शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानमालेत बोलताना डॉ. सुभाष देसाई. व्यासपीठावर डॉ. रविंद्र भणगे, डॉ. प्रकाश पवार. |
कोल्हापूर, दि. ३ सप्टेंबर: आजच्या तरुणांपुढे रोबोटिक आव्हाने उभी ठाकली आहेत. त्यामुळे तरूणांनी स्वत:ला केवळ तंत्रज्ञानापुरते सिमीत न करता आपल्या बुद्धीच्या कक्षा वाढविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुभाष देसाई यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचे राज्यशास्त्र अधिविभागात आयोजित दत्ताबाळ स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत 'दत्ताबाळांचे जीवन व कार्य' या विषयावर डॉ. देसाई बोलत होते. अर्थशास्त्र विभागाच्या सेमिनार हॉलमध्ये झालेल्या या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी अधिविभागप्रमुख डॉ.प्रकाश पवार होते.
डॉ. देसाई म्हणाले, जीवनात यशस्वी होण्यासाठी विचारांची पायाभरणी चांगली असली पाहिजे. तरूण पिढीने धर्म आणि विज्ञान यांबाबत तौलनिक चर्चा केली पाहिजे. त्याचा त्यांना निश्चितच लाभ होईल. बॅ. बाळासाहेब खर्डेकर आणि प्राचार्य एम.आर. देसाई यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात जवळ-जवळ पाचशे प्राथमिक शाळा काढल्या. प्राचार्य एम.आर. देसाई यांचे दत्ताबाळ हे द्वितीय चिरंजीव होते. शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव प्राचार्य देसाई यांच्यावर होता. तेच संस्कार दत्ताबाळांवर होते. सामाजिक चळवळींचा वसा त्यांनी त्यांच्यापासून घेतला. त्यानुसार वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांत ते सहभागी होत. निसर्गात, माणसांत ईश्वर पाहण्यास शिका, ही दत्ताबाळांची शिकवण होती.
डॉ. प्रकाश पवार अध्यक्षीय भाषणात म्हणाले, भारतात दोनशे वर्षांपूर्वी १८१८ साली मध्यमवर्गीयांमध्ये आधुनिकता उदयास येण्यास सुरूवात होत होती. त्यावेळेस, मी कोण आहे, असा प्रश्न भारतीयांनी स्वत:ला विचारण्यास सुरूवात केली. त्या पद्धतीने आपण कोणत्याही टोकाला, निष्कर्षाला न जाता नेमकेपणाने दत्ताबाळ यांच्याबद्दल विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ.रविंद्र भणगे यांनी प्रास्ताविक केले, तर सचिन चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment