HomePage of DBT |
Tweet by DBT |
विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
कोल्हापूर, दि. ७ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठाचे
औद्योगिक सांडपाणी प्रक्रियाविषयक संशोधन थेट केंद्रीय जैवतंत्रज्ञान
मंत्रालयाच्या वेबसाईटच्या होमपेजवर झळकले आहे. मटेरिअल सायन्स विषयाच्या संशोधनात
देशातील अकृषी विद्यापीठांत अग्रस्थान पटकावल्यानंतर हा आणखी एक बहुमान शिवाजी
विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र अधिविभागाच्या संशोधनास प्राप्त झाला आहे. विशेष
म्हणजे जैवतंत्रज्ञान मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन 'स्वच्छ भारत' अभियानाचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून ही माहिती
सर्वांशी शेअर केली असून विभागाचे केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन व राज्यमंत्री
वाय.एस. चौधरी यांनाही टॅग केले आहे.
विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र अधिविभागातील प्रा.एस.पी.
गोविंदवार यांना कागल येथील पंचतारांकित एम.आय.डी.सी.मधील औद्योगिक सांडपाणी
प्रक्रिया व शुद्धीकरणविषयक संशोधनासाठी दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारतर्फे विशेष
प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. याच प्रकल्पाची यशोगाथा केंद्रीय जैवतंत्रज्ञान
मंत्रालयाच्या www.dbtindia.nic.in या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर प्रकाशित करण्यात
आली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, प्रा. गोविंदवार आणि
विद्यापीठातील संशोधक वस्त्रोद्योगाशी संबंधित कारखान्यांतून जे रंगमिश्रित प्रदूषित
सांडपाणी बाहेर टाकले जाते, त्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी दहा वर्षांहून अधिक
काळ प्रयोगशाळेत संशोधन करीत आहेत. रंगमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता
काही वनस्पतींचा वापर केला जाऊ शकतो, असे प्राथमिक संशोधनातून निष्पन्न झाले. या
वनस्पतींचा वापर करून प्रयोगशाळेतच 'पायलट स्केल रिॲक्टर' बनविण्यात आले. जीवरसायनशास्त्र अधिविभागामार्फत या संशोधनावर आधारित १५०हून
अधिक आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.
प्रयोगशाळेपुरत्या मर्यादित असलेल्या या संशोधनाची व्याप्ती
औद्योगिक स्तरापर्यंत वाढविण्यासाठी कागल एम.आय.डी.सी. यांचे सहकार्य लाभले,
त्याचप्रमाणे केंद्रीय जैवतंत्रज्ञान मंत्रालयाकडूनही निधी देण्यात आला. यातून
विद्यापीठाच्या संशोधकांना प्रदूषित सांडपाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी
पर्यावरणपूरक व कमी खर्चिक तंत्रज्ञान विकसित करण्यात यश आले. हे तंत्रज्ञान नागरी
सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकते. या संशोधनाची ही व्यापक
सामाजिक उपयुक्तता लक्षात घेऊनच जैवतंत्रज्ञान मंत्रालयाने 'स्वच्छ भारत' मोहिमेचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून या
संशोधनाची दखल घेतली आहे. मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन तसे ट्विटही केले
आहे, अशी माहिती प्रा. गोविंदवार यांनी दिली.
या उल्लेखनीय संशोधनासाठी डॉ. ज्योती जाधव, डॉ. विश्वास
बापट, डॉ. अनुराधा कागलकर, डॉ. राहुल खंडारे, डॉ. अखिल काब्रा, डॉ. अनुप्रिता
वाठारकर, डॉ. अस्मिता पाटील, नीरज राणे, विशाल चंदनशिवे, सुहास कदम व स्वप्नील
पाटील यांचे योगदान लाभले, तर कागल एम.आय.डी.सी.च्या एस.आर. जोशी, एकनाथ पाटील
यांच्यासह श्री. भांडेकर, श्री. शेंडे, श्री. वराळे व श्री. नवगुणे यांचे सहकार्य
लाभले, असेही प्रा. गोविंदवार यांनी सांगितले.
ग्रीन रिमेडिएशनच्या क्षेत्रात विद्यापीठाचा
मानदंड प्रस्थापित: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना कुलगुरू डॉ. देवानंद
शिंदे म्हणाले की, शिवाजी विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र अधिविभागाने गेली अनेक
वर्षे सातत्याने चालविलेल्या समाजाभिमुख संशोधनाचा परिपाक म्हणजे केंद्रीय
जैवतंत्रज्ञान मंत्रालयाच्या संकेतस्थळावर या संशोधनाला मिळालेले स्थान आहे. या
संशोधनाच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाने ग्रीन रिमेडिएशनच्या क्षेत्रातील
संशोधनात मानदंड प्रस्थापित केला आहे. शिवाजी विद्यापीठाने संशोधनाच्या क्षेत्रात
राष्ट्रीय पातळीवरील आपले प्रभुत्व सिद्ध केले आहे. काही दिवसांपूर्वीच मटेरिअल
सायन्सच्या संशोधनात शिवाजी विद्यापीठ अकृषी विद्यापीठांत देशात अग्रस्थानी
असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता अधिविभागप्रमुख प्रा.डॉ. ए.यु. अरविंदेकर
यांच्या नेतृत्वाखाली जीवरसायनशास्त्र अधिविभागाच्या संशोधनाला केंद्रीय मंत्रालयाच्या
संकेतस्थळावर मिळालेले स्थान हा विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा आहे.
या संशोधनाबद्दल डॉ. एस.पी. गोविंदवार यांच्यासह अधिविभागातील सर्वच संशोधकीय टीम
अभिनंदनास पात्र आहे.
No comments:
Post a Comment