Wednesday 15 March 2017

परदेशी लाभार्थी विद्यार्थ्यांनी भारतीय उच्चशिक्षणाचे ब्रँड ॲम्बेसॅडर बनावे: महंमद अली ओस्मान



नवी दिल्ली येथील केनिया हाय कमिशनचे एज्युकेशन कौन्सिलर महंमद अली ओस्मान यांचे स्वागत करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.



उपस्थितांशी अनौपचारिक संवाद साधताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

प्रमुख पाहुण्यांसमवेत परिषदेस उपस्थित परदेशी विद्यार्थी.

कोल्हापूर, दि. १५ मार्च: शिवाजी विद्यापीठात शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनी आपल्या देशात परतल्यानंतर या विद्यापीठाचे व भारतीय उच्चशिक्षणाचे ब्रँड ॲम्बेसॅडर बनावे, अशी अपेक्षा नवी दिल्ली येथील केनिया हाय कमिशनचे एज्युकेशन कौन्सिलर महंमद अली ओस्मान यांनी व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाच्या इंटरनॅशनल अफेअर्स कक्षातर्फे गेल्या १० व ११ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषद घेण्यात आली. या परिषदेत शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विविध देशांमधील ५४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या परिषदेस संबोधित करताना श्री. ओस्मान बोलत होते. या वेळी परिषदेचे उद्घाटक म्हणून कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे उपस्थित होते.
ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठात शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या इतकी असेल, याची कल्पना नव्हती. या परिसरातील शिक्षणाची परंपरा आणि आस्था पाहून मी भारावून गेलो आहे. शिवाजी विद्यापीठासह एकूणच भारतीय उच्चशिक्षण परंपरेबद्दल माझ्या मनात आदराचे स्थान निर्माण झाले आहे. परदेशी विद्यार्थ्यांना, विशेषतः केनियासारख्या देशांतल्या विद्यार्थ्यांना परवडणारे शिक्षण या ठिकाणी दिले जाते आहे. याचा लाभ घेऊन मायदेशी परतल्यानंतर तेथील भावी विद्यार्थ्यांनाही त्यांनी योग्य मार्गदर्शन करावे आणि भारतात उच्चशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. या दोन देशांदरम्यान संवादाचा पूल विद्यार्थ्यांनी उभा करावा. त्याचप्रमाणे भारतात शिक्षण घेत असताना आपल्या देशाचा लौकिकही येथे वृद्धिंगत करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय समन्वयन कक्षातर्फे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची परिषद आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, हे सारे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शिवाजी विद्यापीठाचे ब्रँड ॲम्बेसॅडर आहेत, ही बाब खरी आहेच. पण, त्याचबरोबर स्थानिक पालक या नात्याने त्यांच्याशी सुसंवादाचा पूल प्रस्थापित करणे आणि त्यांच्या समस्या, प्रश्न समजून घेऊन त्या सोडविण्यास प्राधान्य देणे, ही बाब अशा परिषदांतून शक्य होते. विद्यार्थ्यांनीही विद्यापीठाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन उपस्थिती दर्शविल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.
परिषदेत पहिल्या दिवशी चार विविध सत्रांत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, चर्चा व अनुभव कथन आदी कार्यक्रम घेण्यात आले. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध ठिकाणांना अभ्यास भेटी आयोजित करण्यात आल्या. परिषदेत केनिया, झांबिया, बुरुंडी, तांझानिया, युगांडा, दक्षिण सुदान, सोमालीया आणि सुदान या देशांतील विद्यार्थी सहभागी झाले.

No comments:

Post a Comment