Wednesday 2 August 2017

आण्णा भाऊ साठेंच्या साहित्याचे पुनर्वाचन आजच्या तरुणांनी करणे आवश्यक - लहू कानडे



कोल्हापूर दि.1 ऑगस्ट - आण्णा भाऊ साठेंच्या साहित्याचे पुनर्वाचन आजच्या तरुणांनी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन साहित्यिक कवी लहू कानडे, अहमदनगर यांनी केले.

शिवाजी विद्यापीठातील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र यांचे वतीने विद्यापीठाच्या वि.स.खांडेकर भाषा भवन सभागृहामध्ये अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त लहू कानडे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी अध्यक्षस्थानी सामाजिक विज्ञान आणि कला विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ.भारती पाटील उपस्थित होत्या. 

      लहू कानडे म्हणाले, महापुरुषांची जयंती साजरी करण्यामागे, त्यांनी जो समाजाला उन्नत असा मार्ग दाखविलेला आहे तो आपल्याला प्रशस्त करता यावा आणि आपले जगणे सुसहय व्हावे, हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे.  आजचा तरुण विविध समाज माध्यमांद्वारे आपले मत व्यक्त करीत आहे, ही स्वागर्ताहबाब आहे.  या व्यवस्थेचे रुपडे बदलण्यासाठी तरुणांना ही व्यवस्था अधी समजून घ्यावी लागेल.  देशातील कष्टकरी जनतेमुळे त्यांच्या साहित्याचे जतन झालेले आहे तसेच त्यांचे गाणे आणि बजावणे टिकलेले आहे.  आण्णांनी लावणी, पोवाडे, छटावणी, शाहिरी हे सर्व प्रामुख्याने कष्टकरी लोकांसाठी लिहिले आहे.  साहित्य दरबारातील आण्णा भाऊंचा प्रवास अत्यंत कष्टदायक होता याबद्दल लहू कानडे यांनी सखोल वर्णन केलेे. 
 
पुढे ते म्हणाले, आण्णा भाऊ नेहमी म्हणत, साहित्य जर समाजाचा आरसा असेल तर तो स्वच्छ असावा त्यामध्ये समाजाचे स्वच्छ प्रतिबिंद दिसावे.  तसेच, जगण्याची आणि मरणाची रित समजून घेवून पुढे लिहिते व्हावे.  

अध्यक्षस्थानावरुन बोलताना सामाजिक विज्ञान आणि कला विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ.भारती पाटील म्हणाल्या, तरुणांना चांगले कामे करण्यासाठी संघर्षांची प्रेरणा या अध्यासन केंद्राकडून मिळते.  बहुजन समाजातील तरुणांमध्ये क्रांतीचे स्फुलिंग निर्माण करण्याचे कार्य या केंद्राकडून होईल.  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यासनाचे समन्वयक डॉ.राजन गवस यांनी केले.  प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.रणधीर शिंदे यांनी करुन दिला.  तर आभार डॉ.नंदकुमार मोरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीस अभिवादन करुन रंगराव पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी उत्सफुर्तपणे विविध शाहिरींचे सादरीकरण केले.  यावेळी अध्यासनाचे माजी समन्वयक डॉ.एम.एल.जाधव यांचेसह  आकाराम पाटील, डॉ.शरद गायकवाड, डॉ.मेघा पानसरे,     डॉ.एस.एस.महाजन, डॉ.आर.व्ही.गुरव आणि विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.  तसेच, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे येथून आलेले आण्णा भाऊ प्रेमी मान्यवर उपस्थित होते. 
.......

No comments:

Post a Comment