शिवाजी विद्यापीठाच्या उद्यान विभागाची कामगिरी
कोल्हापूर, दि. २२ एप्रिल: अवकाळी पावसाचा मारा झाला असला तरी उन्हाचा तडाखा आणि हवेतील उष्मा मात्र कमी झालेला नाही. अशा वेळी शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात मात्र उद्यान विभागाच्या कामगिरीमुळे नेत्रसुखद हिरवळ वाढली असल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे येत्या पावसाळ्यात विद्यापीठ परिसरात लावावयाची रोपे सुद्धा इथल्याच रोपवाटिकेमध्ये (नर्सरी) जोमाने वाढत आहेत.
काही वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयामोरील नूतन हिरवळयुक्त बगिचा हा विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि कौतुकाचा विषय बनला होता. पण त्यावरील सदोदित वावर आणि पाण्याच्या कमतरतेमुळे ती कोमेजली आणि त्याठिकाणी भकासपणा आला होता. तथापि, यंदा मात्र विद्यापीठाच्या उद्यान विभागाचे उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन उद्यान अधीक्षक बाबा कदम आणि आता नव्याने रुजू झालेले अधीक्षक अभिजीत जाधव यांनी विद्यापीठाला ‘हिरवे वैभव’ पुन्हा प्राप्त करून देण्याचा विडा उचलला आणि त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमाला यशही आल्याचे दिसत आहे.
सिंचन व्यवस्थेचे पुनरुज्जीवन

विद्यापीठात सन २००६-०७मध्ये ठिबक सिंचन यंत्रणा बसविण्यात आली होती. परंतु, दरम्यानच्या काळात मनुष्यबळाअभावी ती नादुरुस्त होती. गेल्या ऑक्टोबरमध्ये ही यंत्रणा पूर्ववत सुरू करण्यात आली आणि तिच्या माध्यमातून विद्यापीठ परिसरातील हिरवाई टवटवीत राहू लागली. विशेष म्हणजे स्वच्छ पाण्याऐवजी पूर्णतः सांडपाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा वापर उद्यान व झाडांसाठी केला जातो. यासाठी विद्यार्थिनी वसतिगृहाच्या पाठीमागे सुमारे दहा हजार लीटर क्षमतेचा रिसायक्लिंग प्लँट उभारण्यात आला आहे. तिथून पाणी उचलून उद्यानातील उत्तर सर्कलमध्ये घेतले जाते. तिथून ते सर्कलमधील चिंच, आंबा, सभोवतीचा गोल्डन ड्युरांडा, ग्रंथालयासमोरील उद्यान, भूगोल विभागामागील आमराई, कर्मवीर भाऊराव पाटील उद्यान याठिकाणी सिंचन यंत्रणेमार्फत पुरविले जाते. आवश्यक तेथे स्प्रिंकलरही बसविले आहेत.
दक्षिण सर्कलमध्येही राजाराम तलावातील पाणी आणले जाते. तिथून उचलून ते रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणिशास्त्र या अधिविभागांसमोरील बगिचांबरोबरच संपूर्ण दक्षिण सर्कलमधील झाडांना ठिबक सिंचनाद्वारे पुरविले जाते. भौतिकशास्त्र विभागासमोरील बागेत स्प्रिंकलर आहेत.
रोपवाटिकाही फुलली
उत्तम रोपवाटिका म्हणून विद्यापीठाच्या रोपवाटिकेचा लौकिक होता. एकेकाळी रोपे विकणाऱ्या रोपवाटिकेमध्ये दरम्यानच्या काळात मनुष्यबळाअभावी बाहेरून रोपे आणण्याची वेळ आली होती. पण, उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाला लागणारी सर्व रोपे इथेच तयार करण्याचा निश्चय केला आणि आजघडीला त्यांचा हा निश्चय प्रत्यक्षात उतरविण्यात त्यांना यश आले आहे.

No comments:
Post a Comment