Wednesday, 2 August 2017

चंपारण्य सत्याग्रह ही सामाजिक आंदोलनाची प्रयोगशाळा ठरली - ज्येष्ठ विचारवंत जयंत दिवाण



कोल्हापूर दि.2 ऑगस्ट -  चंपारण्य सत्याग्रह ही महात्मा गांधीजींची सामाजिक आंदोलनाची प्रयोगशाळा ठरली,  असे प्रतिपादन मुंबई येथील ज्येष्ठ विचारवंत जयंत दिवाण यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचे गांधी अभ्यास केंद्र आणि राज्यशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने   विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये डॉ.उषा मेहता स्मृती व्याख्यानांतर्गत चंपारण्य लढयाची शतकपूर्ती या विषयावर ज्येष्ठ विचारवंत जयंत दिवाण, मुंबई यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी अध्यक्षस्थानी डॉ.अशोक चौसाळकर हे उपस्थित होते.  
जयंत दिवाण पुढे म्हणाले, डॉ.उषा मेहता यांच्या माध्यमातून महात्मा गांधीजी कळाले.  चंपारण्य सत्याग्रहाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत.  चंपारण्यामध्ये लोकांवर अन्याय होत होता. निळीची शेती करुन त्याच्या पानापासून रस निर्माण करण्यात येत होते.  चंपारण्य हे वसाहतवादाचे छोटेसे उदाहरण होते.  कच्च्या मालापासून पक्कामाल तयार करुन त्याच्यामधून फायदा करुन घेणे हे त्या ठिकाणी घडत होते.  त्यावेळी पूर्व आणि पश्चिम चंपारण्य असे भाग नसून ते पूर्ण होते.  त्याठिकाणी 72 कोठीवाले म्हणजे ब्रिटीश लोकांची मक्तेदारी मोठयाप्रमाणात होती.  निळ पेरण्यासाठी शेतकऱ्यांवर अन्याय, अत्याचार आणि जुलूम केले जात होते.  या शोषणा विरुध्द लढा देण्यासाठी गांधीजींनी प्रयत्न सुरु केले.  हे कोठीवाले स्वत:ला सर्वेसर्वा समजत होते.  शेतकऱ्यांवर मनमानी कर लावत होते.  त्यावेळची जनता करापोटी मोठयाप्रमाणात भरडली जात होती.  त्यांचे वयैक्तिक, मानसिक, शारीरिक आर्थिक शोषण होत होते.  माणसांच्या मनाची उभारी या कोठीवाल्यांनी संपवली होती.  सातत्याने स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये लिखाण होवूनही त्यावर मार्ग निघत नव्हते.  अशा परिस्थितीत महात्मा गांधीजी त्या ठिकाणी गेले आणि त्यांच्या चंपारण्य येथील वैशिष्टपूर्ण लढयामुळे हे आंदोलन एक सामाजिक आंदोलन ठरले.  नवीन समाज घडविण्यासाठी गांधीजींनी या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करीत गेलेे.  अशा प्रकारे भारतीय स्वातंत्र्याची ती एक प्रयोगशाळाच ठरली.  निळीच्या प्रश्नाबाबत भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी चंपारण्याचा सत्याग्रह करण्यात आला होता.  त्या ठिकाणचे प्रमुख शहर मोतीहारी येथे महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग केला.  चंपारण्याच्या लढयामध्ये गांधीजींनी रचनात्मक कामेही जोडली.  गांधीजींच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गावचे रस्ते साफसफाई करणे, विहीरींजवळची चिखल काढणे, आश्रम शाळेमध्ये मुलांना एकत्र करणे यामुळे अत्याचारग्रस्त लोकांना खुप मोठा आधार मिळत गेला पुढे चंपारण्याचा लढा यशस्वी झाला.
   अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ.अशोक चौसाळकर म्हणाले,  भारत देशामध्ये बिहार आणि बंगाल येथे निळीचे उत्पादन घेण्यात येत होते.  यामुळे ब्रिटीशांची आर्थिक पकड येथील साम्राज्यावर घट्ट होत गेली.  ती महात्मा गांधीजींच्या चंपारण्य येथील तीव्र लढयापुढे निष्फळ ठरली. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख पाहुण्यांचा परिचय सामाजिक विज्ञान आणि कला विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ.भारती पाटील यांनी केले.  आभार कार्यक्रमाचे  संयोजक डॉ.प्रकाश पवार यांनी मानले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी आणि डॉ.उषा मेहता यांंचे प्रतिमा पुजन करण्यात आले.यावेळी डॉ.भगवानराव माने, अवनिश पाटील यांचेसह विद्यापीठातील विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.
-----

No comments:

Post a Comment