या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. यशवंतराव थोरात |
‘स्टॅटिस्टिकल रिपोर्ट ऑन द
प्रिन्सिपॅलिटी ऑफ कोल्हापूर’चे विद्यापीठात प्रकाशन
कोल्हापूर, दि. १४ ऑगस्ट: मेजर डी.सी. ग्रॅहम यांनी
१८५४ साली सादर केलेला अहवाल हा कोल्हापूरच्या इतिहासाचा आद्य ग्रंथ असून
कोल्हापूरच्या समृद्ध वारशाच्या पाऊलखुणा त्यात जागोजागी आढळतात, असे प्रतिपादन
ज्येष्ठ विचारवंत डॉ. यशवंतराव थोरात यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्रातर्फे
मेजर डी.सी. ग्रॅहम रचित व डॉ. जयसिंगराव पवार संपादित ‘स्टॅटिस्टिकल रिपोर्ट ऑन द
प्रिन्सिपॅलिटी ऑफ कोल्हापूर (सन १८५४)’ या दुर्मिळ अहवालाचे प्रकाशन डॉ. थोरात यांच्या
हस्ते विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात आज सकाळी करण्यात आले. त्यावेळी ते
बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज उपस्थित
होते, तर अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.
Dr. YSP Thorat |
मेजर ग्रॅहम यांनी तत्कालीन परिस्थितीत संकलित
केलेली तथ्ये व त्यांचे केलेले विश्लेषण याविषयी गौरवोद्गार काढताना डॉ. थोरात
म्हणाले, माझ्या आयुष्यात अनेक अहवाल पाहिले व लिहीले आहेत. तथापि, ग्रॅहम यांनी
करून ठेवलेले काम हे उत्तुंग स्वरुपाचे आहे. प्राथमिक तथ्यांचे संशोधनातील महत्त्व
अधोरेखित करणारा हा अहवाल आहे. केवळ इतिहासाच्याच नव्हे, तर कृषी, सहकार,
अर्थकारण, वाणिज्य-व्यवसाय, उद्योग अशा कोणत्याही प्रकारच्या संशोधकाला
कोल्हापूरच्या संदर्भात अभ्यास करताना या अहवालाला ओलांडून जाता येणार नाही, इतका
महत्त्वाचा हा दस्तावेज आहे.
डॉ. जयसिंगराव पवार यांनी या अहवालाच्या
अनुषंगाने जो परिचय लिहीला आहे, तो अत्यंत अजोड स्वरुपाचा असून त्यातून ते केवळ
इतिहासाचे अभ्यासकच नव्हेत, तर एक महान इतिहास विश्लेषक असल्याचे सिद्ध होते, असे गौरवोद्गारही
डॉ. थोरात यांनी या प्रसंगी काढले.
यावेळी डॉ. थोरात यांनी इतिहासाच्या
अभ्यासकांसमोर काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, इतिहास हा तथ्यांमधून
साकार होतो. तथ्ये ही वस्तुनिष्ठ असतात. नवी तथ्ये संशोधनांती हाती येईपर्यंत
उपलब्ध तथ्यांविषयी दुमत असण्याचे कारण नसते. त्यांचे विश्लेषण वेगवेगळ्या
पद्धतीने होऊ शकते. तथापि, आपण इतिहास कसा पाहतो, कोणी आपल्याला दाखवितो तसा
पाहतो, की आपल्याला जसा दिसतो, तसा पाहतो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. भारतीय इतिहासाच्या
संदर्भात हा प्रश्न आता अधिक महत्त्वाचा ठरतो आहे. आपल्याला आपला देश कसा हवा आहे? समाजवादी, धर्मनिरपेक्ष की
लोकशाहीवादी? लोकशाहीची साधने
हाताशी धरून अ-लोकशाहीवादी प्रवृत्ती जोपासल्या जात आहेत. लोकशाही आपल्याला
बोलण्याचा हक्क देते, हे जितके खरे, तितकेच ऐकण्याची जबाबदारीही सोपविते, याकडे
दुर्लक्ष करून कसे चालेल? आपण घटनात्मक मूल्ये जपली नाहीत, तर राज्यघटना बरखास्त करण्याची वेळ
आल्याखेरीज राहणार नाही, असा इशारा सन १९५०मध्येच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी
देऊन ठेवला होता, याची आठवण डॉ. थोरात यांनी यावेळी करून दिली. या पार्श्वभूमीवर
इतिहासाचा आदर राखण्याबरोबरच ऐतिहासिक संदर्भांची छाननी करीत असताना सत्याशी कधीही
तडजोड करू नका, असे आवाहन त्यांनी तरुण संशोधकांना यावेळी केले.
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यावेळी म्हणाले,
ग्रॅहमचा अहवाल नव्याने प्रकाशात आणून डॉ. पवार यांनी इतिहास संशोधकांवर थोर उपकार
केले आहेत. कोल्हापूरच्या इतिहासाच्या अभ्यासकांसाठी एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ या
निमित्ताने उपलब्ध झाला आहे. राजकीय, प्रशासकीय तसेच आर्थिक अहवाल हे इतिहास
संशोधनामध्ये मोलाची कामगिरी बजावित असतात. त्यातला हा आद्य ग्रंथ आहे. त्याचा
संशोधकांना निश्चितपणे मोठा लाभ होणार आहे.
डॉ. डी.टी. शिर्के |
प्र-कुलगुरू डॉ. शिर्के अध्यक्षीय मनोगतात
म्हणाले, ग्रॅहम यांचा अहवाल ही इतिहास संशोधकांसाठी व अभ्यासकांसाठी मोठी
मेजवानीच आहे. कोल्हापूरच्या इतिहासाच्या अभ्यासाचे एक नवे दालन या
संदर्भग्रंथाच्या निमित्ताने अभ्यासकांना खुले झाले आहे. शाहू संशोधन केंद्राने
गेल्या ४७ वर्षांत अनेक अमूल्य संदर्भग्रंथ अभ्यासक, संशोधकांना सादर केले आहेत.
प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार, डॉ. विलास संगवे आणि आता डॉ. जयसिंगराव पवार
यांनी त्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. डॉ. पवार तर गेल्या दहा वर्षांपासून केवळ
एक रुपया मानधन घेऊन या केंद्राचे काम सांभाळत आहेत. त्यांच्या या समर्पित कार्याप्रती
डॉ. शिर्के यांनी कृतज्ञता व्यक्त केली. हा संदर्भग्रंथ विद्यापीठाच्या ऑनलाइन
बुकस्टोअरवर लवकरात लवकर उपलब्ध करण्याबरोबरच विद्यापीठाचे अन्य आऊट ऑफ प्रिंट
असणारे संदर्भग्रंथही पुनर्मुद्रित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची ग्वाही
डॉ. शिर्के यांनी या प्रसंगी दिली.
डॉ. जयसिंगराव पवार यांनी आपल्या
प्रास्ताविकामध्ये या अहवालाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करताना त्याची सामाजिक-आर्थिक
संशोधनाच्या दृष्टीने बलस्थाने स्पष्ट केली. सुमारे १५० वर्षांहून अधिक काळ
अप्राप्य असणाऱ्या या ग्रंथापासूनच खऱ्या अर्थाने कोल्हापूरच्या आधुनिक इतिहासाची
सुरवात करावी लागणार असल्याचे नमूद केले. कोल्हापूरची शेती, उद्योगधंदे, जाती,
भाषा, चालीरिती, संस्कृती, परंपरा, ग्रंथनिर्मिती, धार्मिकता यांच्यापासून ते अगदी
पिशाच्चापर्यंतचा इतिहास साद्यंत सांगणारा हा अपूर्व ग्रंथ आहे, असेही त्यांनी
सांगितले.
कार्यक्रमात डॉ. थोरात यांच्या हस्ते अहवालाचे
प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांचा पदभार
स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच कार्यक्रम असल्याने श्रीमंत शाहू छत्रपती महाराज
यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले,
तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची
सांगता झाली. कार्यक्रमास कोल्हापुरातील इतिहासप्रेमी नागरिक, मान्यवर, शिक्षक व
विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment