१४व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत विभागीय स्तरावर अव्वल कामगिरी बजावल्याबद्दल नवी दिल्ली येथे संसद भवनातील बालयोगी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाच्या संघास ट्रॉफी प्रदान करून गौरविण्यात आले. ट्रॉफी स्वीकारताना समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांच्यासह शिवाजी विद्यापीठाचा संघ.
१४व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेतील विभागीय स्तरावरील विजेतेपदाची ट्रॉफी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना प्रदान करताना डॉ. प्रल्हाद माने व बेस्ट परफॉर्मन्स पुरस्कार विजेते विद्यार्थी. |
कोल्हापूर, दि. २६ सप्टेंबर: राष्ट्रीय युवा
संसद स्पर्धेत यंदा प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त करून संघातील
विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाचा लौकिक उंचावला, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी काल येथे काढले. राष्ट्रीय पुरस्कार वितरण
समारंभात प्रदान करण्यात आलेल्या ट्रॉफीसह संघाने कुलगुरू डॉ. शिंदे यांची भेट
घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी संघाचे समन्वयक डॉ. प्रल्हाद माने
यांच्यासह सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे स्पर्धेतील एकूण चमकदार कामगिरीबद्दल कौतुक
व अभिनंदन केले. या यशाचा विद्यार्थ्यांना भावी जीवनात निश्चितपणे सकारात्मक लाभ
होईल. सार्वजनिक जीवनात वावरतानाही देशाचा लौकिक वाढेल, असे योगदान त्यांनी
द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
उपस्थित होते.
१४व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत यंदा शिवाजी
विद्यापीठाच्या संघाने दमदार कामगिरीच्या जोरावर प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत
झेप घेतली. या संघाला विभागीय स्तरावर अव्वल दर्जाची कामगिरी बजावल्याबद्दल आणि या
संघातील उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या आठ विद्यार्थ्यांना ‘बेस्ट परफॉर्मन्स प्राईझ विनर’ पुरस्कार जाहीर झाला होता. या १४व्या राष्ट्रीय युवा संसद
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच नवी दिल्ली येथील भारतीय संसद भवनाच्या
बालयोगी सभागृहात पार पडला. संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या
हस्ते हा पारितोषिक वितरण समारंभ झाला. या स्पर्धेत देशभरातून एकूण ७४ संघ सहभागी
झाले. शिवाजी विद्यापीठाच्या संघाने पश्चिम विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावून
राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत झेप घेतली होती. यावेळी विभागीय सांघिक पारितोषिकासह
संघातील निकिता पिसे, अभिजीत ताम्हणकर, शैलेश चिले, श्रेयश मोहिते, विनायक साळुंखे, गौरी काटे, हेरंब सावंत व आकांक्षा पाटील या आठ विद्यार्थ्यांना बेस्ट
परफॉर्मन्स पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. या विद्यार्थ्यांना कुलगुरू डॉ.
शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांचे
मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment