|
शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत बोलताना शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटचे ईशान चौधरी. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. सागर डेळेकर, प्रशांत गायकवाड, उदय गायकवाड व डॉ. पी.डी. राऊत. |
|
शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत उपस्थितांचे शंकासमाधान करताना मान्यवर. |
कोल्हापूर, दि. ८ ऑगस्ट: संपूर्ण जग आज विविध
पर्यावरणीय प्रश्नांना सामोरे जात आहे. वायू प्रदूषण हा सध्या अत्यंत कळीचा मुद्दा
बनला आहे. वाढते औद्योगिकीकरण, वाहतूक आणि इतर कारणांमुळे होणारे इंधनाचे ज्वलन हे
वायू प्रदूषण वाढविणारे महत्वाचे घटक आहेत. यामुळे होणाऱ्या वायू प्रदूषकांच्या उत्सर्जनाची
माहिती सामान्य नागरिकाला व्हावी, या दृष्टीने शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी
पॉलिसी या संस्थेने महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मदतीने “स्टार
रेटिंग प्रोग्राम” ही वायू प्रदूषण मूल्यमापन प्रणाली उपयोगात आणली आहे. ही
प्रणाली सर्वसामान्यांना माहितीच्या दृष्टीने उपयुक्त आणि आवश्यक आहे, असा सूर आज
शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत उमटला.
स्टार रेटिंग प्रणालीची माहिती करून
देण्याच्या उद्दिष्टाने शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरणशास्त्र विभाग, विद्यापीठ व
उद्योग संवाद केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि शिकागो विद्यापीठाची
एनर्जी पॉलिसी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज कार्यशाळा आयोजित करण्यात आली
होती.
स्टार रेटींग प्रोग्रॅमची माहिती देताना ईशान
चौधरी म्हणाले, उद्योगांमधून किती वायू प्रदूषण होते, ते सर्वसामान्यांना सहज
सोप्या पद्धतीने कळावे, हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. या प्रकल्पाचा मूळ
उद्देश्य लोकसहभागच आहे. आज याच्याशी महाराष्ट्रातील २६० उद्योग जोडलेले आहेत. या
उद्योगांतून बाहेर पडणाऱ्या कण स्वरूपातील प्रदूषकांची माहिती mpcb.info या वेबसाईटवर
दिसणार आहे. जो उद्योग अधिक प्रदूषण करतो त्याला एक स्टार आणि जो त्याहून कमी
प्रदूषण करतो, त्याला त्या प्रमाणात पाचपर्यंत स्टार या पद्धतीने कणस्वरूपातील
प्रदूषकांच्या प्रमाणावर रेटींग ठरणार आहे. एखाद्या उद्योगातून प्रदूषण होत असल्याची
तक्रार येईल, त्या उद्योगाशी थेट संवाद साधण्यासाठीही या उपक्रमाचा व्यासपीठ
म्हणून उपयोग होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.
पर्यावरणशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. पी.डी.
राऊत यांनी पर्यावरणशास्त्र विभाग हा सर्व पर्यावरणविषयक घटकांचे मूल्यमापन
करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे व सोयींनी सुसज्ज असल्याचे यावेळी सांगितले. ते
म्हणाले, पर्यावरणशास्त्र विभागात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत
राष्ट्रीय परिवेश वायू गुणवत्ता निरीक्षणाचा प्रकल्प २००४ पासून यशस्वीपणे राबवला
जात असून यामध्ये नायट्रोजनचे ऑक्साईड्स, सल्फरचे ऑक्साईड्स, धुलीकण यांचे मोजमाप
केले जाते. कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठ, दाभोलकर कॉर्नर, महाद्वार रोड या तीन
ठिकाणी हवेचे मापन केले जाते. अलिकडील वर्षात काही ठिकाणी हवेची गुणवत्ता ढासळत
असल्याचे दिसत आहे. असे प्रदूषण कमी करण्यासाठी शहराच्या काही भागांत हरित उर्जेचा
वापर, शहरात नो व्हेईकल, नो वे, नो पार्किंग झोन करणे तसेच इंधनातील भेसळ थांबविणे,
फटाके उडविण्यास बंदी करणे असे उपाय आवश्यक आहेत. यासाठी जाणीव जागृती करणे
अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या
कोल्हापूर विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड म्हणाले, उद्योग आणि
प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यामधील माहितीची गॅप या उपक्रमामधून दूर करता येणे
शक्य आहे. वायू प्रदुषणाचा विचार करताना त्या परिसरातील भौगोलिक आणि वातावरणीय
परिस्थितींचा हवा प्रदूषकावर परिणाम होतो हे लक्षात घेतले पाहिजे. तसेच उद्योगांनी
या स्टार रेटींग प्रोग्रॅममध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उदय गायकवाड यांनी कोल्हापूरमधील वायू
प्रदुषणाच्या कारणांचा ऊहापोह केला. ते म्हणाले, कोल्हापूर शहरातील वायू
प्रदुषणाचा विचार करताना रेल्वे, बस आणि इंधनातील भेसळीमुळे होणाऱ्या प्रदूषणाकडे लक्ष
देणे गरजेचे आहे. चौकांमधील सिग्नलला टाईमर नसणे, उद्योगातील इंधनासाठी होणारी
वृक्षतोड यामुळे होणारे वायू प्रदूषण देखील घातक आहे. याबाबत धोरणात्मक निर्णय
होणे गरजेचे आहे.
यावेळी प्रश्नोत्तरांमध्ये वेबसाईटवर
उपलब्ध होणाऱ्या माहितीकडे नागरिकांनी डोळसपणे पहिले पाहिजे, त्याचा उपयोग करून
घेतला पाहिजे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या उद्योग व विद्यापीठ
संवाद केंद्राचे समन्वयक डॉ. सागर डेळेकर यांनी आभार मानले. या कार्यशाळेस डॉ.
आसावरी जाधव, डॉ. निलीशा देसाई, डॉ. पल्लवी भोसले, डॉ.सोनल चोंदे यांच्यासह महाराष्ट्र
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे श्री. कडले, श्री. मोरे, विविध उद्योगांचे प्रतिनिधी, संशोधक
विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.