‘ग्रंथांनी रचलेला महापुरूष: यशवंतराव चव्हाण’ ग्रंथाचे विद्यापीठात
प्रकाशन
Vijay Kuwalekar |
कोल्हापूर, दि. १४
मार्च: सभ्यता, सुसंस्कृतता आणि अभिजातता यांचा तिहेरी संगम यशवंतराव चव्हाण यांच्या
व्यक्तीमत्त्वात आढळतो. त्याचे प्रतिबिंब ‘ग्रंथांनी रचलेला महापुरूष’ या ग्रंथात पानोपानी
आढळते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि राज्याचे माजी माहिती आयुक्त
विजय कुवळेकर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे
यशवंतराव चव्हाण अध्यासन आणि येथील आनंद ग्रंथसागर प्रकाशन यांच्या संयुक्त
विद्यमाने ‘ग्रंथांनी रचलेला महापुरूष: यशवंतराव चव्हाण’ या डॉ. आनंद पाटील यांनी लिहिलेल्या ग्रंथाचा
प्रकाशन सोहळा विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे
म्हणून ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील
प्रमुख उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
Vijay Kuwalekar |
यशवंतराव चव्हाण
यांना महाराष्ट्राने राज्यापुरते संकुचित करून ठेवले, हे दुर्दैव असून त्या
विचारसरणीतून बाहेर काढणारा हा एक वेगळा वाङ्मयीन चरित्रग्रंथ असल्याचे सांगून
श्री. कुवळेकर म्हणाले, राष्ट्रीय पातळीवरील असामान्य नेत्याचे विचारचरित्र या
ग्रंथाच्या माध्यमातून साकारले आहे. आजकाल वाचणारे नेते कमी होताहेत, साऱ्यांनाच
यशाचे शॉर्टकट हवे आहेत, सभ्यता, सुसंक्तपणाची पातळी खालावते आहे. या
पार्श्वभूमीवर स्वखर्चाने आठ हजारांहून अधिक ग्रंथ खरेदी करून त्यांचे वाचन करणारा
आणि त्यातून प्राप्त ज्ञानाचा आपल्या राष्ट्रासाठी वापर करणारा यशवंतरावांसारखा
दुर्मिळ नेता आपल्याला लाभला. यशवंतरावांनी त्यांच्या हयातीत अनेक मोठमोठी पदे
भूषविली, त्यातून ते आर्थिकदृष्ट्या श्रीमंत झाले नाहीत; तथापि, वाचनामुळं ते
वैचारिक आणि तत्त्वज्ञानदृष्ट्या मात्र अत्यंत समृद्ध झाले.
ग्रंथातून वाचलेले
तत्त्वज्ञान आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न करणारा नेता म्हणजे यशवंतराव,
असा उल्लेख करून श्री. कुवळेकर म्हणाले, कुणब्याचा पोर ते देशाचा उपपंतप्रधान अशी
मजल मारणाऱ्या यशवंतरावांची मुळे मातीत घट्ट रोवलेली होती. वाचनाने आकाशाला गवसणी
घालण्याचे बळ त्यांच्या पंखांत निर्माण केले. त्यांच्या व्यक्तीमत्त्वात आढळणाऱ्या
मानवतावादी विचारसरणीची बीजे वाचनानेच निर्माण केली. सातत्यपूर्ण वाचनामुळेच
यशवंतरावांच्या प्रतिपादनात कधीही पुनरावृत्ती आढळत नाही. महान होऊनही विनम्र
असण्याचे आणि संयत पद्धतीने व्यक्त होण्याचे मूळही त्यातच आढळते. वाचनानेच
यशवंतरावांसारखा निष्कलंक चारित्र्याचा पारदर्शक आणि निखळ माणूस घडला, असे मत
त्यांनी व्यक्त केले.
पद्मश्री डॉ.
डी.वाय. पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. ते
म्हणाले, अप्रतिम वक्तृत्व आणि अफाट वाचन असणाऱ्या यशवंतरावांची कामगिरी अतुलनीय
आहे. त्यांच्यापूर्वी आणि नंतरही असे बहुआयामी व्यक्तीमत्त्व आणि नेतृत्व महाराष्ट्रात
निर्माण झाले नाही, होणार नाही.
अध्यक्षीय भाषणात
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या प्रगतीचे यशवंतराव चव्हाण
शिल्पकार होते. नितीमूल्यांबद्दल अत्यंत आग्रही असणाऱ्या या नेत्याने तितक्याच
सचोटीने विविध क्षेत्रांत कार्य केले आणि त्या कार्याचा स्वतंत्र ठसा उमटविला.
ग्रंथवाचनाने माणूस मोठा नव्हे, तर शहाणा निश्चित होतो, असे मानणाऱ्यापैकी ते
होते. सर्वच क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यक्तींनी, विशेषतः विद्यार्थ्यांनी
त्यांच्या वाचनाचा आदर्श समोर ठेवून वाटचाल करायला हवी.
यावेळी डॉ. जे.एफ.
पाटील यांनी ग्रंथाविषयी मनोगत व्यक्त केले. लेखक डॉ. आनंद पाटील यांनीही मनोगत
व्यक्त केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. कुलसचिव
डॉ. विलास नांदवडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तर, अध्यासनाचे संचालक डॉ.
ए.एम. गुरव यांनी आभार मानले. यावेळी डॉ. आण्णासाहेब चव्हाण, डॉ. बी.पी. साबळे
यांच्यासह अनेक शिक्षक, अधिकारी, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment