डॉ. रवींद्र ठाकूर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करताना डॉ. नागनाथ कोत्तापल्ले. शेजारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. |
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले |
डॉ. रवींद्र ठाकूर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मराठी विभागात राष्ट्रीय चर्चासत्र
कोल्हापूर, दि. २३
मार्च: सध्या ज्ञानाचा गतिमान पद्धतीने विकास होतो आहे. या परिस्थितीत केवळ मराठीच
नव्हे, तर सर्वच विषयांच्या अध्यापनासंदर्भात नव्याने विचार व मांडणी करण्याची गरज
आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा
मराठी अधिविभाग आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने
डॉ. रवींद्र ठाकूर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त ‘महाविद्यालयीन स्तरावरील मराठीचे अध्यापन’ या विषयावरील एकदिवसीय
राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कोत्तापल्ले बोलत होते. वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात
झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
डॉ. कोत्तापल्ले
म्हणाले, सद्यस्थितीत ज्ञानविस्तार हा प्रचंड गतीने आणि अनेक दिशांनी होतो आहे.
सर्व ज्ञानशाखा परस्परांशी सम्मिलीत होऊन त्यातून पुन्हा नवीन ज्ञानशाखा उदयास येत
आहेत. अशा परिस्थितीत पारंपरिक अभ्यासक्रम आणि अध्यापन प्रक्रियेमध्ये शिक्षकांनी
अडकून राहता कामा नये. नव्या ज्ञानाचा, त्याच्या विस्ताराचा आवाका लक्षात घेऊन
स्पेशलायझेशनबरोबरच अन्य विद्याशाखांमधील ज्ञानाचा आधार घेऊन आपल्या विषयाशी
त्याची सांगड कशा पद्धतीने घालता येईल, याचा अभ्यास शिक्षकांनी करण्याची गरज आहे.
मराठी हा विषय केवळ
या विषयाच्या शिक्षकांपुरता मर्यादित नसावा, अशी अपेक्षा व्यक्त करून डॉ.
कोत्तापल्ले म्हणाले, मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, ज्ञानव्यवहाराची भाषा व्हावी, असे
जोपर्यंत प्रत्येकाला वाटत नाही, तोपर्यंत तिचा विकास होणे अशक्य आहे. ही भाषा
माझी आहे, असे लोकांना का वाटत नाही, याविषयीचे चिंतनही करणे आवश्यक आहे. भाषेला अस्मिता,
अहंगंडाची पुटे चढविणे चुकीचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
मराठी विभागाने
केलेल्या या सत्कार समारंभामुळे आपण अत्यंत भावनाविवश झाल्याचे सांगून डॉ. ठाकूर
म्हणाले, मराठीसह अन्य भाषा विषयांबाबत वाढते औदासिन्य चिंताजनक आहे. काळाच्या
मागण्या सातत्याने बदलताहेत, त्या मागण्यांची पूर्तता करण्याचे आणि त्यांना सामोरे
जाणारी पिढी घडविण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या
जीवनव्यवहारात आपण मराठीचा संपूर्ण वापर करणार आहोत की नाही, हा कळीचा प्रश्न आहे.
जगभरातले ताजे ज्ञान मराठीत यावयाचे असेल तर, त्याचा तत्काळ अनुवाद करून
विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना देण्याची मोठी गरज आहे. मात्र, त्यासाठी अनुवादित
साहित्याकडे पाहण्याचा आपला कलुषित दृष्टीकोन बदलावा लागेल. त्याचप्रमाणे भाषासमृद्धीसाठी
समीक्षेवर आधारित अभ्यासक्रमाऐवजी सर्जनशील लेखनाला प्राधान्य देण्याची आवश्यकता
असल्याचेही त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. शिंदे
म्हणाले, आईइतकाच सन्मान मातृभाषेलाही देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. छत्रपती
शिवाजी महाराजांनी त्या काळात अन्य संस्थानिक, राजे अरबी, ऊर्दू, फारसी भाषांच्या
प्रभावाखाली असताना आपला पत्रव्यवहार मराठीतून करण्यास प्राधान्य दिले. हे मराठी
भाषेला महाराजांचे फार मोठे योगदान आहे. हा आदर्श समोर ठेवून आपण मराठीतून
व्यवहारास प्राधान्य द्यायला हवे. त्याचप्रमाणे मराठीच्या अध्यापनाविषयी चर्चा
करीत असताना वाङ्मयीन समीक्षेबद्दलही सांगोपांग विचार करण्याची गरजही त्यांनी
व्यक्त केली.
डॉ. ठाकूर हे अत्यंत
मृदुभाषी, शांत व सुस्वभावी अध्यापक आणि तितक्याच ताकतीचे सृजनशील लेखक असल्याचे
कौतुकोद्गारही त्यांनी या प्रसंगी काढले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्याचा विभागाचा
उपक्रम स्तुत्य असल्याचेही मत कुलगुरूंनी व्यक्त केले.
यावेळी डॉ.
कोत्तापल्ले यांच्या हस्ते डॉ. रवींद्र ठाकूर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक
सत्कार करण्यात आला. अधिविभागप्रमुख डॉ. राजन गवस यांनी स्वागत व प्रास्ताविक
केले, तर शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवकुमार सोनाळकर यांनी
आभार मानले. यावेळी डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे यांच्यासह मराठीचे
महाविद्यालयीन शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.