Monday, 30 December 2019

डॉ. आप्पासाहेब पवार यांच्यामुळे तळागाळातील विद्यार्थी उच्चशिक्षणाच्या प्रवाहात: प्रा. किसनराव कुराडे यांचे प्रतिपादन

शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासह अन्य मान्यवर.


प्रा. किसनराव कुराडे यांचे स्वागत करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत (डावीकडून) डॉ. सी.टी. पवार, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. एस.जे. नाईक, प्रा. टी.के. सरगर.


कोल्हापूर, दि. ३० डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्यामुळेच तळागाळातील, बहुजन समाजातील मुलांना उच्चशिक्षणाच्या प्रवाहात स्थान लाभले, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे यांनी आज येथे काढले.
शिवाजी विद्यापीठाचे डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवन योजना आणि डॉ. आप्पासाहेब पवार कमवा व शिका प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पवार यांचा ३८वा स्मृतिदिन व विद्यार्थी भवनच्या सुवर्ममहोत्सवाचा उद्घाटन समारंभ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. किसनराव कुराडे बोलत होते. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर होते.
प्रा. कुराडे म्हणाले, यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई हे आप्पासाहेबांचे विद्यार्थी. कोल्हापुरात उच्चशिक्षणाची गंगा प्रवाहित करण्यासाठी त्यांनी आपल्या या विद्यार्थ्यांचे सहाय्य तर घेतलेच; शिवाय, ज्या पद्धतीने अथक वैयक्तिक योगदान देऊन या परिसराच्या भौतिक आणि शैक्षणिक विकास व विस्ताराची पायाभरणी केली, त्याला तोड नाही. आप्पासाहेबांनी बजावलेल्या पितामह स्वरुपाच्या कामगिरीमुळेच शिवाजी विद्यापीठ आज लौकिक पावले आहे.
प्रा. किसनराव कुराडे
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी भवनच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी असलेल्या प्रा. कुराडे यांनी डॉ. पवार यांच्या अनेक आठवणी या प्रसंगी सांगितल्या. ते म्हणाले, आम्ही भवनचे विद्यार्थी विद्यापीठ परिसरातील शेतीत श्रमदान करीत असताना कंजारभाट समाजातील काही लोक दारुचे फुगे घेऊन या परिसरातून जात. वाटेत कोणी विद्यार्थी ग्राहक म्हणून मिळतो का, ते पाहात. हे लक्षात आल्यानंतर आम्ही आठ दहा जणांनी त्यांना चांगले दमात घेऊन पळवून लावले, त्यांची दारु रस्त्यावर ओतून दिली आणि पुन्हा कामाला सुरवात केली. थोड्या वेळाने तेथून कुलगुरू डॉ. पवार निघाले असताना त्यांना तो वास आला. विद्यार्थ्यांना विचारले असता, त्यांनी घडला प्रकार सांगितला. तेव्हा आप्पासाहेबांनी दोन वॉचमन त्या समाजाच्या वस्तीकडे पाठविले आणि त्यांनी पुन्हा असे केल्यास पोलिसांत देण्याची धमकी दिली. त्यावर ते बांधव, त्यांच्या घरातील महिला आणि मुले गयावया करू लागली. ही बाब वॉचमननी साहेबांच्या कानी घातली. तेव्हा या समाजाची चांगल्या शिक्षणाअभावी आणि रोजगाराअभावी परवड होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या लोकांना बोलावले, त्यांच्यासह त्यांच्या घरातील महिलांना उद्यमनगरात रोजगार मिळवून दिला. त्याचप्रमाणे भवनच्या विद्यार्थ्यांवर त्यांच्या मुलांना शिकविण्याची जबाबदारी दिली. शालाबाह्य कंजारभाट समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आप्पासाहेबांनी केलेल्या या धडपडीमुळे समोरच्याचा सकारात्मक विचार करण्याची शिकवण आपोआपच आमच्यात रुजली, असेही ते म्हणाले.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, विद्यार्थी भवनच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पूर्वसुरींच्या अनुभवातून कृतीशील होण्याचा आदर्श घ्यावा. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श घेऊन आप्पासाहेबांनी विद्यापीठात कमवा व शिका योजनेची सुरवात केली, त्यामागे विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण देण्याचा हेतू होताच, पण त्या बरोबरीने कौशल्य विकास, आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वासाची पेरणीही त्यांनी केली. आप्पासाहेब हे विद्यापीठासाठी दीपस्तंभ होतेच, पण त्यांनी या समाजाला अनेक दीपस्तंभ निर्माण करून दिले, ज्यांनी समाजाला ज्ञान, दिशा, प्रकाश आणि आत्मविश्वास प्रदान केला. कमवा व शिका योजनेतील मुलींसाठी भवनच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त वसतिगृह उभारण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याची ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली. त्याचप्रमाणे भवनच्या माजी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता निधी उभारून त्या माध्यमातून येथे विविध उपक्रम राबवावेत, तसेच भवनमध्ये शिकून बाहेर पडलेल्या ५० निवडक व्यक्तींच्या चरित्रांचा समावेश असणारे पुस्तक तयार करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
अध्यक्षीय भाषणात कुलसचिव डॉ. नांदवडेकर म्हणाले, डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या चरित्रातून आपल्याला चांगल्या गोष्टींसाठी आग्रही राहण्याचा आदर्श मिळतो. विद्यार्थी भवनने अनेक गुरूवर्य घडविले, म्हणून तळागाळातील विद्यार्थी शिक्षण घेऊ शकले. डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम येत्या चार महिन्यांत पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी भवनचे अधीक्षक डॉ. संभाजी शिंदे, डॉ. सी.टी. पवार, प्रा. जी.एस. हिरेमठ, प्रा. सुदाम पाटील, निवृत्त वेल्फेअर आयुक्त अंकुश मोरे, प्रा. शितोळे आदींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रबोधिनीचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. एस.जे. नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्राचार्य जी.पी. माळी यांनी परिचय करून दिला. योगेश घाडेकर व सुप्रिया सोहोनी यांनी सूत्रसंचालन केले. प्रबोधिनीचे सचिव प्रा. टी.के. सरगर यांनी आभार मानले.
तत्पूर्वी, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते विद्यार्थी भवन परिसरात वृक्षारोपण व सुवर्णमहोत्सवी फलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच, विद्यापीठ प्रांगणातील डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या पुतळ्यांना कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, प्राचार्य मानसिंग जगताप, प्रा. अशोक जगताप, अधिष्ठाता डॉ. ए.एम. गुरव यांच्यासह अनेक शिक्षक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, 21 December 2019

भारतीय समाजशास्त्र संस्थेच्या सचिवपदी

डॉ. जगन कराडे यांची निवड



Dr. Jagan Karade
कोल्हापूर, दि. २१ डिसेंबर: देशातील समाजशास्त्रज्ञांची शिखर संस्था असलेल्या अत्यंत प्रतिष्ठित अशा भारतीय समाजशास्त्र संस्थेच्या (इंडियन सोशियॉलॉजीकल सोसायटी, नवी दिल्ली) सचिवपदी शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागाचे प्रमुख प्रा.डॉ. जगन कराडे यांची निवड झाली आहे. या पदावर निवड होणारे ते अवघे दुसरे महाराष्ट्रीय आहेत. त्यांच्या या निवडीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
भारतीय समाजशास्त्र संस्थेचे भारतासह जगभरात सुमारे पाच हजार सदस्य आहेत. संस्थेच्या सचिव पदासाठी लखनौ विद्यापीठातील प्रा.डॉ. सुकांत चौधरी आणि डॉ. कराडे यांच्यात निवडणूक झाली. यामध्ये डॉ. कराडे ५४६ विरुद्ध ५०६ मतांनी विजयी झाले. ही निवड दोन वर्षांसाठी आहे. महाराष्ट्रातून यापूर्वी माजी कुलगुरू डॉ. उत्तमराव भोईटे यांनी संस्थेचे सचिवपद भूषविले आहे. त्यांच्यानंतर या पदी निवड झालेले डॉ. कराडे दुसरेच महाराष्ट्रीय आहेत.
डॉ.कराडे यांचे राष्ट्रीय आणि आंतराराष्ट्रीय पातळीवर अकरा संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. यातील दोन ग्रंथ केंब्रीज स्कॉलर पब्लिकेशन, लंडन येथून प्रकाशित झाले आहेत. महाराष्ट्रात कार्यरत मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले आहे. इंडियन सोशिओलॉजीकल सोसायटी या संस्थेच्या व्यवस्थापन समितीचेही ते सदस्य आहेत. त्यांनी व्हिएन्ना (ऑस्ट्रिया), टोरोंटो (कॅनडा) व तैपेई (तैवान) येथे झालेल्या आंतराराष्ट्रीय परिषदांमध्येही सहभागी होऊन त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत. टोरोंटो आंतराराष्ट्रीय परिषदे डब्ल्यूजी-०५ (फॅमिनियन अँड सोसायटी) या संशोधन समितीच्या २०१८ ते २०२२ या कालावधीकरिता संशोधन समिती कार्यकारिणीवर सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत. शिवाजी विद्यापीठात नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजशास्त्र परिषदेचे डॉ. कराडे यांनी अत्यंत यशस्वी आयोजन केले. या परिषदेत आठ माजी कुलगुरूंसह जगभरातून सुमारे २५० समाजशास्त्रज्ञ सहभागी झाले.
डॉ. कराडे यांच्या निवडीबद्दल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी अभिनंदन केले आहे.

शिव पावन परिक्रमा पर्यटनासाठी नव्हे; तर प्रेरणेसाठी: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

विद्यापीठाच्या पन्हाळा-पावनखिंड शिव पावन प्रेरणा परिक्रमेस प्रारंभ




शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा-पावनखिंड शिव पावन प्रेरणा परिक्रमेत सहभागींसमवेत संवाद साधताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत प्राचार्य डॉ. एस.आर. पाटील, डॉ. पी.टी. गायकवाड, डॉ. डी.के. गायकवाड आदी.

कोल्हापूर, दि. २१ डिसेंबर: शिव पावन परिक्रमा ही पर्यटनासाठी नसून प्रेरणेसाठी आहे. सहभागींनी या परिक्रमेतून आयुष्यभरासाठीचा प्रेरणेचा स्रोत स्वतःसोबत घेऊन जावे, हाच यामागील उद्देश आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय पन्हाळा ते पावनखिंड शिव पावन प्रेरणा परिक्रमेच्या प्रारंभ प्रसंगी पन्हाळा येथे ते बोलत होते. आज सकाळी ७.३० वाजता पन्हाळा येथील बाजीप्रभू देशपांडे व वीर शिवा काशीद यांच्या पुतळ्यांचे दर्शन घेऊन सुरू झालेल्या या मोहिमेची सांगता उद्या सायंकाळी ६.३० वाजता पावनखिंड येथे होणार आहे.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, तत्कालीन परिस्थितीमध्ये कोणत्याही दळणवळणाच्या साधनांअभावी, विजेच्या सुविधेअभावी निव्वळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यावरील निष्ठेपोटी बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशीद यांनी आपली प्राणाहुती दिली. त्यांची निष्ठा आणि त्यांचे कार्य इतिहासात अमर झाले. महाराजांनीही पुढे स्वराज्याचे तोरण बांधले. आदिलशाही नजरकैदेतून, कडेकोट पहाऱ्यांमधून मोठ्या दिलेरपणाने आपली सुटका करवून घेत महाराजांनी पन्हाळ्यावरुन विशाळगडाकडे कूच केले. जनतेचा हा पोशिंदा सुखरूप विशाळगडी पोहोचावा, म्हणून या दोन नरवीरांनी आपल्या जीवाची बाजी लावली आणि स्वराज्यासाठी प्राण त्यागले. हा सारा इतिहास या दोन दिवसांच्या परिक्रमेमध्ये प्रत्येक सहभागीच्या मनामनांत जागला पाहिजे. ही परिक्रमा म्हणजे पर्यटन नव्हे, तर याच प्रेरणेचा झरा आणि ऊर्जेचा स्रोत आपल्यामध्ये जागृत करण्याची संधी म्हणून विद्यार्थ्यांनी, स्वयंसेवकांनी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पाहिले पाहिजे. त्यासाठीच या मोहिमेचे आयोजन केले आहे, असेही त्यांनी सांगितले.
या परिक्रमेत राष्ट्रीय सेवा योजन समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, प्राचार्य डॉ. एस.आर. पाटील, प्रा. पोपट माळी यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांमधून राष्ट्रीय सेवा योजनेचे सुमारे दीडशे स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या परिक्रमेअंतर्गत ऐतिहासिक माहिती घेण्याबरोबरच परिक्रमा मार्गावर स्वच्छता मोहिम तसेच शाहीरी पोवाडा आदी प्रबोधन कार्यक्रमही घेण्यात येणार आहेत.  


Thursday, 19 December 2019

शहीद चौगुले यांच्या कुटुंबियांचे

कुलगुरू शिंदे यांचेकडून सांत्वन



उंबरवाडी (ता. गडहिंग्लज) येथील शहीद जोतिबा चौगुले यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

कोल्हापूर, दि. १९ डिसेंबर: उंबरवाडी (ता. गडहिंग्लज) येथील हुतात्मा जवान जोतिबा चौगुले यांच्या कुटुंबियांची शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. या कुटुंबियाला सावरण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या शहीद स्फूर्ती केंद्राच्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असा दिलासा कुलगुरू डॉ. शिंदे यांनी यावेळी दिला.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी विद्यापीठाच्या शहीद स्फूर्ती केंद्राचे समन्वयक डॉ. आर.व्ही. शेजवळ यांच्यासह काल सायंकाळी उंबरवाडी येथे जाऊन शहीद चौगुले यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. वीरपिता गणपती चौगुले, माता सौ. वत्सला, वीरपत्नी श्रीमती यशोदा, भाऊ रजत यांच्यासह चौगुले कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन केले.
तीन वर्षांपूर्वी मेजर संतोष महाडिक शहीद झाले, त्यावेळी शिवाजी विद्यापीठातर्फे सातारा येथे शहीद स्फूर्ती केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्रामार्फत शहीद जवानांच्या कुटुंबियांना सावरण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे सहाय्य करण्यात येते. शहीदाच्या मुलांना शालेय शिक्षण अथवा महाविद्यालयीन शिक्षणासाठी स्थानिक संस्थांशी संवाद साधून मोफत शिक्षण सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातात. कुटुंबियांना नोकरी उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न केले जातात. या कुटुंबियांशी एनसीसी तसेच अन्य विद्यार्थ्यांचा संवाद घडवून राष्ट्रप्रेम, मूल्यविचार आणि समर्पण भावना यांचा विकास करण्यासाठी प्रेरित केले जाते. याच धर्तीवर चौगुले कुटुंबियांनाही केंद्रामार्फत दिलासा व सहकार्य करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले.

Tuesday, 10 December 2019

राजकीय लोकशाही ही आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीवर अवलंबून - डॉ.सुखदेव थोरात


      
कोल्हापूर, दि.10 डिसेंबर - राजकीय लोकशाही ही आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीवर अवलंबून असते.समाजामधील गरीबांनाही लोकशाही प्रणालीमध्ये भाग घेण्यासाठी सध्याच्या प्रणालीमध्ये योग्य ते बदल करणे आवश्यक आहे. परदेशांमध्ये असे बदल अवलंबीले जात आहेत, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोग भारतीय सामाजिक शास्त्रे संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ.सुखदेव थोरात यांनी आज येथे केले.


          शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागामार्फत अधिविभागाच्या सुवर्णमहोत्सव वर्षाचे औचित्य साधून रशियन सोशिओलॉजिकल सोसायटी, साऊथ अफ्रीकन सोशिओलॉजिकल सोसायटी, एशिया क्लायमेंट चेंज एज्युकेशन सेंटर, साऊथ कोरिया, इंटरनॅशनल सोशिऑलॉजीकल सोसायटी आणि इंडियन सोशिऑलॉजीकल सोसायटी यांच्या सहकार्याने विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सिनेट सभागृहामध्ये 'समाज : पुनर्रचना, प्रतिक्रिया आणि जबाबदारी' या विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना डॉ.थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के होते. यावेळी, भारतीय समाजशास्त्र परिषदेचे सचिव डी.आर.साहू, कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर, सामाजिकशास्त्र शाखेच्या अधिष्ठाता डॉ.भारती पाटील, विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.पी.एस.पाटील, ज्येष्ठ विचारवंत डॉ.भारत पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
          डॉ. थोरात पुढे म्हणाले, समाजामध्ये समानता मिळविण्याच्या प्रयत्नांमध्ये प्रत्येकास समान संधी आहे. त्यासाठी समान अधिकार मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणे आवश्यक आहे.  राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये समानता आणि स्वातंंत्र्य याबाबत अगदी स्पष्टपणे लिहिलेले आहे.  त्यामुळे समान नागरी हक्क, समान राजकीय अधिकार, समान मूलभूत अधिकर लोकांना देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.  समाजामध्ये निर्माण झालेली आर्थिक दरी कमी करण्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजेत, यासाठी गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे. राज्यकर्त्यांच्या आणि शासनाच्या माध्यमातून समाजाची आर्थिक उन्नती होण्यासाठी निश्चित धोरण तयार करण्याची मोठी जबाबदारी ही समाजशास्त्रज्ञांची आहे.
          अध्यक्षीय मनोगतामध्ये विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्क म्हणाले, समाजाच्या प्रगतीमध्ये भरीव योगदान देण्यासाठी शैक्षणिक संस्थांना, अध्यापन आणि संशोधनाच्या माध्यमातून प्रयत्न करणे गरजेचे आहे.
याप्रसंगी ज्येष्ठ संशोधक मानवी हक्क कार्यकर्त्या डॉ.गेल ऑम्वेट, भारतीय समाजशास्त्र परिषदेच्या अध्यक्षा डॉ.आर.इंदिरा आणि भारती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.उत्तमराव भोईटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तत्पूर्वी, परिषदेचे उद्धाटन ज्येष्ठ संशोधक प्रा.गेल ऑम्वेट यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले.
परिषदेचे संचालक समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ.जगन कराडे यांनी स्वागत प्रास्ताविक केले, तर डॉ.प्रल्हाद माने यांनी आभार मानले.  प्रतिक्षा मांगलेकर यांनी सुत्रसंचलन केले.  या परिषदेमध्ये माजी कुलगुरू डॉ.विद्युत जोशी, डॉ.हरी बाबू, हेमिक्सा राव, के.एल.शर्मा, डॉ.परमजित सिंग, डॉ.विजय खरे, डॉ.बी.के.नागला यांचेसह इंडोनेशियायेथील डॉ.अहमद दिरवण, युफी ॲडरॅनी, स्विर्झलैंडमधील जॅडे ग्रेस आणि चार्ले टर्नर, फिलीपाईन्समधील अर्जेल मसंदा, साऊथ कोरियामधील जॉग, दक्षिण अफ्रिका येथील जयंथन गावेंडर, किरण ओढाव आणि सायमन मॅपडार्‌इंग यांसह देशभरातून आलेले ज्येष्ठ सामाजिक विचारवंत उपस्थित होते. तसेच, यावेळी माजी विभागप्रमुख डॉ.एस.एन.पवार, डॉ.जे.बी.आंबेकर, डॉ.आर.बी.पाटील यांचेसह सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थींनी अणि संशोधक विद्यार्थी मोठयाप्रमाणावर उपस्थित होते.
-----