Showing posts with label Dr. S.P. Govindwar. Show all posts
Showing posts with label Dr. S.P. Govindwar. Show all posts

Saturday, 1 July 2017

रंगमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रियेबाबत संशोधनासाठी ‘डीबीटी’कडून विद्यापीठास दीड कोटींचा प्रकल्प

डॉ. ज्योती जाधव यांचे अभिनंदन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

प्रकल्प प्रक्रियेची माहिती देणारी आकृती.

कागल येथील प्रत्यक्ष प्रकल्प स्थळाची छायाचित्रे.

राष्ट्रीय प्रकल्पाच्या प्रमुखपदी डॉ. ज्योती जाधव

कोल्हापूर, दि. १ जुलै: केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागातर्फे (डीबीटी, नवी दिल्ली) रंगमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रियेबाबत संशोधनासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे तीन विद्यापीठांमध्ये संयुक्तरित्या होणाऱ्या या राष्ट्रीय प्रकल्पाचे नेतृत्व शिवाजी विद्यापीठाच्या जीव-रसायनशास्त्र अधिविभागातील प्रा.डॉ. ज्योती जाधव यांच्याकडे देण्यात आले आहे. याबद्दल कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी ग्रंथ भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हा प्रकल्प मंजूर करण्यात आला असून शिवाजी विद्यापीठासह इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, हैद्राबाद आणि चारोतर युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अॅड टेक्नॉलॉजी, गुजरात या तीन संस्थांमध्ये या प्रकल्पाबाबत संयुक्त संशोधन होणार आहे. शिवाजी विद्यापीठामध्ये डॉ. ज्योती जाधव या प्रकल्प प्रमुख तर प्रा. एस.पी. गोविंदवार उप-प्रकल्प प्रमुख काम पाहणार आहेत. या प्रकल्पासाठी डीबीटीकडून दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या प्रकल्पाबाबत प्रकल्प प्रमुख डॉ. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, वस्त्रोद्योगाशी संबंधित कारखान्यातून बाहेर पडणारे रंगमिश्रित सांडपाणी विनाप्रक्रिया नदीपात्रात सोडले जाते. या रंगमिश्रीत सांडपाण्यातील विषारी रासायनिक प्रदूषकांमुळे अनेक प्रकारच्या रोगांना सामोरे जावे लागते. पाण्यातील वनस्पती व जलचरांबरोबरच मानवावरही त्याचे दुष्परिणाम होतात. विविध ॲलर्जिक रिॲक्शन, म्युटेशन, अगदी कर्करोगही होतो. हे रंगमिश्रित सांडपाणी नदीत सोडण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सर्वच स्तरांवर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
डॉ. जाधव म्हणाल्या, वस्त्रोद्योग कारखान्यात मोठ्या प्रमाणावर मानवनिर्मित रासायनिक पदार्थ व रंगद्रवे वापरली जातात. त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या मोठ्या सेंद्रिय कणांना ॲझो संयुग म्हणतात. त्यामध्ये नायट्रोजन- नायट्रोजनमध्ये तीन घट्ट बंध असतात, त्यामुळे ते निसर्गात खूप काळ जसेच्या तसे आढळून येतात. या ॲझो संयुगाचे निसर्गात पुन्हा वापर करण्याकरिता त्यामधील घट्ट बंध तुटून त्याचे साध्या बंधामध्ये रुपांतर करण्याकरिता त्यावर प्रक्रिया करणे गरजेचे असते. सांडपाणी प्रक्रिया केंद्रात रंगमिश्रीत सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते, पण काही रासायनिक पदार्थ यामध्ये प्रक्रियेनंतरही आढळून येतात.
शिवाजी विद्यापीठात ‘बायोरिमेडिएशन’ प्रक्रियेने रंगमिश्रीत सांडपाणी स्वच्छ करण्याची पद्धत प्रायोगिक तत्वावर जवळपास गेल्या दहा वर्षांपासून केली जात असून या प्रयोगशाळेचा या क्षेत्रात जगात प्रथम क्रमांक आहे. याच कामाची दखल घेऊन डीबीटी (नवी दिल्ली) यांच्या वेबसाईटच्या होमपेजवर दोन वेळा झळकण्याचा बहुमान विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र अधिविभागाला दोनदा प्राप्त झाला आहे. ‘बायोरिमेडिएशन’ प्रक्रियेने नैसर्गिकरित्या रंगमिश्रित सांडपाण्यावर कोणतेही रासायनिक पदार्थ न वापरता यशस्वीपणे प्रक्रिया केली जाते. काही बॅक्टेरिया (उदा.सुडोमोनास बॅसिलास) निसर्गात उपलब्ध आहेत, ज्यांचाकडे मोठ्या संयुगाचे लहान/ सध्या संयुगात रुपांतर करण्याची क्षमता आहे. तसेच, आम्हाला असेही लक्षात आले की, वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये (जलचर वनस्पती: आयपोमिया अक्वॅटिका, आयपोमिया हेडरीफोलिया, साल्विनिया मोलेस्टा, टायफा अँगस्तीफोलिया, पॅस्पॅलम स्क्रोबीकुलॅटम, ब्लुमिया मालकोमी, फ्युम्रीस्टायलीस डायोक्टोमा; फुलझाडे:- पोरचुल्याका ग्रँडीफ्लोरा, ॲस्टर अमेलस, टेजेतेस प्याचुला, गेलाराडिया ग्रंडीफ्लोरा) मोठी संयुगे शोषून घेण्याची क्षमता आहे. रंगमिश्रित सांडपाणी या वनस्पतींच्या मधून सोडल्याने यातील हानीकारक पदार्थ शोषून घेतात. तसेच, बायलॉजिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी), केमिकल ऑक्सिजन डिमांड (सीओडी) आणि टोटल डीझॉव्हल्ड सॉलीड (टीडीएस) हे मूल्यांक कमी झाल्याचे दिसून येते. परिणामी, सांडपाणी स्वच्छ होते. तसेच, या वनस्पती काही पोषकद्रव्ये सांडपाण्यात सोडतात. ज्यांच्यामुळे नैसर्गिक बॅक्टेरिया वेगाने वाढतात. ते बॅक्टेरीया रंगद्रव्याचे रुपांतर साध्या रंगहीन पदार्थांत करतात; तसेच, हानीकारक/ विषारी पदार्थांचे रूपांतर बिनविषारी पदार्थांत करण्यासही मदत करतात. या वनस्पती काही संप्रेरके (ल्याकेज, ॲझो रीडक्टेज, लीगानीन पेरॉक्सिडेज) स्रवतात, ज्यामुळे विषारी पदार्थांचे रूपांतर बिनविषारी पदार्थांत होते. रंगमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता वनस्पती व बॅक्टेरिया यांचा एकत्रित वापर करणे ही अत्यंत कार्यक्षम प्रक्रिया आहे, अशी माहिती डॉ. जाधव यांनी दिली.

एमआयडीसीमध्ये प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित
सध्या रंगमिश्रीत सांडपाणी प्रक्रिया कागल येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एम.आय.डी.सी.) सात एकर जागेवर प्रत्यक्ष यशस्वीपणे कार्यरत आहे. कागल एम.आय.डी.सी.त ४५ एकर क्षेत्रात हाय रेट ट्रान्समिशन सिस्टीम (एच.आर.टी.एस.) तयार केली आहे. यामध्ये सलग नाला तयार करून बांधावर निलगिरी लावली आहे. या नाल्यातून सांडपाणी सोडले जाते. कॉमन एफ्लूयंट ट्रीटमेंट प्लँट (सी.इ.टी.पी.) त्यांच्याकडील सांडपाणी बायोरिमेडिएशन प्रक्रियेकरिता एच.आर.टी.एस. यंत्रणेमध्ये सोडतात. या यंत्रणेचा फायदा असा की, यातील निलगिरीची झाडे जास्तीत जास्त सांडपाणी शोषून घेतात. त्या सांडपाण्याबरोबर हानिकारक पदार्थ देखील शोषून घेतले जातात आणि झिरो डिस्चार्ज सिस्टीम तयार होते. एच.आर.टी.एस. क्षेत्रात डि-कलरायझेशन (रंग घालवण्याची क्षमता असणारी प्रक्रिया) क्षमता असणाऱ्या वनस्पतींची लागवड करून त्यामध्ये बॅक्टेरिया मिसळून तयार होणाऱ्या सिस्टीमला ‘फायटोरिॲक्टर’ म्हणतात. ही सिस्टीम अधिक क्षमतेने डि-कलरायझेशन प्रक्रिया करते. ती पर्यावरणपूरक व कमी खर्चिक आहे. प्रा. ज्योती जाधव आणि प्रा. एस.पी. गोविंदवार यांनी या संशोधनावर आधारित सुमारे १६५ शोधनिबंध विविध अंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकांतून प्रसिद्ध केले आहेत. डीबीटीच्या नवीन प्रकल्पात डिकलरायझेशन प्रक्रियेच्या जोडीला वीजनिर्मिती करण्याचे ध्येय संशोधकांनी बाळगले आहे.
दरम्यान, डीबीटी यांचेकडून हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प मंजूर झाल्याबद्दल कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी डॉ. ज्योती जाधव यांचे ग्रंथभेट देऊन अभिनंदन केले. या प्रसंगी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. भारती पाटील, डॉ. अनिल घुले, डॉ. एस.बी. सादळे उपस्थित होते.


Wednesday, 7 September 2016

शिवाजी विद्यापीठाचे संशोधन केंद्रीय जैवतंत्रज्ञान मंत्रालयाच्या संकेतस्थळावर!


HomePage of DBT
Tweet by DBT



विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा


 कोल्हापूर, दि. ७ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठाचे औद्योगिक सांडपाणी प्रक्रियाविषयक संशोधन थेट केंद्रीय जैवतंत्रज्ञान मंत्रालयाच्या वेबसाईटच्या होमपेजवर झळकले आहे. मटेरिअल सायन्स विषयाच्या संशोधनात देशातील अकृषी विद्यापीठांत अग्रस्थान पटकावल्यानंतर हा आणखी एक बहुमान शिवाजी विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र अधिविभागाच्या संशोधनास प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे जैवतंत्रज्ञान मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन 'स्वच्छ भारत' अभियानाचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून ही माहिती सर्वांशी शेअर केली असून विभागाचे केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन व राज्यमंत्री वाय.एस. चौधरी यांनाही टॅग केले आहे.
विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र अधिविभागातील प्रा.एस.पी. गोविंदवार यांना कागल येथील पंचतारांकित एम.आय.डी.सी.मधील औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया व शुद्धीकरणविषयक संशोधनासाठी दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारतर्फे विशेष प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. याच प्रकल्पाची यशोगाथा केंद्रीय जैवतंत्रज्ञान मंत्रालयाच्या www.dbtindia.nic.in या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर प्रकाशित करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, प्रा. गोविंदवार आणि विद्यापीठातील संशोधक वस्त्रोद्योगाशी संबंधित कारखान्यांतून जे रंगमिश्रित प्रदूषित सांडपाणी बाहेर टाकले जाते, त्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी दहा वर्षांहून अधिक काळ प्रयोगशाळेत संशोधन करीत आहेत. रंगमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता काही वनस्पतींचा वापर केला जाऊ शकतो, असे प्राथमिक संशोधनातून निष्पन्न झाले. या वनस्पतींचा वापर करून प्रयोगशाळेतच 'पायलट स्केल रिॲक्टर' बनविण्यात आले. जीवरसायनशास्त्र अधिविभागामार्फत या संशोधनावर आधारित १५०हून अधिक आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.
प्रयोगशाळेपुरत्या मर्यादित असलेल्या या संशोधनाची व्याप्ती औद्योगिक स्तरापर्यंत वाढविण्यासाठी कागल एम.आय.डी.सी. यांचे सहकार्य लाभले, त्याचप्रमाणे केंद्रीय जैवतंत्रज्ञान मंत्रालयाकडूनही निधी देण्यात आला. यातून विद्यापीठाच्या संशोधकांना प्रदूषित सांडपाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी पर्यावरणपूरक व कमी खर्चिक तंत्रज्ञान विकसित करण्यात यश आले. हे तंत्रज्ञान नागरी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकते. या संशोधनाची ही व्यापक सामाजिक उपयुक्तता लक्षात घेऊनच जैवतंत्रज्ञान मंत्रालयाने 'स्वच्छ भारत' मोहिमेचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून या संशोधनाची दखल घेतली आहे. मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन तसे ट्विटही केले आहे, अशी माहिती प्रा. गोविंदवार यांनी दिली.
या उल्लेखनीय संशोधनासाठी डॉ. ज्योती जाधव, डॉ. विश्वास बापट, डॉ. अनुराधा कागलकर, डॉ. राहुल खंडारे, डॉ. अखिल काब्रा, डॉ. अनुप्रिता वाठारकर, डॉ. अस्मिता पाटील, नीरज राणे, विशाल चंदनशिवे, सुहास कदम व स्वप्नील पाटील यांचे योगदान लाभले, तर कागल एम.आय.डी.सी.च्या एस.आर. जोशी, एकनाथ पाटील यांच्यासह श्री. भांडेकर, श्री. शेंडे, श्री. वराळे व श्री. नवगुणे यांचे सहकार्य लाभले, असेही प्रा. गोविंदवार यांनी सांगितले.

ग्रीन रिमेडिएशनच्या क्षेत्रात विद्यापीठाचा मानदंड प्रस्थापित: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले की, शिवाजी विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र अधिविभागाने गेली अनेक वर्षे सातत्याने चालविलेल्या समाजाभिमुख संशोधनाचा परिपाक म्हणजे केंद्रीय जैवतंत्रज्ञान मंत्रालयाच्या संकेतस्थळावर या संशोधनाला मिळालेले स्थान आहे. या संशोधनाच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाने ग्रीन रिमेडिएशनच्या क्षेत्रातील संशोधनात मानदंड प्रस्थापित केला आहे. शिवाजी विद्यापीठाने संशोधनाच्या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवरील आपले प्रभुत्व सिद्ध केले आहे. काही दिवसांपूर्वीच मटेरिअल सायन्सच्या संशोधनात शिवाजी विद्यापीठ अकृषी विद्यापीठांत देशात अग्रस्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता अधिविभागप्रमुख प्रा.डॉ. ए.यु. अरविंदेकर यांच्या नेतृत्वाखाली जीवरसायनशास्त्र अधिविभागाच्या संशोधनाला केंद्रीय मंत्रालयाच्या संकेतस्थळावर मिळालेले स्थान हा विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा आहे. या संशोधनाबद्दल डॉ. एस.पी. गोविंदवार यांच्यासह अधिविभागातील सर्वच संशोधकीय टीम अभिनंदनास पात्र आहे.