Saturday, 1 July 2017

रंगमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रियेबाबत संशोधनासाठी ‘डीबीटी’कडून विद्यापीठास दीड कोटींचा प्रकल्प

डॉ. ज्योती जाधव यांचे अभिनंदन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

प्रकल्प प्रक्रियेची माहिती देणारी आकृती.

कागल येथील प्रत्यक्ष प्रकल्प स्थळाची छायाचित्रे.

राष्ट्रीय प्रकल्पाच्या प्रमुखपदी डॉ. ज्योती जाधव

कोल्हापूर, दि. १ जुलै: केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागातर्फे (डीबीटी, नवी दिल्ली) रंगमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रियेबाबत संशोधनासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे तीन विद्यापीठांमध्ये संयुक्तरित्या होणाऱ्या या राष्ट्रीय प्रकल्पाचे नेतृत्व शिवाजी विद्यापीठाच्या जीव-रसायनशास्त्र अधिविभागातील प्रा.डॉ. ज्योती जाधव यांच्याकडे देण्यात आले आहे. याबद्दल कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी ग्रंथ भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हा प्रकल्प मंजूर करण्यात आला असून शिवाजी विद्यापीठासह इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, हैद्राबाद आणि चारोतर युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अॅड टेक्नॉलॉजी, गुजरात या तीन संस्थांमध्ये या प्रकल्पाबाबत संयुक्त संशोधन होणार आहे. शिवाजी विद्यापीठामध्ये डॉ. ज्योती जाधव या प्रकल्प प्रमुख तर प्रा. एस.पी. गोविंदवार उप-प्रकल्प प्रमुख काम पाहणार आहेत. या प्रकल्पासाठी डीबीटीकडून दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या प्रकल्पाबाबत प्रकल्प प्रमुख डॉ. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, वस्त्रोद्योगाशी संबंधित कारखान्यातून बाहेर पडणारे रंगमिश्रित सांडपाणी विनाप्रक्रिया नदीपात्रात सोडले जाते. या रंगमिश्रीत सांडपाण्यातील विषारी रासायनिक प्रदूषकांमुळे अनेक प्रकारच्या रोगांना सामोरे जावे लागते. पाण्यातील वनस्पती व जलचरांबरोबरच मानवावरही त्याचे दुष्परिणाम होतात. विविध ॲलर्जिक रिॲक्शन, म्युटेशन, अगदी कर्करोगही होतो. हे रंगमिश्रित सांडपाणी नदीत सोडण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सर्वच स्तरांवर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
डॉ. जाधव म्हणाल्या, वस्त्रोद्योग कारखान्यात मोठ्या प्रमाणावर मानवनिर्मित रासायनिक पदार्थ व रंगद्रवे वापरली जातात. त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या मोठ्या सेंद्रिय कणांना ॲझो संयुग म्हणतात. त्यामध्ये नायट्रोजन- नायट्रोजनमध्ये तीन घट्ट बंध असतात, त्यामुळे ते निसर्गात खूप काळ जसेच्या तसे आढळून येतात. या ॲझो संयुगाचे निसर्गात पुन्हा वापर करण्याकरिता त्यामधील घट्ट बंध तुटून त्याचे साध्या बंधामध्ये रुपांतर करण्याकरिता त्यावर प्रक्रिया करणे गरजेचे असते. सांडपाणी प्रक्रिया केंद्रात रंगमिश्रीत सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते, पण काही रासायनिक पदार्थ यामध्ये प्रक्रियेनंतरही आढळून येतात.
शिवाजी विद्यापीठात ‘बायोरिमेडिएशन’ प्रक्रियेने रंगमिश्रीत सांडपाणी स्वच्छ करण्याची पद्धत प्रायोगिक तत्वावर जवळपास गेल्या दहा वर्षांपासून केली जात असून या प्रयोगशाळेचा या क्षेत्रात जगात प्रथम क्रमांक आहे. याच कामाची दखल घेऊन डीबीटी (नवी दिल्ली) यांच्या वेबसाईटच्या होमपेजवर दोन वेळा झळकण्याचा बहुमान विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र अधिविभागाला दोनदा प्राप्त झाला आहे. ‘बायोरिमेडिएशन’ प्रक्रियेने नैसर्गिकरित्या रंगमिश्रित सांडपाण्यावर कोणतेही रासायनिक पदार्थ न वापरता यशस्वीपणे प्रक्रिया केली जाते. काही बॅक्टेरिया (उदा.सुडोमोनास बॅसिलास) निसर्गात उपलब्ध आहेत, ज्यांचाकडे मोठ्या संयुगाचे लहान/ सध्या संयुगात रुपांतर करण्याची क्षमता आहे. तसेच, आम्हाला असेही लक्षात आले की, वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये (जलचर वनस्पती: आयपोमिया अक्वॅटिका, आयपोमिया हेडरीफोलिया, साल्विनिया मोलेस्टा, टायफा अँगस्तीफोलिया, पॅस्पॅलम स्क्रोबीकुलॅटम, ब्लुमिया मालकोमी, फ्युम्रीस्टायलीस डायोक्टोमा; फुलझाडे:- पोरचुल्याका ग्रँडीफ्लोरा, ॲस्टर अमेलस, टेजेतेस प्याचुला, गेलाराडिया ग्रंडीफ्लोरा) मोठी संयुगे शोषून घेण्याची क्षमता आहे. रंगमिश्रित सांडपाणी या वनस्पतींच्या मधून सोडल्याने यातील हानीकारक पदार्थ शोषून घेतात. तसेच, बायलॉजिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी), केमिकल ऑक्सिजन डिमांड (सीओडी) आणि टोटल डीझॉव्हल्ड सॉलीड (टीडीएस) हे मूल्यांक कमी झाल्याचे दिसून येते. परिणामी, सांडपाणी स्वच्छ होते. तसेच, या वनस्पती काही पोषकद्रव्ये सांडपाण्यात सोडतात. ज्यांच्यामुळे नैसर्गिक बॅक्टेरिया वेगाने वाढतात. ते बॅक्टेरीया रंगद्रव्याचे रुपांतर साध्या रंगहीन पदार्थांत करतात; तसेच, हानीकारक/ विषारी पदार्थांचे रूपांतर बिनविषारी पदार्थांत करण्यासही मदत करतात. या वनस्पती काही संप्रेरके (ल्याकेज, ॲझो रीडक्टेज, लीगानीन पेरॉक्सिडेज) स्रवतात, ज्यामुळे विषारी पदार्थांचे रूपांतर बिनविषारी पदार्थांत होते. रंगमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता वनस्पती व बॅक्टेरिया यांचा एकत्रित वापर करणे ही अत्यंत कार्यक्षम प्रक्रिया आहे, अशी माहिती डॉ. जाधव यांनी दिली.

एमआयडीसीमध्ये प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित
सध्या रंगमिश्रीत सांडपाणी प्रक्रिया कागल येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एम.आय.डी.सी.) सात एकर जागेवर प्रत्यक्ष यशस्वीपणे कार्यरत आहे. कागल एम.आय.डी.सी.त ४५ एकर क्षेत्रात हाय रेट ट्रान्समिशन सिस्टीम (एच.आर.टी.एस.) तयार केली आहे. यामध्ये सलग नाला तयार करून बांधावर निलगिरी लावली आहे. या नाल्यातून सांडपाणी सोडले जाते. कॉमन एफ्लूयंट ट्रीटमेंट प्लँट (सी.इ.टी.पी.) त्यांच्याकडील सांडपाणी बायोरिमेडिएशन प्रक्रियेकरिता एच.आर.टी.एस. यंत्रणेमध्ये सोडतात. या यंत्रणेचा फायदा असा की, यातील निलगिरीची झाडे जास्तीत जास्त सांडपाणी शोषून घेतात. त्या सांडपाण्याबरोबर हानिकारक पदार्थ देखील शोषून घेतले जातात आणि झिरो डिस्चार्ज सिस्टीम तयार होते. एच.आर.टी.एस. क्षेत्रात डि-कलरायझेशन (रंग घालवण्याची क्षमता असणारी प्रक्रिया) क्षमता असणाऱ्या वनस्पतींची लागवड करून त्यामध्ये बॅक्टेरिया मिसळून तयार होणाऱ्या सिस्टीमला ‘फायटोरिॲक्टर’ म्हणतात. ही सिस्टीम अधिक क्षमतेने डि-कलरायझेशन प्रक्रिया करते. ती पर्यावरणपूरक व कमी खर्चिक आहे. प्रा. ज्योती जाधव आणि प्रा. एस.पी. गोविंदवार यांनी या संशोधनावर आधारित सुमारे १६५ शोधनिबंध विविध अंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकांतून प्रसिद्ध केले आहेत. डीबीटीच्या नवीन प्रकल्पात डिकलरायझेशन प्रक्रियेच्या जोडीला वीजनिर्मिती करण्याचे ध्येय संशोधकांनी बाळगले आहे.
दरम्यान, डीबीटी यांचेकडून हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प मंजूर झाल्याबद्दल कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी डॉ. ज्योती जाधव यांचे ग्रंथभेट देऊन अभिनंदन केले. या प्रसंगी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. भारती पाटील, डॉ. अनिल घुले, डॉ. एस.बी. सादळे उपस्थित होते.


1 comment: