![]() |
Prof. Dr. D.N. Dhanagare |
![]() |
Dr. Krishna Kirwale |
कोल्हापूर, दि. ८
मार्च: शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. द.ना. धनागरे यांच्या निधनामुळे आंतरराष्ट्रीय
ख्यातीचा विद्वान समाजशास्त्रज्ञ हरपला, अशा शोकभावना आज शिवाजी विद्यापीठात
झालेल्या शोकसभेत मान्यवरांनी व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे डॉ. कृष्णा किरवले
यांच्या निधनामुळे मराठी दलित साहित्याचा एक साक्षेपी संशोधक व निष्ठावान आंबेडकरी
विचारवंत हरपला, अशा शब्दांत आदरांजली वाहण्यात आली.
डॉ. धनागरे आणि
ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांच्या निधनाबद्दल विद्यापीठात आज सकाळी कुलगुरू
डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
कुलगुरू डॉ. शिंदे
म्हणाले, डॉ. धनागरे यांच्या रुपाने शिवाजी विद्यापीठास आंतरराष्ट्रीय ख्यातीचा
थोर समाजशास्त्रज्ञ कुलगुरू म्हणून लाभला. समाजशास्त्राबरोबरच लोकप्रशासन आणि
शेतकरी चळवळ या विषयांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. कुलगुरू म्हणून
विद्यापीठाच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
डॉ. किरवले यांच्यात
आणि आपल्यात अनेक साम्यस्थळे असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, आम्ही
दोघेही मराठवाड्याचे, दोघेही औरंगाबाद विद्यापीठात शिकलो आणि डॉ. गंगाधर पानतावणे
आणि डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे आम्हाला जोडणारे दुवा होते. डॉ. किरवले यांनी डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंती विद्यापीठ स्तरावर साजरी करण्याचा कार्यक्रम
ठरवून तो यशस्वीपणे पार पाडण्यात मोलाची भूमिका बजावल्याचे गौरवोद्गार त्यांनी या
प्रसंगी काढले.
यावेळी
वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. दीक्षित म्हणाले, भाषा भवन तलाव, जैवतंत्रज्ञान
विभाग या बाबींचे खरे शिल्पकार डॉ. धनागरे होते. विद्यार्थी हिताच्या दृष्टीने
विद्यार्थी वसतिगृह मेस सुरू करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तुकाराम
पालखीचे विद्यापीठ कार्यक्षेत्रात स्वागत करण्याचा परिपाठही त्यांनीच सुरू
केल्याचे दीक्षित यांनी सांगितले.
डॉ. डी.टी. शिर्के
यांनीही धनागरे सरांनी एखाद्या फोल्डरवर सुस्पष्ट शेरे कसे असावेत, याचा वस्तुपाठ
घालून दिल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे डॉ. किरवले यांनी नेहमी विद्यार्थी हिताला
सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. श्रीमती.
यु.ए. अरविंदेकर, शंकरराव कुलकर्णी, डॉ. निशा मुडे-पवार, वसंतराव मगदूम, डॉ. रणधीर
शिंदे, डॉ. एस.आर. यादव आदींनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे
यांनी शोकप्रस्ताव मांडला. यावेळी परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व
लेखाधिकारी अजित चौगुले यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवक तसेच
विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment