कोल्हापूर, दि. ८ सप्टेंबर: वंचित समुहांचा सर्वंकष अभ्यास करणे हे समाजशास्त्राच्या अभ्यासकाचे ध्येय असले पाहिजे, असे प्रतिपादन तमिळनाडू येथील गांधीग्राम ग्रामीण विद्यापीठाचे प्रा. डॉ. एस. गुरसामी यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागामध्ये यु.जी.सी. सॅप- फेज थ्री अंतर्गत आयोजित विशेष व्याख्यानात ते काल येथे बोलत होते. समाजशास्त्र अधिविभागाचे विभागप्रमुख व सॅपचे समन्वयक प्रा. डॉ. जगन कराडे अध्यक्षस्थानी होते.
डॉ. गुरसामी म्हणाले, भारतीय समाज व्यवस्थेला जाती व्यवस्थेबरोबर वर्ग व्यवस्थेने सुद्धा ग्रासलेले आहे. स्वातंत्रप्राप्तीच्या ७० वर्षानंतरही कोईमतूर, मीनाक्षीपुरम येथील जातीय-भेदभावाच्या घटना त्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे उच्चवर्गीय व कनिष्ठवर्गीय यांच्यातील दरी दिवसेंदिवस रुंदावत चाललेली आहे. भारतीय समाजाची मानसिकता हा वंचित समुहांच्या सशक्तीकरणातील सर्वात मोठा अडथळा आहे. या अडथळ्यांवर मात करण्यासाठी सर्वसमावेशक धोरणाची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये केलेली असली तरी, अपेक्षित ध्येय अद्याप गाठलेले नाही. आता वंचितांची प्रगती करणे ही सर्व शिक्षितांची व शासनाची जबाबदारी आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
डॉ. जगन कराडे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, भारतातील एकूणच वंचित समुहांची स्थिती सर्व राज्यांमध्ये जवळपास सारखीच असल्याचे दिसून येते. म्हणून वंचित समुहांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासकीय धोरणांची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे अत्यंत गरजेचे आहे.
सॅपच्या उपसमन्वयक डॉ. प्रतिमा पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. प्रतिभा देसाई यांनी आभार मानले. यावेळी प्रा. डॉ. आर. बी. पाटील, संशोधक विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment