Wednesday, 14 September 2016

तळागाळातील समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी

लोकशाहीत संसदीय आयुधांचे महत्त्व मोठे: खासदार धनंजय महाडिक







कोल्हापूर, दि. १४ सप्टेंबर: लोकशाहीमध्ये संसदीय कार्यप्रणाली अत्यंत महत्त्वाची असून विविध संसदीय आयुधांच्या सहाय्याने तळागाळातील समाजाचे प्रश्न मांडून त्यावर चर्चा घडवून, उपाय शोधण्याचे सर्वोच्च मंदिर आहे, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी आज येथे केले.
केंद्रीय संसदीय कार्य मंत्रालय (नवी दिल्ली) व शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने १३ वी युवा संसद (गट फ) स्पर्धा विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहा पार पडली. यावेळी प्रमुख रीक्षक म्हणून श्री. महाडिक उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे होते.
खासदार श्री. महाडिक यांनी आपल्या भाषणात संसदीय कार्यप्रणालीमधील तांत्रिक बाबी, लोकशाहीमधील तिचे महत्त्व याविषयीचे आपले अनुभव सांगत अतिशय सोप्या भाषेत विश्लेषण केले. ते म्हणाले, प्रश्नोत्तरे, शून्य प्रहर चर्चा अथवा लक्षवेधी सूचना आदी अनेक आयुधांच्या सहाय्यानेच लोकप्रतिनिधीला सभागृहात आपले म्हणणे मांडावे लागते. त्याच्या वाट्याला नियमानुसार वेळेची मर्यादाही असते. या सर्व मर्यादा सांभाळून आपले म्हणणे नेमकेपणाने व अचूकपणाने मांडण्याचे कौशल्य लोकप्रतिनिधीकडे असले पाहिजे. तसेच, त्यासाठी देश-विदेशांतील ताज्या घडामोडींचे ज्ञान अवगत करण्याबरोबरच आपल्या समाजातील, मतदारसंघातील प्रश्नांची माहितीही असायला हवी. गेल्या दोन वर्षांत मोठ्या मेहनतीने आपण हे कौशल्य अंगी बाणवले असून त्यामुळेच माझ्या कामकाजाचा ठसा संसदेत अल्पावधीत उमटविता आला, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, जीवनात यशस्वी होण्यासाठी आई-वडीलांचा आदर बाळगावा. शिक्षणासह क्रीडा, सांस्कृतिक आदी क्षेत्रांमध्येही युवकांनी आपापले कौशल्य आजमावले पाहिजे. सर्व क्षेत्रांची माहिती आजच्या युवकाला असली पाहिजे. त्यातून कोणत्या क्षेत्रातील संधी तुमच्याकडे चालून येईल, सांगता येणार नाही. पण, त्या दृष्टीने स्वतःला घडविण्याचे हेच वय आहे, त्यामुळे यशस्वी होण्यासाठी युवकांनी सातत्याने अपार कष्ट घेतले पाहिजेत.
स्पर्धेचे निरीक्षक भटिंडा येथील पंजाब केंद्रीय विद्यापीठाचे प्रा.तरुण रोरा म्हणाले, उत्तम संसदपटू होण्यासाठी अध्ययन, एकाग्रता, जबाबदारी, वैचारीक पातळी, अनुभव असणे आवश्यक आहे. केवळ राज्यशास्त्र किंवा कायद्याच्या नव्हे, तर सर्वच अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी संसदीय कार्यप्रणालीचा अत्यंत चांगल्या द्धतीने अभ्यास केला पाहिजे. त्याच सादरीकरणाच्या वेळी फायदा होतो. प्रश्नोत्तराच्या वेळी थेट सदस्यांना उद्देशून बोलण्यावजी आक्रमकतेवजी विनयशीलतेने प्रश्न माडावेत. संसदीय शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करणे अत्यंत आवश्यक असते.
यावेळी परीक्षक डॉ.भालबा विभूते म्हणाले, लोकशाहीमध्ये धोरणांच्या आधारावर देशाचे भवितव्य ठरविले जाते. त्यामुळे संसदीय प्रणाली जाणीवपूर्वक अभ्यासणे आवश्यक आहे.
स्पर्धेनंतर बंद लखोट्यातून निकाल पुढील फेरीसाठी केंद्रीय मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे प्रमुख उपस्थित होते. विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ.आर.व्ही. गुरव यांनी सूत्रसंचालन केले. युथ पार्लमेंटचे समन्वयक डॉ.भगवान माने यांनी आभार मानले.  







No comments:

Post a Comment