विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाकडून पाहणी
कोल्हापूर, दि.
१६ सप्टेंबर: अनंत चतुर्दशीनिमित्त काल रात्री शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ध्वनीप्रदुषणाची पातळी
गतवर्षीपेक्षा कमी झाली असली, तरी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून
दिलेल्या मार्गदर्शक पातळीपेक्षा अधिकच असल्याचे दिसून आले, अशी माहिती शिवाजी
विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. पी.डी. राऊत यांनी आज
येथे दिली. राजारामपुरीतील ध्वनीप्रदुषणाची पातळी मात्र गतवर्षीपेक्षा वाढल्याचे
आढळले असल्याचेही त्यांनी सांगितले.
यंदा उच्च
न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस प्रशासनासह विविध माध्यमांतून डॉल्बीबंदीचा
पुरस्कार करण्यात आला. कोल्हापुरातील अनेक गणेश मंडळांनी याला सकारात्मक प्रतिसाद
दिला. याचा परिणाम यंदाच्या ध्वनीप्रदूषणाची पातळी खालावण्यात झाला असला तरी,
अद्यापही ही पातळी आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मतही डॉ.
राऊत यांनी व्यक्त केले.
डॉ. राऊत म्हणाले, विद्यापीठाच्या पर्यावरण
शास्त्र विभागाचे विद्यार्थी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून दर वर्षी गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीमध्ये कोल्हापूर शहरात होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाची पातळी तपासतात. याच
उपक्रमांतर्गत यंदाही गणेशोत्सवा दरम्यान विद्यार्थ्यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचीनुसार ध्वनीप्रदुषणाचे मोजमाप केले. या मार्गदर्शक
सूचीनुसार अभ्यास करताना कोल्हापुरातील रहिवासी क्षेत्र, शांतता क्षेत्र, औद्योगिक
क्षेत्र आणि व्यापारी क्षेत्र अशा सर्व ठिकाणी मोजमाप करण्यात आले. ही मोजमापे
ध्वनीमापक उपकरणाद्वारे (Sound Level Meter) डेसिबल या एककात मोजमाप करण्यात आले. व्यावसायिक क्षेत्रात ध्वनीप्रदूषणाची पातळी मार्गदर्शक सूचीनुसार रात्री ५५ डेसिबल
असावी लागते. ती महाद्वार
रोडवर यंदा ९९.५ डेसिबल इतकी आढळली, जी
गेल्या वर्षी १०३.५ डेसिबल इतकी होती. गुजरीमधील ध्वनीप्रदुषणाची पातळीही
गतवर्षीच्या १०३.९ डेसिबलच्या तुलनेत यंदा ९७.७ डेसिबल इतकी कमी झाल्याचे आढळले.
औद्योगिक क्षेत्रामध्ये वाय.पी. पोवार नगरातील ध्वनीप्रदूषण पातळी ६७.० वरुन ६१.३ डेसिबल
इतकी लक्षणीय कमी झाल्याचे आढळले आहे.
सी.पी.आर. न्यायालय, जिल्हाधिकारी
कार्यालय या शांतता क्षेत्रांमध्ये ध्वनीप्रदुषणाची पातळी कमी झाली असली तरी मार्गदर्शक सूचीपेक्षा अधिकच आढळून आली.
शहरातील
ध्वनीप्रदुषणाची पातळी मोजण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पी.डी. राऊत यांच्या नेतृत्वाखाली डॉ. श्रीमती ए.एस.
जाधव, डॉ. एस.बी. मांगलेकर, श्रीमती पल्लवी भोसले, अक्षय पाटील व आकाश कोळेकर
यांनी परिश्रम घेतले.
यंदाच्या
ध्वनीप्रदुषणाची पातळी क्षेत्रनिहाय व परिसरनिहाय डेसिबलमध्ये पुढीलप्रमाणे (कंसात
गतवर्षीची पातळी):
शांतता
क्षेत्र (रात्रीची मार्गदर्शक पातळी- ४०): सीपीआर ६७.६ (७१.८),
न्यायालय ६३.२ (७१.९), जिल्हाधिकारी कार्यालय ६४.१ (६४.७).
रहिवासी
क्षेत्र (रात्रीची मार्गदर्शक पातळी- ४५): राजारामपुरी ६२.४ (६१.२),
उत्तरेश्वर पेठ ६३.५ (७३.४), शिवाजी पेठ ६३.८, मंगळवार पेठ ७९.९, नागाळा पार्क
५८.५, ताराबाई पार्क ६१.८.
व्यावसायिक
क्षेत्र (रात्रीची मार्गदर्शक पातळी- ५५): महाद्वार रोड ९९.५ (१०३.५),
गुजरी ९७.७ (१०३.९), मिरजकर तिकटी ९६.१, बिनखांबी गणेश मंदिर ९६.५, पापाची तिकटी
९८.६, लक्ष्मीपुरी ६७.८, शाहूपुरी ६७.७.
औद्योगिक
क्षेत्र (रात्रीची मार्गदर्शक पातळी- ७०): उद्यमनगर ६७.५ (६७.५),
वाय.पी. पोवार नगर ६१.३ (६७.०).
विद्यापीठाच्या मूर्तीदान उपक्रमासही वाढता प्रतिसाद
शिवाजी विद्यापीठाच्या
पर्यावरण शास्त्र अधिविभागामार्फत सन २००८पासून कोटीतीर्थ परिसरात दरवर्षी घरगुती
गणेश विसर्जनादरम्यान मूर्तीदान तसेच पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रम राबविला
जातो. यंदाही कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम
राबविण्यात आला. या वेळी भाविकांनी सुमारे २६३८ मूर्ती दान केल्या. दरवर्षी या
उपक्रमास सातत्याने वाढता प्रतिसाद लाभतो आहे. सन २००८मध्ये अवघ्या २३०
मूर्तींपासून सुरू झालेल्या या उपक्रमात सन २००९ ते २०१५ या कालावधीत अनुक्रमे
२५१, ३२०, ४९२, ६५०, ९१०, १७३६ व २४०० असा वाढता प्रतिसाद लाभला. लोकांमध्ये
पर्यावरणाप्रती होत असणारी ही जागृती अत्यंत उत्साहवर्धक असल्याची भावना डॉ. राऊत
यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment