे मापन होऊन हा परिसर किती प्रमाणात हरितगृह वायूंचे शोषण करू शकतो, हे पुढे येईल आणि विद्यापीठ परिसर कोल्हापूर शहराचे फुप्फुस म्हणून सक्षमपणे काम करीत असल्याचे सिद्ध होईल, असा विश्वास प्रा. राऊत यांनी व्यक्त केला.
या उपक्रमात विभागातील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक विद्यार्थी आणि पदव्युत्तर विभागातील सुमारे शंभर विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या उपक्रमासाठी कुलगुरू डॉ. एन.जे. पवार, प्र-कुलगुरू डॉ. ए.एस. भोईटे, कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. डी.के. गायकवाड, उद्यान विभागाचे उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे व कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत असल्याचे प्रा. राऊत यांनी सांगितले.

Wednesday, 23 April 2014

जातिनिर्मूलन हे राष्ट्राचे उद्दिष्ट बनावे: भाई वैद्य



शिवाजी विद्यापीठ: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे व्याख्यानमाला

कोल्हापूर, दि. २३ एप्रिल: जातिनिर्मूलनाखेरीज आपले राष्ट्र बलवान होऊ शकणार नाही. त्यासाठी जातिनिर्मूलन हे राष्ट्राचे उद्दिष्ट बनले पाहिजे. भारत हे जातिविरहित सार्वभौम प्रजासत्ताक बनविण्याच्या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनातर्फे आयोजित महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे सामाजिक व राजकीय कार्य या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. ए.एस. भोईटे होते.
भाई वैद्य म्हणाले, अस्पृश्यता निर्मूलन हा महर्षी शिंदे यांच्या कृतीशील सामाजिक कार्याचा प्रमुख ध्यास होता. लोकमान्य टिळक यांच्यासारख्या दुर्दम्य महापुरूषाचा विरोध असतानाही काँग्रेसला अस्पृश्यता निवारणाचा ठराव करायला भाग पाडणे, ही सोपी गोष्ट नव्हती. ती महर्षींनी साध्य केली. व्हॉईसरॉयपासून ते अगदी कमिशनरपर्यंत अस्पृश्यता निवारणासाठी अखंड पाठपुरावा करून सामाजिक समतेच्या लढ्याला प्रचंड गती देण्याचे महत्तम कार्य महर्षींनी केले. त्याचप्रमाणे आधी सामाजिक स्वातंत्र्य की राजकीय?’ या वादग्रस्त विषयावर आंबेडकर, आगरकर आदी प्रभृतींप्रमाणेच अस्पृश्यता निवारणाच्या प्रश्नालाच त्यांनी प्राधान्य दिले. केवळ मागासवर्गीयांना राखीव मतदारसंघ द्यावेत, पण जातवार मतदारसंघाला विरोध करण्याचे धैर्य त्यांनी दाखविले. आजघडीला भारतात असलेल्या पाच हजार जाती आणि त्याहून अधिक उपजाती पाहता त्यांची भूमिका किती उचित होती, हे लक्षात येते.
समाजकारण आणि राजकारण या दोन्ही बाबतीत जहाल भूमिका घेणारे महर्षी शिंदे हे तत्कालीन परिस्थितीतील अनोखे नेतृत्व असल्याचे सांगून श्री. वैद्य म्हणाले, महर्षींचा अद्वैतवादी जागतिक दृष्टीकोन आजच्या काळात समजून घेण्याची नितांत गरज आहे. त्यांचा अद्वैतवाद हा शंकराचार्यांप्रमाणे पारमार्थिक नव्हता, तर लौकिक सामाजिक व राजकीय होता. जगभरात आज जाती-जमाती, वंश, भाषा, प्रांत यांच्या द्वैताची आणि द्वंद्वाची भाषा सुरू आहे. वर्गकलह, वर्गद्वंद्व ही आजची वस्तुस्थिती आहे. जागतिकीकरणाच्या माध्यमातून या द्वंद्वाला अधिकच खतपाणी घातले जाते आहे. या पार्श्वभूमीवर त्या काळात या भूमीची भावना वसुधैव कुटुम्बकम् अशी कधी होणार?, याची चिंता महर्षी शिंदे यांना भेडसावत होती. ती चिंता आजही अधिक ठळकपणे अधोरेखित झाली आहे.
ऐहिक सुखाला नीतीचा आधार नसेल तर जगाचे कसे होणार?, हा सुद्धा महर्षींच्या चिंतेचा विषय असल्याचे सांगून भाई वैद्य म्हणाले, राजकारण, समाजकारण, धर्मकारण अशा कोणत्याही क्षेत्रात काम करीत असताना त्याला नैतिक अधिष्ठान देण्याचा विचार आपल्याला करावाच लागेल, अशा मताचे ते होते. त्या अर्थाने महर्षी हे आध्यात्मवादी ठरतात. पण तेवढ्यापुरतेच. कारण त्यांनी कधीही अवतार, धर्मप्रामाण्य किंवा मूर्तीपूजा मानली नाही. पण आपल्या सर्वव्यापी कार्याला नीतीचे अधिष्ठान असलेच पाहिजे, यासाठी मात्र ते आग्रही राहिले. राजकारणातील ढासळणारी नैतिकता हा सुद्धा त्यांच्या चिंतेचा विषय होता.
स्त्रियांच्या प्रश्नांबाबतही महर्षी शिंदे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण, सकारात्मक व प्रसंगी आक्रमक भूमिका घेतल्याचे सांगून श्री. वैद्य म्हणाले, सर्वच धर्मांनी जनमानसात स्त्रीचे दुय्यमत्व रुजविण्याचे काम केले. ख्रिश्चनांच्या मते, आधी ॲडम जन्मला आणि नंतर त्याच्या बरगडीतून इव्ह निर्माण झाली. इस्लाममध्ये स्त्रीला कधी कधीसन्मान द्या, असे सांगितले जाते. मनुस्मृती तर शूद्र, अतिशूद्र आणि महिला यांच्या गुलामगिरीचा जाहीरनामाच आहे. हे दुय्यमत्व स्त्रियांनी झुगारून दिले पाहिजे, त्यांची या मानसिकतेमधून सुटका झाली पाहिजे, यासाठी महर्षींनी या देशाचा दौरा करून इथे पूर्वापार मातृसत्ताक पद्धती आस्तित्वात होती, याचे संशोधनपर पुरावे गोळा केले. पुणे नगरपरिषदेने केवळ मुलांसाठी सक्तीच्या शिक्षणाचा ठराव केला; त्यात मुलींचाही समावेश करावा, यासाठी महर्षी शिंदे यांनी प्रचंड संघर्ष उभारला आणि यश मिळविले. देवाला मुरळी वाहण्याच्या प्रथेविरोधात कार्य करत असताना त्यांच्यावर हल्लाही झाला. महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याचा वसा खऱ्या अर्थाने पुढे चालविण्याचे कार्य महर्षी शिंदे यांनी केले.
याखेरीज दुष्काळग्रस्तांच्या पुनर्वसनाचे कार्य, गुन्हेगार समजल्या गेलेल्या मातंग समाजाच्या पुनरुत्थानाचे कार्य, शेतकरी व कामगारांच्या संदर्भातील महर्षींचे चौफेर कार्य याविषयीही भाई वैद्य यांनी व्यापक विचार मांडले.
यावेळी चंद्रकांत बोंद्रे यांनी अध्यासनासाठी एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली. याबद्दल प्र-कुलगुरू डॉ. भोईटे यांनी त्यांना धन्यवाद दिले. सुरवातीला अध्यासनाचे समन्वयक डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे यांनी आभार मानले. सीमा मुसळे यांनी सूत्रसंचालन केले. व्याख्यानास डॉ. एन.डी. पाटील, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. गो.मा. पवार, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर उपस्थित होते.
लोकशाहीची वाटचाल धनाढ्यशाहीकडे
आपल्या देशात एकीकडे अंबानींची संपत्ती चार लाख कोटींची आहे, तर दुसरीकडे ७६ टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली आहे. अशा परिस्थितीत आपल्या लोकशाही व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात सामाजिक व आर्थिक द्वैत माजले आहे. त्यामुळे इथल्या लोकशाहीची वाटचाल धनाढ्यशाहीकडे अधिक जोमाने होऊ लागली आहे, ही चिंतेची बाब असल्याचे मत भाई वैद्य यांनी यावेळी व्यक्त केले.


Tuesday, 22 April 2014

भर उन्हात फुलली नेत्रसुखद हिरवळ!



शिवाजी विद्यापीठाच्या उद्यान विभागाची कामगिरी



कोल्हापूर, दि. २२ एप्रिल: अवकाळी पावसाचा मारा झाला असला तरी उन्हाचा तडाखा आणि हवेतील उष्मा मात्र कमी झालेला नाही. अशा वेळी शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात मात्र उद्यान विभागाच्या कामगिरीमुळे नेत्रसुखद हिरवळ वाढली असल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे येत्या पावसाळ्यात विद्यापीठ परिसरात लावावयाची रोपे सुद्धा इथल्याच रोपवाटिकेमध्ये (नर्सरी) जोमाने वाढत आहेत.
काही वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयामोरील नूतन हिरवळयुक्त बगिचा हा विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि कौतुकाचा विषय बनला होता. पण त्यावरील सदोदित वावर आणि पाण्याच्या कमतरतेमुळे ती कोमेजली आणि त्याठिकाणी भकासपणा आला होता. तथापि, यंदा मात्र विद्यापीठाच्या उद्यान विभागाचे उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन उद्यान अधीक्षक बाबा कदम आणि आता नव्याने रुजू झालेले अधीक्षक अभिजीत जाधव यांनी विद्यापीठाला हिरवे वैभव पुन्हा प्राप्त करून देण्याचा विडा उचलला आणि त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमाला यशही आल्याचे दिसत आहे.
सिंचन व्यवस्थेचे पुनरुज्जीवन



विद्यापीठात सन २००६-०७मध्ये ठिबक सिंचन यंत्रणा बसविण्यात आली होती. परंतु, दरम्यानच्या काळात मनुष्यबळाअभावी ती नादुरुस्त होती. गेल्या ऑक्टोबरमध्ये ही यंत्रणा पूर्ववत सुरू करण्यात आली आणि तिच्या माध्यमातून विद्यापीठ परिसरातील हिरवाई टवटवीत राहू लागली. विशेष म्हणजे स्वच्छ पाण्याऐवजी पूर्णतः सांडपाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा वापर उद्यान व झाडांसाठी केला जातो. यासाठी विद्यार्थिनी वसतिगृहाच्या पाठीमागे सुमारे दहा हजार लीटर क्षमतेचा रिसायक्लिंग प्लँट उभारण्यात आला आहे. तिथून पाणी उचलून उद्यानातील उत्तर सर्कलमध्ये घेतले जाते. तिथून ते सर्कलमधील चिंच, आंबा, सभोवतीचा गोल्डन ड्युरांडा, ग्रंथालयासमोरील उद्यान, भूगोल विभागामागील आमराई, कर्मवीर भाऊराव पाटील उद्यान याठिकाणी सिंचन यंत्रणेमार्फत पुरविले जाते. आवश्यक तेथे स्प्रिंकलरही बसविले आहेत.
दक्षिण सर्कलमध्येही राजाराम तलावातील पाणी आणले जाते. तिथून उचलून ते रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणिशास्त्र या अधिविभागांसमोरील बगिचांबरोबरच संपूर्ण दक्षिण सर्कलमधील झाडांना ठिबक सिंचनाद्वारे पुरविले जाते. भौतिकशास्त्र विभागासमोरील बागेत स्प्रिंकलर आहेत.


रोपवाटिकाही फुलली


 उत्तम रोपवाटिका म्हणून विद्यापीठाच्या रोपवाटिकेचा लौकिक होता. एकेकाळी रोपे विकणाऱ्या रोपवाटिकेमध्ये दरम्यानच्या काळात मनुष्यबळाअभावी बाहेरून रोपे आणण्याची वेळ आली होती. पण, उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाला लागणारी सर्व रोपे इथेच तयार करण्याचा निश्चय केला आणि आजघडीला त्यांचा हा निश्चय प्रत्यक्षात उतरविण्यात त्यांना यश आले आहे.
याबाबत सांगताना डॉ. शिंदे म्हणाले, मँजिना, आवळा, चिंच, करंज, जांभूळ, शिरीष, सप्तपर्णी, कदंब अशी रोपे आपल्याला शासनाच्या सामाजिक वनीकरण उपक्रमाअंतर्गत प्राप्त होतात. त्याव्यतिरिक्त विद्यापीठाने वड, पिंपरण, चाफा तसेच बोगणवेल, रातराणी, अकालिपा, मोगरा, क्रोटॉन, पिवळा बांबू अशी रोपे वाटिकेमध्ये तयार केली आहेत. ती चांगल्या पद्धतीने तयार होत आहेत. रिसायकल्ड पाण्यावरच ती चांगली फुलली आहेत. नव्या रोपांसाठी प्लास्टिक पिशव्या वापरत असलो तरी मोठी रोपे तयार करण्यासाठी आपण रंगांच्या खराब झालेल्या बकेटचाच वापर करतो. येत्या पावसाळ्यात याच नर्सरीतील रोपे परिसरात ठिकठिकाणी लावण्यात येतील. इथली रोपे आम्ही विकणार नसलो तरी विद्यापीठाची रोपवाटिका स्वयंपूर्ण करण्यात मात्र आम्हाला निश्चितपणे यश आले आहे. यामध्ये कुलगुरू डॉ. एन.जे. पवार, प्र-कुलगुरू डॉ. ए.एस. भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड यांच्या द्वारे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत वेळोवेळी आयोजित केल्या जाणाऱ्या शिबीरांचीही मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.