Friday 11 August 2017

शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी

डॉ. डी.टी. शिर्के यांची नियुक्ती

Dr. D.T. Shirke
कोल्हापूर, दि. ११ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. दिगंबर तुकाराम ऊर्फ डी.टी. शिर्के यांची नियमित प्र-कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती श्री. चे. विद्यासागर राव यांनी डॉ. शिर्के यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. मा. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या कार्यकाळाइतका डॉ. शिर्के यांचा कार्यकाळ असेल.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे कायदा, २०१६च्या कलम १३ (६) अन्वये मा. कुलपतींनी डॉ. शिर्के यांची निवड केल्याचे आदेशात म्हटले आहे. सध्या मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी असलेल्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी डॉ. शिर्के यांचे अभिनंदन केले आहे.
या निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्र-कुलगुरू डॉ.शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या हितासाठीच आजपर्यंत काम केले आहे. प्र-कुलगुरू पदाच्या कारकीर्दीतही विद्यापीठाच्या आणि सर्व संबंधित घटकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य राहील. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार या विद्यापीठाच्या प्रगतीसाठी कार्यरत राहणार आहे. मा. कुलपती यांनी आपल्यावर दर्शविलेल्या विश्वासाबद्दल डॉ. शिर्के यांनी त्यांना धन्यवाद दिले.
डॉ. शिर्के हे मूळचे वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील असून त्यांचे सुरवातीचे शिक्षण वडगाव हायस्कूलमध्ये झाले. वारणा महाविद्यालय तसेच विवेकानंद महाविद्यालयातून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या सांख्यिकी अधिविभागातून १९८७ साली पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्याचवर्षी ज्युनिअर रिसर्च फेलोशीप प्राप्त करून ते संशोधक म्हणून विभागात रुजू झाले. १९९०मध्ये सांख्यिकी विभागात ते अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. मार्च २००५मध्ये ते प्राध्यापक झाले. सांख्यिकी विभागाच्या प्रमुख पदाबरोबरच त्यांनी शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिवपदही भूषविले आहे. त्यांना अध्यापनाचा २७ वर्षांचा, संशोधनाचा ३० वर्षांचा तर अधिसभा, व्यवस्थापन परिषद व विद्यापरिषदेसह विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांवरील प्रशासकीय कामकाजाचा १५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. विद्यापीठाने त्यांना सन २०११मध्ये सर्वोत्कृष्ट अध्यापक म्हणूनही सन्मानित केले आहे.
डॉ. शिर्के यांचे ५५ हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १२ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. अमेरिका, स्वित्झर्लंड, पोर्तुगाल, जर्मनी, थायलंड, सिंगापूर, मलेशिया आदी देशांसह भारतातील ५० परिषदांना ते उपस्थित राहिले आहेत. सहा परिषदांच्या आयोजनात त्यांनी पुढाकार घेतला आहे. नेदरलँडच्या इंटरनॅशनल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटसह इंटरनॅशनल इंडियन स्टॅटिस्टिकल असोसिएशन आणि इंडियन सोसायटी फॉर प्रोबॅबिलीटी अॅन्ड स्टॅटिस्टिक्सचे ते आजीव सदस्य आहेत.

No comments:

Post a Comment