Wednesday, 30 April 2014

शिवाजी विद्यापीठात व्यापक वृक्षगणना सुरू



   
पर्यावरण शास्त्र विभागाचा उपक्रम
 कोल्हापूर, दि. २९ एप्रिल: परिसरातला कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजनचा पुरवठा करणारा शिवाजी विद्यापीठाचा परिसर जणू कोल्हापूर शहराचे फुप्फुसच आहे. पण, या फुप्फुसाची कार्बन शोषून घेण्याची नेमकी क्षमता किती आहे, याचा आता शास्त्रशुद्ध अभ्यास केला जात आहे. विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाने विद्यापीठाच्या ८५२ एकर क्षेत्रावरील वृक्षगणना करण्याचा आणि या वृक्षांच्या प्रजातींनुसार त्यांच्या आणि पर्यायाने संपूर्ण परिसराच्या कार्बन ग्रहण क्षमता मापनाचा शास्त्रीय उपक्रम हाती घेतला आहे.
गेल्या काही वर्षांत विद्यापीठांतील विविध विभाग आणि संबंधित घटकांनी विद्यापीठ परिसरात वृक्षलागवड केली आहे. यामध्ये विद्यापीठाचा उद्यान विभाग, पर्यावरण शास्त्र विभाग, वनस्पतीशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांचा समावेश आहे. या सर्व विभागांच्या प्रयत्नांमुळे विद्यापीठ परिसर हरित होऊन पर्यावरण पूरक होण्यास मदत झाली आहे. पर्यावरण शास्त्र विभागाच्या वृक्षगणनेच्या उपक्रमातून सर्व जुन्या-नव्या वृक्षसंपदेची गणना होऊन त्यांच्या निसर्ग संतुलनातील महत्त्वपूर्ण कार्याची नोंद होणार आहे.
या उपक्रमासंदर्भात माहिती देताना पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. पी.डी. राऊत म्हणाले की, जागतिक तापमानवाढीस कारणीभूत असणाऱ्या हरितगृह वायूंपैकी (Green House Gases) एक असलेल्या कार्बन डायऑक्साईडचे वातावरणातील वाढलेले प्रमाण कमी करण्यासाठी सध्या जगभर संशोधन सुरू आहे. त्या संशोधनाचाच एक भाग म्हणून जंगले, वने, गवताळ कुरणे यांची कार्बन शोषून घेण्याची क्षमता तपासणे आणि अशा कार्बन कुंडांचे (Carbon Sink) संवर्धन करणे आदी गोष्टी केल्या जात आहेत. निसर्गातील अशा विविध घटकांच्या कार्बन शोषून घेण्याच्या क्षमतेला कार्बन ग्रहण क्षमता (Carbon Sequestration Potential) असे म्हणतात. जागतिक तापमानवाढीच्या समस्येवर मात करण्यासाठी या संकल्पनेकडे मोठ्या आशेने पाहिले जात आहे.
जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून गेल्या २२ एप्रिलपासून पर्यावरण शास्त्र विभागाने सदर वृक्षगणनेला प्रारंभ केला आहे. याअंतर्गत परिसरातील सर्व वृक्षांची गणना, प्रजातींची नोंद, त्यांच्या खोडाचा परीघ, उंची या बाबींचे मापन करण्यात येत असून त्यावरुन त्यांचे जैव-वस्तुमान (बायोमास) काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर झाडाचा फुलोरा, फळे, पक्ष्यांची घरटी, मधमाशांचे पोळे, कीटकांची नोंद आदी परिसंस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबींची देखील मोजदाद करण्यात येणार आहे. या अभ्यासातून विद्यापीठ परिसरातील वृक्षसंपदेचे व अनुषंगिक परिसंस्थेच्या सद्यस्थितीचे आकलन होण्यास मदत होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या वृक्षगणनेतून विद्यापीठ परिसराच्या कार्बन ग्रहण क्षमतेचे मापन होऊन हा परिसर किती प्रमाणात हरितगृह वायूंचे शोषण करू शकतो, हे पुढे येईल आणि विद्यापीठ परिसर कोल्हापूर शहराचे फुप्फुस म्हणून सक्षमपणे काम करीत असल्याचे सिद्ध होईल, असा विश्वास प्रा. राऊत यांनी व्यक्त केला.
या उपक्रमात विभागातील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक विद्यार्थी आणि पदव्युत्तर विभागातील सुमारे शंभर विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या उपक्रमासाठी कुलगुरू डॉ. एन.जे. पवार, प्र-कुलगुरू डॉ. ए.एस. भोईटे, कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. डी.के. गायकवाड, उद्यान विभागाचे उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे व कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत असल्याचे प्रा. राऊत यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment