Friday, 21 July 2017

खेळांत करिअर करण्याचा गांभीर्याने विचार करा

आंतरराष्ट्रीय नेमबाज राधिका बराले यांचे उदयोन्मुख क्रीडापटूंना आवाहन


शिवाजी विद्यापीठाचा सन २०१५-१६चा वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी वि.स. खांडेकर भाषा भवनमध्ये पार पडला. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, आंतरराष्ट्रीय नेमबाज राधिका बराले, डॉ. अविनाश असनारे व डॉ. पी.टी. गायकवाड यांच्यासमवेत पुरस्कारप्राप्त विद्यार्थी, प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक.
सन २०१५-१६साठीचे क्रीडा विभागातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय ठरलेल्या कोल्हापूरच्या दि न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन.व्ही. नलवडे यांनी राधिका बराले, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर ट्रॉफी स्वीकारली.


शिवाजी विद्यापीठाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात


राधिका बराले
कोल्हापूर, दि. २१ जुलै: आपले क्रीडाकौशल्य केवळ महाविद्यालयीन जीवनापुरते मर्यादित न राखता खेळांतच करिअर करण्याबाबत गांभिर्याने विचार करा, असे आवाहन कोल्हापूरच्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय नेमबाज राधिका रोहित हवलदार (बराले) यांनी आज येथे उदयोन्मुख क्रीडापटूंना केले.
शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सन २०१५-१६मध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा गुणगौरव समारंभ व संलग्नित महाविद्यालयांतील शारीरिक शिक्षण संचालकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा अशा संयुक्त समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अविनाश असनारे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी सन २०१५-१६मध्ये सर्वाधिक ५१४ गुणांसह अव्वल स्थान पटकावणाऱ्या कोल्हापूरच्या दि न्यू कॉलेजला सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी राधिका बराले म्हणाल्या, खेळांबद्दल अनास्थेचा काळ आता मागे पडला असून शासन क्रीडापटूंना अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहे. विविध स्पर्धांत उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासनाच्या विविध सेवांमध्ये सामावूनही घेतले जात आहे. त्यामुळे चांगल्या खेळाडूंना खेळाच्या माध्यमातूनही आपले अतिशय चांगले करिअर घडविता येऊ शकते. याची जाणीव ठेवून खेळाडूंनी मेहनतीने चांगले यश मिळविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राधिका यांनी शिवाजी विद्यापीठात नेमबाजीचे प्रशिक्षण व सराव यासाठी दर्जेदार शूटिंग रेंज उभारण्याबाबत विचार व्हावा, अशी विनंती कुलगुरूंना या प्रसंगी केली.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
यावेळी अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी चांगला खेळाडू होण्यासाठी क्रीडासंस्कार व क्रीडा संस्कृती या दोन मूल्यांचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, खिलाडूवृत्ती जोपासणे हा शब्दप्रयोगच मुळी खेळाडूंनी साहित्याला प्रदान केला आहे, इतके त्यांचे महत्त्व आहे. पदक मिळाले नाही, तरी खेळाशी प्रतारणा न करणारा तो सच्चा खेळाडू होय. यश मिळविणे ही सोपी बाब आहे, मात्र यश पचविणे हे अधिक कसोटी पाहणारे असते. यश हे सावलीसारखे असते. त्याच्यामागे धावले तर ते कदापि गवसणार नाही. मात्र, प्रयत्न आणि कष्टाच्या प्रकाशाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली तर यश आपल्या मागे येत राहील. नकारात्मक विचारांवर मात करीत इतरांशी स्पर्धा न करता स्वतःशीच गुणात्मक व दर्जात्मक स्पर्धा केल्यास यश निश्चित मिळते.
यावेळी राधिका बराले यांनी शूटिंग रेंज उभारण्यासंदर्भात केलेल्या सूचनेचा विद्यापीठ प्रशासन जरुर विचार करेल. त्यासंदर्भातील आवश्यक बाबींची पडताळणी करून डॉ. गायकवाड यांनी प्रस्ताव सादर कारावा, अशी सूचनाही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी केली.
यावेळी डॉ. अविनाश असनारे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या जिगरबाज खेळाडूंची मुक्तकंठाने प्रशंसा केली. त्यांचे मार्गदर्शक, प्रशिक्षक व व्यवस्थापक यांचीही त्यांनी स्तुती केली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध सांघिक व वैयक्तिक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात सन २०१५-१६मधील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या खेळाडूंचा ब्लेझर, शिष्यवृत्ती व स्मृतिचिन्ह देऊन तर संघ व्यवस्थापक, क्रीडा प्रशिक्षक यांचा ब्लेझर व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जे.एच. इंगळे यांनी खेळाडूंना शपथ दिली. क्रीडा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. पी.टी. गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शशिकांत दाभाडे यांनी आभार मानले.

Tuesday, 18 July 2017

या बदलाचे स्वागत करू या!

शिवाजी विद्यापीठाच्या जीएसटी व आपण खुल्या चर्चासत्रातील सूर



कोल्हापूर, दि. १८ जुलै: वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीची अंमलबजावणी ही क्रांतीकारक घटना असून त्यामुळे देशात मोठा सामाजिक-आर्थिक बदल होणार आहे. हा बदल देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशादर्शक ठरेल, असा विश्वास वाटत असल्याने या बदलाचे स्वागत करू या, असा सूर शिवाजी विद्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जीएसटी व आपण या खुल्या चर्चासत्रात उमटला.
शिवाजी विद्यापीठाचे बँक ऑफ इंडिया अध्यासन, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने काल सायंकाळी दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात हे चर्चासत्र झाले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चासत्रात कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे.एफ. पाटील यांच्यासह केंद्रीय जीएसटी विभागाचे उपायुक्त अश्विनकुमार हुके, केसीसीचे अध्यक्ष ललित गांधी, ज्येष्ठ उद्योजक सुरेंद्र जैन, केआयएचे मनीष झंवर आदींनी सहभाग घेतला. सर्वसामान्य नागरिक अर्थात ग्राहकांवर जीएसटीचा नेमका काय व कसा परिणाम होईल, याबाबत माहिती देण्यासह नागरिकांचे शंकासमाधान करण्याच्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाने या चर्चासत्राचे आयोजन केले.
यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी जीएसटी लागू करण्याचा निर्णय क्रांतिकारी असून भविष्यात निश्चितच भारत महासत्ता होईल, असा विश्वास व्यक्त केला. कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ''एक देश, एक कर'', असे जीएसटीचे वैशिष्ट्य आहे. १९९१ला मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यानंतर आता लागू झालेला जीएसटी हे क्रांतिकारी पाऊल आहे. समाजाशी संवाद साधणे आणि जाणीवजागृती करणे ही विद्यापीठांची जबाबदारी आहे. जीएसटी ही नवीन करप्रणाली आहे, ती समजून घेणे अवघड असले तरी हळूहळू या नवीन कायद्याची सवय होणार आहे. जुने कायदे समजायला अवघड असायचे; पण हळूहळू ते समजू लागले आहेत. 'जीएसटी' बाबतही असणारे गैरसमज दूर होण्यास मदत होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी जीएसटीला गुड अँड सिंपल टॅक्स म्हटले आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, जे अर्थमंत्री होते, त्यांनी लोकशाही बळकट करणारा हा निर्णय असल्याचे सांगितले आहे. देशात एखाद्या वस्तूची किंमत एकच असणार आहे. या राज्यात ही वस्तू स्वस्त मिळते, असे आता राहणार नाही. त्यामुळे उत्पादन आणि विक्री तसेच उपयोगिता यामध्ये सुसूत्रता राखण्याची खरी जबाबदारी पेलणाऱ्या गृहिणी वर्गाला याबाबतीत विश्वासात घेऊन त्यांच्यासाठीही असा कार्यक्रम राबविण्याची गरज आहे.
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. जे. एफ. पाटील म्हणाले, 'संघराज्यीय व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांना करांचे अधिकार विभागून दिले होते. त्यानुसार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांची रचना केली जात होती. १२२व्या घटना दुरूस्तीनंतर १९९४मध्ये सर्व्हिस टॅक्स प्रथम तीन वस्तूंवर अकारण्यात आला. नंतर तीन सेवांवर लागलेला हा कर शंभर वस्तूंवर लागला गेला. जीएसटी हा केंद्र आणि राज्य सरकार अशा दोघांनीही वसूल करायचा आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत करांची फार मोठी गर्दी झाली होती. केंद्राचे आठ आणि राज्याचे नऊ असे सतरा कर कमी होणार आहेत. कर कमी होणार असले तरी ग्राहकाला कर हे भरावे लागणारच आहेत. 'जीएसटी' मुळे वेळ, श्रमाची बचत होणार असून देशाच्या उत्पन्नवाढीला मदत होणार आहे.
केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे सहायक आयुक्त अश्विनकुमार हुके म्हणाले, 'एक देश एक कर' या संकल्पनेने जीएसटी अंमलात आला आहे. वीस लाखांपर्यंतच्या उलाढालीसाठी जीएसटीला नोंदणीची गरज नाही. तीन महिन्यातून एकदाच रिटर्न भरावे लागतील. कर व्यवस्था सोपी आणि या क्षेत्रातील सर्वच घटकांचे हित जोपासणारी आहे. प्रामाणिकपणे कर भरला तर त्याचे क्रेडिटही मिळू शकते. कर कुणी भरायचा आणि कुणाला भरण्याची गरज नाही, हे स्पष्ट आहे. काही लोक प्रश्न विचारतात की, देशात एकच कर असेल तर आयकर आणि प्रोफेशनल टॅक्स का भरायचा? हा प्रश्न म्हणून ठिक आहे; मात्र जीएसटी आणि हे दोन्ही कर परस्पर भिन्न आहेत. जीएसटी हा अप्रत्यक्ष कर आहे. यापूर्वी अप्रत्यक्ष कर म्हणून जे भरावे लागत होते त्याऐवजी हा कर आला आहे. पण याच्या चांगल्या गोष्टींपेक्षा गुंतागुंतीवर जास्त चर्चा होत आहे. जीएसटीची अंमलबजावणी झाल्यापासून वस्तूंचे दर कमी झाले आहेत. मात्र ते ग्राहकांपर्यंत पोहोचलेले नाही. त्यामुळे जुन्याच वस्तूंवर कर आकरणी करून नफा कमवला जात आहे. कोल्हापूर विभागात असे प्रकार घडत असल्यास त्याची तक्रार करा. कारवाई केली जाईल.
चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, व्यापाऱ्यांनी त्रास करून न घेता करप्रणाली समजून घेण्याचा प्रयत्न करावा. कर प्रणाली तंत्रज्ञानावर आधारित आहे. व्यापारी, उद्योजक आणि कारखानदार म्हणजे कर वसुलीचा घटक आहे, असे न समजता आमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा. यातील त्रुटी सरकारपर्यंत पोचविण्यासाठी चेंबर प्रयत्न करेल.
उद्योजक सुरेंद्र जैन यांनी 'जीएसटी'मुळे देशाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. ई पे-बिल ही नवीन करप्रणाली येणार आहे. जीएसटीमुळे करप्रणालीत सॉफ्टवेअरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. कर चुकवेगिरीला आळा व उद्योगवाढीला चालन देणारा हा कर आहे.
कुलसचिव नांदवडेकर यांनी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी जीएसटी संधी असून आवश्यकता भासल्यास महाविद्यालयीन स्तरावर विद्यापीठातर्फे प्रशिक्षण शिबिर घेण्यात येतील, असे सांगितले.
वाणिज्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.ए.एम. गुरव यांनी स्वागत केले. बँक ऑफ इंडिया अध्यासनाचे समन्वयक डॉ. विजय ककडे यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. एम.एस. देशमुख यांनी आभार मानले.

Wednesday, 5 July 2017

माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्यानेच ‘झिरो पेन्डन्सी’ शक्य: डॉ. अजय साळी


डॉ. अजय साळी यांचे स्वागत करताना डॉ. आर.आर. मुधोळकर. मध्यभागी डॉ. आर.के. कामत.


विद्यापीठात पाच दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे उद्घाटन

डॉ. अजय साळी
कोल्हापूर, दि. ५ जुलै: माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्यानेच प्रशासकीय कारभारात झिरो पेन्डन्सीचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी यांनी काल येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचा संगणकशास्त्र अधिविभाग आणि गुगल-इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

डॉ. साळी म्हणाले, प्रशासकीय कारभार गतिमान व पारदर्शी होण्याच्या दृष्टीने माहिती तंत्रज्ञान प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरत आहे. मोबाईल अॅप्लीकेशन्स, संकेतस्थळे व ब्लॉगसारख्या माध्यमातून शिक्षण क्षेत्राच्या समस्या सोडविण्यास यश प्राप्त झाले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणून उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या उत्तम सेवा या संकेतस्थळाकडे पाहता येईल. या संकेतस्थळामुळे विभागाला झिरो पेन्डन्सीचे उद्दिष्ट साध्य करता आले.
विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे (आय.क्यू.ए.सी.) प्रमुख व इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागप्रमुख डॉ. आर. के. कामत यांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या सोडविता येणे शक्य असल्याचे सांगितले. तसेच, तंत्रज्ञानाचा रचनात्मक व विधायक कार्यासाठी वापर करण्याची गरज असल्याचेही सांगितले.


यावेळी संगणकशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. आर. आर. मुधोळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. गुगल प्रायोजित ''एन्ड्रॉइड फंडामेन्टल डेव्हलपमेंट'' या उपक्रमाची संकल्पना व महत्त्व स्पष्ट केले.
या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅममध्ये विद्यापीठाच्या विविध अधिविभागांतील व संलग्नित महाविद्यालयांतील 70 शिक्षक सहभागी झाले आहेत. त्यांना गुगलतर्फे ललीत सिंग, श्रेयांश खन्ना व सिम्मी आनंद प्रशिक्षण देत आहेत.
कबीर खराडे यांनी परिचय करून दिला. प्रोग्रॅम समन्वयक डॉ. के. एस. ओझा यांनी आभार मानले. यावेळी डॉ. यु. आर. पोळ, डॉ. व्ही. एस्. कुंभार, प्रसाद गोयल, परशुराम वडार आदी उपस्थित होते.