कोल्हापूर, दि. २८
ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठात गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू असलेल्या मधुमेहविषयक
संशोधनातून उपयुक्त आयुर्वेदिक औषध निर्माण करण्यात यश आले आहे. आता अंतिम
टप्प्यातील मानवी चाचण्यांसाठी शिवाजी विद्यापीठाने नुकताच येथील डॉ. डी.वाय. पाटील
हॉस्पिटलशी सामंजस्य करार केला आहे.
शिवाजी
विद्यापीठाच्या जैवरसायनशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. अकल्पिता अरविंदेकर यांना
राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाच्या (रुसा) अंतर्गत सुमारे ३५ लाख रुपयांचा
महा-संशोधन प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. ‘स्टॉप डायबिटीस- डेव्हलपमेंट ऑफ
न्यूट्रास्युटिकल प्रोडक्ट फॉर प्रिव्हेन्शन ऑफ प्रोग्रेशन ऑफ प्रि-डायबिटीस टू
डायबिटीस मेलिटस’ असे या प्रकल्पाचे नाव आहे.
डॉ. अरविंदेकर
यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांचा गट गेल्या १५ वर्षांपासून मधुमेहासंदर्भात
आयुर्वेदिक उपचार पद्धती शोधण्यासाठी संशोधन करीत आहे. त्यासाठी त्यांना येथील
आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. विवेक हळदवणेकर यांचेही सहकार्य लाभत आहे. या संशोधनांतर्गत
गेल्या तीन वर्षांपासून मधुमेहाची सुरवात नेमकी कशामुळे होते, यावर लक्ष्य केंद्रित
करण्यात आले आहे. त्यातून संशोधित करण्यात आलेल्या औषधाची विविध मान्यताप्राप्त प्रयोगशाळांत
तसेच प्राण्यांवरही यशस्वी चाचण्या करण्यात आल्या आहेत. आता मानवी चाचण्यांसाठी
डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटलसमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला
हॉस्पिटलच्या नोंदणीकृत नैतिक समितीची मान्यताही प्राप्त झाली आहे.
शिवाजी विद्यापीठाचे
प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत गेल्या २३ ऑगस्ट रोजी
झालेल्या या सामंजस्य करारावर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर व
डॉ. अकल्पिता अरविंदेकर यांनी तर डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या वतीने कुलसचिव डॉ.
व्ही.व्ही. भोसले व अधिष्ठाता डॉ. आर.के. शर्मा यांनी स्वाक्षरी केल्या.
विद्यापीठाय संशोधनाचा
समाजाला व्यापक लाभ होण्याच्या दृष्टीने या सामंजस्य कराराचे महत्त्व अनन्यसाधारण
असल्याचे मत डॉ. शिर्के यांनी या प्रसंगी व्यक्त केले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
यांनी या प्रकल्पाला सातत्याने दिलेल्या प्रोत्साहनामुळेच आज हा सामंजस्य करार होत
असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कराराअंतर्गत
करण्यात येणाऱ्या चाचण्यांना रुसा (महाराष्ट्र) यांचे सहकार्य असेल. या अंतर्गत मधुमेहग्रस्त,
मधुमेह-पूर्व तसेच नियंत्रित अशा तीनही प्रकारच्या सुमारे शंभर रुग्णांवर चाचण्या
घेण्यात येणार असून त्यांच्यावरील औषधाच्या परिणामांचा अभ्यास करण्यात येणार आहे.
या प्रकल्पावर प्रा. शिम्पा शर्मा या सह-प्रधान संशोधक म्हणून तर डॉ. अरविंद
गुलबके आणि डॉ. वेणुगोपाल हे सह-प्रकल्प संशोधक म्हणून काम करीत आहेत.
No comments:
Post a Comment