शिवाजी विद्यापीठ: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे व्याख्यानमाला
कोल्हापूर, दि. २३ एप्रिल: जातिनिर्मूलनाखेरीज आपले राष्ट्र बलवान होऊ शकणार नाही. त्यासाठी जातिनिर्मूलन हे राष्ट्राचे उद्दिष्ट बनले पाहिजे. भारत हे ‘जातिविरहित सार्वभौम प्रजासत्ताक’ बनविण्याच्या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनातर्फे आयोजित ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे सामाजिक व राजकीय कार्य’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. ए.एस. भोईटे होते.
भाई वैद्य म्हणाले, अस्पृश्यता निर्मूलन हा महर्षी शिंदे यांच्या कृतीशील सामाजिक कार्याचा प्रमुख ध्यास होता. लोकमान्य टिळक यांच्यासारख्या दुर्दम्य महापुरूषाचा विरोध असतानाही काँग्रेसला अस्पृश्यता निवारणाचा ठराव करायला भाग पाडणे, ही सोपी गोष्ट नव्हती. ती महर्षींनी साध्य केली. व्हॉईसरॉयपासून ते अगदी कमिशनरपर्यंत अस्पृश्यता निवारणासाठी अखंड पाठपुरावा करून सामाजिक समतेच्या लढ्याला प्रचंड गती देण्याचे महत्तम कार्य महर्षींनी केले. त्याचप्रमाणे ‘आधी सामाजिक स्वातंत्र्य की राजकीय?’ या वादग्रस्त विषयावर आंबेडकर, आगरकर आदी प्रभृतींप्रमाणेच अस्पृश्यता निवारणाच्या प्रश्नालाच त्यांनी प्राधान्य दिले. केवळ मागासवर्गीयांना राखीव मतदारसंघ द्यावेत, पण जातवार मतदारसंघाला विरोध करण्याचे धैर्य त्यांनी दाखविले. आजघडीला भारतात असलेल्या पाच हजार जाती आणि त्याहून अधिक उपजाती पाहता त्यांची भूमिका किती उचित होती, हे लक्षात येते.
समाजकारण आणि राजकारण या दोन्ही बाबतीत जहाल भूमिका घेणारे महर्षी शिंदे हे तत्कालीन परिस्थितीतील अनोखे नेतृत्व असल्याचे सांगून श्री. वैद्य म्हणाले, महर्षींचा अद्वैतवादी जागतिक दृष्टीकोन आजच्या काळात समजून घेण्याची नितांत गरज आहे. त्यांचा अद्वैतवाद हा शंकराचार्यांप्रमाणे पारमार्थिक नव्हता, तर लौकिक सामाजिक व राजकीय होता. जगभरात आज जाती-जमाती, वंश, भाषा, प्रांत यांच्या द्वैताची आणि द्वंद्वाची भाषा सुरू आहे. वर्गकलह, वर्गद्वंद्व ही आजची वस्तुस्थिती आहे. जागतिकीकरणाच्या माध्यमातून या द्वंद्वाला अधिकच खतपाणी घातले जाते आहे. या पार्श्वभूमीवर त्या काळात या भूमीची भावना ‘वसुधैव कुटुम्बकम्’ अशी कधी होणार?, याची चिंता महर्षी शिंदे यांना भेडसावत होती. ती चिंता आजही अधिक ठळकपणे अधोरेखित झाली आहे.
ऐहिक सुखाला नीतीचा आधार नसेल तर जगाचे कसे होणार?, हा सुद्धा महर्षींच्या चिंतेचा विषय असल्याचे सांगून भाई वैद्य म्हणाले, राजकारण, समाजकारण, धर्मकारण अशा कोणत्याही क्षेत्रात काम करीत असताना त्याला नैतिक अधिष्ठान देण्याचा विचार आपल्याला करावाच लागेल, अशा मताचे ते होते. त्या अर्थाने महर्षी हे आध्यात्मवादी ठरतात. पण तेवढ्यापुरतेच. कारण त्यांनी कधीही अवतार, धर्मप्रामाण्य किंवा मूर्तीपूजा मानली नाही. पण आपल्या सर्वव्यापी कार्याला नीतीचे अधिष्ठान असलेच पाहिजे, यासाठी मात्र ते आग्रही राहिले. राजकारणातील ढासळणारी नैतिकता हा सुद्धा त्यांच्या चिंतेचा विषय होता.
याखेरीज दुष्काळग्रस्तांच्या पुनर्वसनाचे कार्य, गुन्हेगार समजल्या गेलेल्या मातंग समाजाच्या पुनरुत्थानाचे कार्य, शेतकरी व कामगारांच्या संदर्भातील महर्षींचे चौफेर कार्य याविषयीही भाई वैद्य यांनी व्यापक विचार मांडले.
यावेळी चंद्रकांत बोंद्रे यांनी अध्यासनासाठी एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली. याबद्दल प्र-कुलगुरू डॉ. भोईटे यांनी त्यांना धन्यवाद दिले. सुरवातीला अध्यासनाचे समन्वयक डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे यांनी आभार मानले. सीमा मुसळे यांनी सूत्रसंचालन केले. व्याख्यानास डॉ. एन.डी. पाटील, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. गो.मा. पवार, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर उपस्थित होते.
लोकशाहीची वाटचाल ‘धनाढ्यशाही’कडे
आपल्या देशात एकीकडे अंबानींची संपत्ती चार लाख कोटींची आहे, तर दुसरीकडे ७६ टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली आहे. अशा परिस्थितीत आपल्या लोकशाही व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात सामाजिक व आर्थिक द्वैत माजले आहे. त्यामुळे इथल्या लोकशाहीची वाटचाल ‘धनाढ्यशाही’कडे अधिक जोमाने होऊ लागली आहे, ही चिंतेची बाब असल्याचे मत भाई वैद्य यांनी यावेळी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment