Thursday, 14 September 2017

बालहक्कांविषयी जागृतीसाठी माध्यम प्रतिनिधींचे योगदान महत्त्वाचे: डॉ. विलास नांदवडेकर



विद्यापीठात युनिसेफच्या सहकार्याने पत्रकारांसाठी कार्यशाळा

कोल्हापूर, दि. १४ सप्टेंबर: बालहक्कांच्या संदर्भात जागृतीसाठी प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी कृतीशील योगदान देणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण पत्रकारांसाठी आयोजित बालहक्कविषयक जागृतीपर एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. नांदवडेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या मानव्यविद्या सभागृहात ही कार्यशाळा झाली.
डॉ. नांदवडेकर म्हणाले, बालहक्कांचा विषय माध्यमांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी योग्य पद्धतीने मांडल्यास हजारो हात मदतीसाठी पुढे सरसावतील. आज आपल्या देशातील साधारण निम्म्या बालकांना पुरेसा आहार मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या बालकांचे योग्य संगोपन होऊन त्यांना देशाच्या विकासातील भागीदार बनवायचे असेल तर बाल आरोग्याचा प्रश्न प्राधान्याने हाताळायला हवा. आरोग्य चांगले राहण्यासाठी उत्तम आहार आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्तम शिक्षण सुविधांची उपलब्धता करून देणे हे आपल्यापुढील प्राधान्यक्रमाचे मुद्दे असायला हवेत. अन्न आणि शिक्षणाच्या बरोबरीनेच बालमजुरीला प्रतिबंध करण्यासाठी पत्रकारांबरोबरच प्रत्येक समाजघटकाने कृतीशील पुढाकार घ्यायला हवा. असे बालमजूर आढळल्यास त्यांच्याशी संवाद साधून, योग्य मार्गदर्शन करून त्यांना शाळेत जायला प्रवृत्त करायला हवे. केंद्र सरकारने त्यांना प्रदान केलेल्या शिक्षणाच्या अधिकारांतर्गत मोफत शिक्षण आणि माध्यान्ह पोषण आहार याविषयीची माहिती देऊन शिक्षणाच्या प्रवाहात त्यांना सामील होण्यास प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी मध्य आफ्रिकेतील रवांडा या देशाला भेट दिली होती. तेथील बालकांची विदारक परिस्थिती त्यांनी यावेळी सभागृहासमोर मांडली. ते म्हणाले, सकाळ-संध्याकाळ पाऊस होणाऱ्या या देशातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. एका कुटुंबात किमान दहा मुले असतात. साहजिकच त्यांच्या दारिद्र्यपूर्ण परिस्थितीत त्यामुळे भरच पडते. मुलांच्या अंगावर धड कपडेही नसायची, तर कित्येक मुले अक्षरशः रस्त्यावरील माती खाताना नजरेस पडायची. या पार्श्वभूमीवर तेथे बालहक्कांचे काम सुरू होते. मुलांच्या मूलभूत अन्न, वस्त्राच्या गरजा भागवून त्यांना शिक्षण आणि आरोग्य सुविधांची उपलब्धता करणे हे प्रत्येक शासनाचे आद्य कर्तव्य आहे. तथापि, सन २०१०च्या एका आकडेवारीनुसार, आपल्या देशात एका मुलामागे आपण दैनंदिन ४.४४ रुपये खर्च करतो, तर विकसित देशांत हा आकडा त्याहून चौपट आहे. विकसित आणि विकसनशील देशांमधील ही मोठी दरी सांधण्यासाठी सर्व घटकांनी आपापल्या परीने योगदान देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी अधिविभाग प्रमुख डॉ. निशा मुडे-पवार यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला. चंद्रशेखर वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी युनिसेफ (महाराष्ट्र)चे संवाद सल्लागार तानाजी पाटील, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. सुमेधा साळुंखे यांच्यासह जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, दिवसभरात कार्यशाळेत सी.डब्ल्यूसी (कोल्हापूर)चे अतुल देसाई, युनिसेफचे तानाजी पाटील आणि कोल्हापूरच्या शहाजी विधी महाविद्यालयाचे डॉ. प्रवीण पाटील यांनी बालहक्कांच्या विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकला.


No comments:

Post a Comment