शिवाजी विद्यापीठाचा
वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात
राधिका बराले |
कोल्हापूर, दि. २१
जुलै: आपले क्रीडाकौशल्य केवळ महाविद्यालयीन जीवनापुरते मर्यादित न राखता खेळांतच
करिअर करण्याबाबत गांभिर्याने विचार करा, असे आवाहन कोल्हापूरच्या शिवछत्रपती
पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय नेमबाज राधिका रोहित हवलदार (बराले) यांनी आज
येथे उदयोन्मुख क्रीडापटूंना केले.
शिवाजी
विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सन २०१५-१६मध्ये
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा
गुणगौरव समारंभ व संलग्नित महाविद्यालयांतील शारीरिक शिक्षण संचालकांसाठी एक
दिवसीय कार्यशाळा अशा संयुक्त समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. वि.स.
खांडेकर भाषा भवन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे क्रीडा व
शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अविनाश असनारे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी सन २०१५-१६मध्ये सर्वाधिक ५१४ गुणांसह अव्वल स्थान पटकावणाऱ्या कोल्हापूरच्या
दि न्यू कॉलेजला सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर ट्रॉफी
देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी राधिका बराले
म्हणाल्या, खेळांबद्दल अनास्थेचा काळ आता मागे पडला असून शासन क्रीडापटूंना अनेक
सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहे. विविध स्पर्धांत उत्तम कामगिरी करणाऱ्या
खेळाडूंना शासनाच्या विविध सेवांमध्ये सामावूनही घेतले जात आहे. त्यामुळे चांगल्या
खेळाडूंना खेळाच्या माध्यमातूनही आपले अतिशय चांगले करिअर घडविता येऊ शकते. याची
जाणीव ठेवून खेळाडूंनी मेहनतीने चांगले यश मिळविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन
त्यांनी केले. यावेळी राधिका यांनी शिवाजी विद्यापीठात नेमबाजीचे प्रशिक्षण व सराव
यासाठी दर्जेदार शूटिंग रेंज उभारण्याबाबत विचार व्हावा, अशी विनंती कुलगुरूंना या
प्रसंगी केली.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे |
यावेळी अध्यक्षीय
भाषणात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी चांगला खेळाडू होण्यासाठी क्रीडासंस्कार व
क्रीडा संस्कृती या दोन मूल्यांचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, खिलाडूवृत्ती
जोपासणे हा शब्दप्रयोगच मुळी खेळाडूंनी साहित्याला प्रदान केला आहे, इतके त्यांचे
महत्त्व आहे. पदक मिळाले नाही, तरी खेळाशी प्रतारणा न करणारा तो सच्चा खेळाडू होय.
यश मिळविणे ही सोपी बाब आहे, मात्र यश पचविणे हे अधिक कसोटी पाहणारे असते. यश हे
सावलीसारखे असते. त्याच्यामागे धावले तर ते कदापि गवसणार नाही. मात्र, प्रयत्न आणि
कष्टाच्या प्रकाशाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली तर यश आपल्या मागे येत राहील. नकारात्मक
विचारांवर मात करीत इतरांशी स्पर्धा न करता स्वतःशीच गुणात्मक व दर्जात्मक स्पर्धा
केल्यास यश निश्चित मिळते.
यावेळी राधिका बराले यांनी शूटिंग रेंज उभारण्यासंदर्भात केलेल्या सूचनेचा विद्यापीठ प्रशासन जरुर विचार करेल. त्यासंदर्भातील आवश्यक बाबींची पडताळणी करून डॉ. गायकवाड यांनी प्रस्ताव सादर कारावा, अशी सूचनाही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी केली.
यावेळी राधिका बराले यांनी शूटिंग रेंज उभारण्यासंदर्भात केलेल्या सूचनेचा विद्यापीठ प्रशासन जरुर विचार करेल. त्यासंदर्भातील आवश्यक बाबींची पडताळणी करून डॉ. गायकवाड यांनी प्रस्ताव सादर कारावा, अशी सूचनाही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी केली.
यावेळी डॉ. अविनाश
असनारे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या जिगरबाज खेळाडूंची मुक्तकंठाने प्रशंसा केली. त्यांचे
मार्गदर्शक, प्रशिक्षक व व्यवस्थापक यांचीही त्यांनी स्तुती केली.
यावेळी
मान्यवरांच्या हस्ते विविध सांघिक व वैयक्तिक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात
सन २०१५-१६मधील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या खेळाडूंचा
ब्लेझर, शिष्यवृत्ती व स्मृतिचिन्ह देऊन तर संघ व्यवस्थापक, क्रीडा प्रशिक्षक
यांचा ब्लेझर व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जे.एच. इंगळे यांनी
खेळाडूंना शपथ दिली. क्रीडा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. पी.टी. गायकवाड यांनी
स्वागत व प्रास्ताविक केले. शशिकांत दाभाडे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment