Wednesday, 23 August 2017

विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी

शिवाजी विद्यापीठाचा जिल्हा प्रशासनाशी सामंजस्य करार




कोल्हापूर दि. २३ ऑगस्ट: कोल्हापूर जिल्ह्यात विविध शासकीय योजना व उपक्रम विद्यार्थ्यांच्या सहभागातून राबविण्यासाठी शिवाजी विद्यापीठ आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी कुलगुरु डॉ.देवानंद शिंदे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, प्र-कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर, प्रभारी वित्त लेखाधिकारी अजित चौगुले यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
गेल्या शनिवारी (दि. १९) करण्यात आलेल्या या करारान्वये विविध शासकीय योजना, उपक्रम समाजाच्या तळागाळातील अंतिम घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच जनजागृती करण्यासाठी संयुक्तपणे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी विद्यापीठातील तंत्रज्ञानाचा, प्राध्यापकांचा विद्यार्थ्यांमधील कौशल्यांचा उपयोग करुन सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ गतीने पोहचविण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम संयुक्तपणे केले जाईल, शी ग्वाही कुलगुरु डॉ. शिंदे यांनी दिली.
या सामंजस्य कराराचे कार्यक्षेत्र कोल्हापूर जिल्हयापुरते मर्यादित असून कराराचा कालावधी पाच वर्षांचा असणार आहे. जिल्हा प्रशासन व त्याअंतर्गत येणारे विविध प्रशासकीय विभाग यांच्यासोबत प्रसिद्धी, प्रचार, प्रशिक्षण, क्षेत्रीय सर्वेक्षण, नाविन्यपूर्ण उपक्रम, संशोधन, चर्चासत्रे, परिसंवाद, शिक्षक व विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध प्रकल्प संशोधनासाठी सहभाग, मनुष्यबळ संशोधन व विकास, उद्योजकता विकास उपक्रम, कौशल्य विकास, समूह विकास, जलयुक्त शिवार, मेक इन इंडिया, कॅशलेस इंडिया, जन-धन योजना, आर्थिक साक्षरता, स्वच्छ भारत अभियान, वनीकरण, रस्ते सुरक्षा योजना, खादी ग्रामोद्योग विकास, मतदार जागृती अभियान, बेटी बचाओ अभियान, डिजीटल इंडिया तसेच अन्य राष्ट्रीय उपक्रम इत्यादींसह इतर शासकीय व विद्यापीठीय उपक्रम संयुक्तपणे राबविण्यात येणार आहेत. यात वेळोवेळी शासनाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या उपक्रम व योजनांचाही वेळोवेळी समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारे अध्ययन, अध्यापन, संशोधन आदींची जबाबदारी विद्यापीठाकडे असेल. या अंतर्गत जिल्ह्यातील तलाठी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सात-बारा व ई-चावडीबाबत माहिती व प्रशिक्षण देणार आहेत. त्याचप्रमाणे खरेदी प्रक्रिया व महाराष्ट्र राज्य सेवा नियमांबाबत जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळांत ई-लर्निंग सुविधा निर्मिती करण्याच्या दृष्टीने शिक्षक प्रशिक्षण आणि विद्यार्थी अध्ययन विकास यांचे प्रशिक्षण विद्यापीठातील शिक्षक देतील. विद्यापीठाचा भूगोल अधिविभाग जिल्हाधिकारी कार्यालयाला जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणांचे तंतोतंत जीपीएस टॅगिंग करण्यासाठी सहकार्य करणार आहे. या अनुषंगाने होणाऱ्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन जिल्हा प्रशासन यांच्या स्वतंत्र समन्वय समिती गठीत करण्यात ल्या आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि विद्यापीठाच्या वतीने प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले नोडल ऑफिसर म्हणून काम पाहात आहेत.

No comments:

Post a Comment