कोल्हापूर, दि. १४ एप्रिल: शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, असे मानणारे डॉ. आंबेडकर हे एक कृतीशील व निष्णात शिक्षणतज्ज्ञ होते, असे प्रतिपादन मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य आणि बुद्ध व आंबेडकरी विचारांचे गाढे अभ्यासक डॉ. व्ही.एन. मगरे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र आणि विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. आंबेडकर यांच्या १२३व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘डॉ. आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार’ या विषयावर डॉ. मगरे बोलत होते. मानव्यविद्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन.जे. पवार होते.
डॉ. मगरे म्हणाले, शिक्षणाने विद्यार्थ्याच्या अंगी शहाणपण आले पाहिजे. समाज घडविण्यासाठी आणि त्यासाठी अनुरुप अशा योजना बनविण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी प्रेरित होऊन योगदान दिले पाहिजे. सामाजिक जाणीवा निर्माण करणे हा शिक्षणाचा प्रमुख हेतू आहे, असे डॉ. आंबेडकर म्हणत. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञान संपादनाविषयी योग्य वयात आकांक्षा निर्मिती होणे आणि त्या माध्यमातून त्याचा स्वतःचा ठसा उमटविण्यासाठी सक्षम बनविणारे शिक्षण बाबासाहेबांना अभिप्रेत होते.
डॉ. आंबेडकरांनी अफाट वाचनातून स्वतःचा व्यासंग वाढविला होता आणि त्या व्यासंगातूनच त्यांनी आदर्श विद्यार्थी घडण्यासाठीची पंचसूत्री मांडल्याचे सांगून डॉ. मगरे म्हणाले, निसर्गदत्त व्यवहारज्ञानाची जाणीव अर्थात कॉमन सेन्स, विषयाची मूलभूत मांडणी समजून घेणे, ज्ञानाचा समस्यांची उकल करण्यासाठी योग्य वापर करणे, स्मरणशक्ती नव्हे, तर विषयाची आकलन क्षमता निर्माण करणे, सुसंगतता व भाषाप्रभुत्व अशी पंचसुत्री आंबेडकरांनी शंभर वर्षांपूर्वी सांगितली. त्याची प्रस्तुतता आजच्या काळातही अजिबात कमी झालेली नाही, तर उलट वाढलेली आहे. या पंचसूत्रीच्या आधारावर विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वादविवाद प्रवृत्तीचा विकास होण्यालाही आंबेडकरांनी विशेष महत्त्व दिलेले आहे. आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये गुरू शिष्याचे नाते योग्य पद्धतीने प्रस्थापित होऊ शकत नाही, तिथे आंबेडकरांना अभिप्रेत असलेली अनुयायी घडविण्याची प्रक्रिया कशी होणार, अशी खंतही डॉ. मगरे यांनी व्यक्त केली.
यावेळी अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. एन.जे. पवार म्हणाले की, शिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे, असा विचार करत असताना त्यामागील विचारधाराही आपण समजून घेतली पाहिजे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई या दांपत्याने या विचारधारेची मूलभूत आणि कृतीशील पायाभरणी केली. कोल्हापूरनगरीचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या कार्याला राजाश्रय प्रदान करत शिक्षणासाठी विशेषतः बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी भरीव कार्य उभारले आणि भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांनी प्रजासत्ताक लोकशाही भारतात सार्वत्रिक, सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाची तरतूद केली. या संपूर्ण विचारधारेचा आजच्या काळात कसा अंगिकार करता येऊ शकेल, याचा प्रत्येकानेच अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्रा. राजेश खरात, प्र-कुलगुरू डॉ. ए.एस. भोईटे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक डॉ. बी.एम. हिर्डेकर उपस्थित होते. डॉ. आंबेडकर केंद्राचे समन्वयक डॉ. कृष्णा किरवले यांनी स्वागत, प्रास्ताविक केले तर डॉ. डी.के. गायकवाड यांनी आभार मानले. विवेक कोकरे यांनी सूत्रसंचालन केले.
No comments:
Post a Comment