Friday 10 August 2018

सैध्दांतिक भौतिक विज्ञानामधला हॉकिंग चमत्कार - डॉ.सुभाष देसाई


कोल्हापूर, 10 ऑगस्ट - सैध्दांतिक भौतिक विज्ञानामधला स्टिफन हॉकिंग चमत्कार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक डॉ.सुभाष देसाई यांनी केले.

            शिवाजी विद्यापीठाच्या ' रिसर्च कोलेक्युअम' मार्फत आयोजित जगद्विख्यात शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांच्या ' ब्रिफ हिस्टरी ऑफ टाइम' या पुस्तकाचे डॉ.सुभाष देसाई यांंनी मराठीमध्ये अनुवादीत केलेल्या 'कालाचा संक्षिप्त इतिहास' या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांच्या हस्ते झाले.  त्यावेळी डॉ.देसाई बोलत होते.  विद्यापीठाच्या रसायनशास्त्र सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे होते.

डॉ.सुभाष देसाई पुढे म्हणाले, ज्ञानाला एक नवीन दिशा देणारे पुस्तक आहे. अतिशय सुलभ सोपी मांडणी असून यामध्ये गणितीय मांडणी केलेली नाही. या पुस्तकामध्ये हॉकिंग यांनी निरनिराळया शास्त्रांचा अभ्यास करून मांडणी केलेली आहे.  समाज जीवनावर काळ या विषयाचे वेगवेगळे प्रभाव पडत असतात.  सर्व शास्त्रज्ञांनी नव विश्वाचे चित्र उभे केले यामध्ये स्टिफन हॉकिंग यांचा दर्जा फार मोठा आहे.  ही पृथ्वी ठिसूळ आहे त्यामुळे अणुस्फोट करणे थांबवा, मानवजात जीवंत ठेवायची असेल तर अंतराळामध्ये पृथ्वी सदृश्य ग्रह शोधा, असे हॉकिंग यांनी शास्त्रज्ञांना सांगितले होते. तत्वज्ञान विज्ञान या दोन्ही क्षेत्रांत मन ही संकल्पना खोलवर रूजलेली आहे.  मन हे आभासी तर मेंदू हे वास्तव हे द्वैत पाळणे लोकांना अवघड जाते.  मानसशास्त्र भक्कम वैज्ञानिक पाया अभावी अन्य विज्ञान शास्त्रांइतके वृध्दिंगत झाले नाही. जीवनाच्या विविध अंगावर मानसशास्त्राचा पडलेला प्रभाव नाकारता येत नाही.  विज्ञानाची कास धरल्याखेरीज रूढी परंपरांची जळमटे निघून जाणार नाहीत.  नवतंत्रज्ञानाच्या प्रवाहात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यामध्ये करिअर करावे. तंत्रज्ञानाचा वापर बहुजन हिताय, बहुजन सुखाय असावा.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे म्हणाले, हॉकिंग यांचा ग्रंथ हा वैज्ञानिक खरा, पण तो केवळ विज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनीच वाचावा आणि इतरांनी वर्ज्य करावा, असा नाही.  जगातल्या प्रत्येक नागरिकाने हा ग्रंथ वाचला पाहिजे.  विज्ञानाचा ग्रंथ असला तरी त्याची भाषा, त्यामधील परिभाषा इतकी सुगम, सुबोध आहे की, कोणाही व्यक्तीला त्या सहजपणाने समजतील. मूळ ग्रंथातील ही सुगमता डॉ.देसार्‌इंनीही त्यांच्या ग्रंथामध्ये कौशल्याने उतरविली आहे.
डॉ.एस.डी.डेलेकर प्रास्ताविक केले. डॉ.पी.एम.माने यांनी परिचय करून दिला.  डॉ.पी.बी.माने यांनी आभार मानले.  यावेळी रसायनशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.जी.एस.गोसावी, डॉ.सी.ए.लंगरे यांचेसह विविध विभागातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते.
-----


No comments:

Post a Comment