Sunday, 6 August 2017

शिवाजी विद्यापीठाचा स्वच्छतेशी रक्षाबंधनाचा संकल्प

रंकाळा स्वच्छता मोहिमेत सात टन कचऱ्याचा उठाव; सुमारे आठशे विद्यार्थ्यांचा सहभाग


शिवाजी विद्यापीठाच्या वतीने राबविण्यात आलेल्या रंकाळा परिसर स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व अन्य मान्यवर.


शिवाजी विद्यापीठाच्या रंकाळा परिसर स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक.


रंकाळा परिसर स्वच्छता मोहिमेत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी विद्यार्थ्यांसमवेत पूर्ण वेळ सहभाग नोंदविला.










कोल्हापूर, दि. ६ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आज सकाळी रंकाळा परिसरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एन.एस.एस.) सुमारे आठशे विद्यार्थ्यांनी रंकाळा परिसर लखलखीत केला. रोटरी क्लब ऑफ करवीरच्या सदस्यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. आजच्या मोहिमेअंतर्गत सुमारे सात टन कचऱ्याचा उठाव करण्यात आला. विशेष म्हणजे यंदा प्लास्टीक कचऱ्याची पूर्णतः स्वतंत्र वेचणी करण्यात आली. मोहिमेत सुमारे १०० किलो प्लास्टीक कचरा गोळा करण्यात आला.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी आठ वाजता स्वच्छता अभियानास प्रारंभ करण्यात आला. कुलगुरू डॉ. शिंदे उद्घाटनपर भाषणात म्हणाले की, महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या निर्देशानुसार शिवाजी विद्यापीठाने रंकाळा परिसराची नियमित स्वच्छता करण्याची मोहीम हाती घेतली आहे. रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी विद्यापीठाकडून स्वच्छता मोहीम नियमितपणे राबविण्यात येईल. उद्याच्या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या मनातच स्वच्छतेशी रक्षाबंधन करण्याचा संकल्प सोडल्यास संपूर्ण देश स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही.
यावेळी विद्यार्थ्यांनी इराणी खणीसह मोहिते खण, रंकाळा पदपथ पतौडी उद्यान, संध्यामठाकडील उद्यान तसेच रंकाळ्याच्या बाजूने जाणारा रस्ता या परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. घनकचरा, प्लास्टीक कचरा, काचा व प्लास्टीकच्या बाटल्या विद्यार्थ्यांनी गोळा केल्या. सुमारे तीन तास राबविलेल्या या मोहिमेत सुमारे सात टन कचरा गोळा करण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने २ हैवा डंपर, एक पाण्याचा टँकर उपलब्ध करून देण्यात आले. विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग आणि रोटरी क्लब ऑफ करवीर यांच्याकडून झाडू, विळे, टोपल्या, पोती, हातमोजे व मास्क आदींची उपलब्धता करण्यात आली.
विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, रोटरी क्लबचे एस.एन. पाटील, विशाळ जांबळे, प्रमोद चौगुले, ज्ञानदेव केसरकर, हरेष पटेल, कुशल पटेल, मनोज कोळेकर, शीतल दुग्गे, किरण खटावकर, काशीनाथ सांगावकर यांच्यासह शहरातील विविध महाविद्यालयांचे एन.एस.एस.चे समन्वयक यांनी स्वच्छता अभियान यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. विद्यापीठातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांबरोबरच कोल्हापूर शहरातील विविध महाविद्यालयांसह सांगली, सातारा जिल्ह्यांतील महाविद्यालयांतील सुमारे आठशे एनएसएस स्वयंसेवकांनीही स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.

प्लास्टीक कचऱ्याचे स्वतंत्र संकलन
आजच्या मोहिमेत प्लास्टीक कचऱ्याचे स्वतंत्र संकलन करण्यात आले. रोटरीमार्फत पुरविण्यात आलेल्या पोत्यांमध्ये निव्वळ प्लास्टीक कचरा संकलित करून स्वतंत्र वाहनातून तो पुनर्प्रक्रियेसाठी पाठविण्यात आला. रोटरी क्लबच्या वतीने पर्यावरण रक्षणाबरोबरच स्वच्छतेचा संदेश देणारे वाहनही मोहिमेत सहभागी होते.

इराणी खण परिसरात कचऱ्याचे प्रमाण होतेय कमी
शिवाजी विद्यापीठाने नियमितपणे रंकाळा परिसरातील इराणी खण परिसरात स्वच्छता मोहीमा राबविल्या आहेत. दहा टन भरेल इतका कचरा केवळ या परिसरातून यापूर्वी उचलण्यात आलेला आहे. मात्र आजच्या मोहिमेत या परिसरातील कचऱ्याचे व प्लास्टीक कचऱ्याचेही प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले. नागरिकांनी आपापल्या परिसरात अशीच जागरुकता दाखवून स्वच्छतेची सवय अंगी बाणवली, तर स्वच्छ भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यास वेळ लागणार नाही, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

क्रांतीदिनी महा-स्वच्छता अभियान
येत्या नऊ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनानिमित्त सकाळी ८ ते ११ या वेळेत कोल्हापूर शहर परिसरातील विविध प्राचीन वास्तू, पुतळे, रस्ते व परिसरात शिवाजी विद्यापीठाच्या वतीने महा-स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये शिवाजी विद्यापीठ परिसरासह बिंदू चौक, शिवाजी चौक, भवानी मंडप, महालक्ष्मी मंदिर, गंगावेस, रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टँड, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, कावळा नाका, खासबाग, गांधी मैदान आदी २८ ठिकाणच्या पुतळ्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. यात शहरातील विविध महाविद्यालयांचे एनएसएसचे स्वयंसेवक सहभागी होणार आहेत, अशी माहिती एनएसएस समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांनी दिली.

2 comments:

  1. This is good initiative but there is one doubt The University's
    concerned officials can clarify if they feel so. The Programme was organised on August 6 but how the timing of story posted shows 23:58 on August 5?

    ReplyDelete
  2. Dear sir, the story is posted at around 12.15 pm on 6th August 2017 after the cleanliness drive. But the author has no control over the blogger's date and time display, hence this has happened. Trust, the University PRO never sends you the pre-prepared news as he himself has good experience in journalism and Government Public Relations. He knows the importance of live feed in news. Hope your query is clarified. Thank you.

    ReplyDelete