कोल्हापूर, दि. ६ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठातील
विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांना वाय-फाय सुविधा उपलब्ध होण्याच्या
दृष्टीने शिवाजी विद्यापीठाने रिलायन्स जिओशी नुकताच सामंजस्य करार केला.
कुलगुरू डॉ. देवानंद
शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत गेल्या शुक्रवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद
सभागृहात झालेल्या या करार प्रसंगी प्रा-कुलगुरू डॉ. डी. टी.
शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्रभारी
वित्त व लेखाधिकारी अजित
चौगुले व इंटरनेट विभाग समन्वयक डॉ. मिलिंद जोशी उपस्थित होते. रिलायन्स
जिओतर्फे श्री. बालसुब्रमण्यम अय्यर व किशोर पाटील
उपस्थित होते. सामंजस्य करारावर विद्यापीठातर्फे कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी तर
रिलायन्सतर्फे श्री. अय्यर यांनी स्वाक्षरी केल्या.
या सामंजस्य करारानुसार रिलायन्स जिओतर्फे विद्यापीठाच्या प्रांगणात वाय-फाय सुविधा माफक दरात
उपलब्ध होणार आहे. उपकरणे व देखभालीचा खर्च रिलायन्स जिओ करणार आहे.
विद्यापीठ वर्धापन दिनादिवशी ही सेवा सुरु करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण
करण्यात येत आहे. सध्या विद्यापीठाशी संलग्नित १६२
महाविद्यालयांत रिलायन्स जिओतर्फे वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
त्यामुळे ही सर्व महाविद्यालये विद्यापीठास जोडली जातील. विद्यापीठासह महाविद्यालयांत होणाऱ्या विविध कार्यक्रमांचे
प्रक्षेपण जिओ सेवेद्वारे करता येणे शक्य
होणार आहे. तसेच, जिओ चॅट सेवेद्वारे दृश्य (व्हिडिओ) संपर्क साधणे सुलभ होणार
आहे.
No comments:
Post a Comment