Sunday, 14 April 2019

बाबासाहेबांविषयीचे आकलन सातत्याने वृद्धिंगत करण्याची गरज: संजय आवटे





शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

कोल्हापूर, दि. १४ एप्रिल: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा एक व्यापक विचार आहे. त्यांच्याविषयीचे आपले आकलन जिथे संपते, तिथे खरे बाबासाहेब सुरू होतात. त्यामुळे त्यांच्याविषयीचे आकलन सातत्याने वृद्धिंगत करीत राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार-संपादक संजय आवटे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर- आजच्या संदर्भात या विषयावर श्री. आवटे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.

Sunjay Awate
श्री. आवटे म्हणाले, आजच्या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून घेत असताना त्यांनी भारताला भारत म्हणून, एक एकसंघ देश म्हणून ज्या पद्धतीने उभे केले, तो वारसा समजून घेतला पाहिजे. हे बाबासाहेब ज्याला समजतात, तोच पुढे खरा भारतीय होतो, सच्चा माणूस होतो, हे लक्षात घ्यायला हवे. जगभरातले राजकीय विचारवंत भारत हा एक राष्ट्र म्हणून उभाच राहू शकत नाही, अशा स्वरुपाची मांडणी करीत असताना बाबासाहेबांनी मात्र त्याला उभेही केले आणि त्याचे खणखणीत अस्तित्व निर्माणही केले. त्यांनी या देशातल्या प्रत्येक नागरिकाला मताधिकार प्रदान केला. मात्र, हा अधिकार अगदी सहजतेने मिळाल्यामुळे त्याचे मोल आपल्याला कळले नाही, कळत नाही. त्यामागची बाबासाहेबांची भूमिका समजून घ्यायला हवी. या देशातल्या निरक्षर माणसांमधील अंगभूत शहाणपणावरचा त्यांचा विश्वास अनाठायी नव्हता, हे पुढे दिसून आले असले तरी आताच्या परिस्थितीत हे शहाणपण पुनःपुन्हा तपासून पाहण्याचीही गरज आहे.
श्री. आवटे पुढे म्हणाले, लोकशाही टिकण्यासाठी, सुदृढ होण्यासाठी संविधान सभेतील ऐतिहासिक भाषणात बाबासाहेबांनी अत्यंत महत्त्वाची चतुःसूत्री दिलेली आहे. यामध्ये समतेचा पुरस्कार, विरोधी पक्षांचे महत्त्व, सारासारविवेकबुद्धी आणि संवैधानिक नैतिकता यांचा समावेश होतो. या चतुःसूत्रीचे सध्याच्या भोवतालात किती आणि कसे स्थान आहे, याचे आकलन करून घेणे आवश्यक आहे. एक वारसा म्हणून आपल्या नेतृत्वाचे आकलन करवून घेत असताना त्यांना सुटे सुटे करणे चुकीचे आहे. गांधी, नेहरू, आंबेडकर या त्रयींना एकत्रित समजून घेणे, त्यांचा अभ्यास करणे ही काळाची गरज आहे. राजकीय प्रक्रियेपासून केवळ अस्मिता म्हणून बाबासाहेब वेगळे काढण्याचा प्रयत्न केल्यास बाबासाहेबांचे अपहरण सातत्याने होतच राहणार, असा इशाराही आवटे यांनी यावेळी दिला.
बाबासाहेब म्हणजे एकाच हयातीत एक राज्यघटना जाळून दुसरी निर्माण करणारे पराक्रमी महापुरूष होते. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते फुले, शाहू, आंबेडकरांचा सच्च्या राष्ट्रवादाचा आणि लोकशाहीचा वारसा आपण अभिमानाने मिरविला पाहिजे, असे आवाहनही आवटे यांनी यावेळी केले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन हा ग्रंथप्रेमाचा अद्भुत नमुना आहे. ज्ञानाच्या क्षेत्रात वावरणाऱ्या सुजाण नागरिकांनी तरी आपली ग्रंथालये समृद्ध करण्यावर तसेच वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यावर भर देण्याची गरज आहे.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, शोषित, वंचित समाजात आत्मोन्नतीचे स्फुल्लिंग चेतविणारे बाबासाहेब यांच्या विचार व कार्यातून माणूस होण्याचेच धडे आपल्याला मिळतात. या देशातल्या प्रत्येक नागरिकाला भारतीय ही ओळख मिळवून देण्याचे महान कार्य त्यांनी केले. त्यांचा हा वारसा अखंडित प्रवाहित ठेवण्याची जबाबदारी आपण सर्वांनी पेलली पाहिजे. फुले, शाहू, आंबेडकर ही वेगवेगळी व्यक्तीमत्त्वे नसून समतेच्या विचारांचा तो अखंड प्रवाह आहे. ज्या चिरंतन मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी त्यांनी हयात वेचली, त्यांची प्रस्थापना करण्यासाठी प्रतिबद्ध होणे, हीच आजची खरी गरज आहे.
कार्यक्रमाच्या सुरवातीला शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, इनोव्हेशन व इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. आर.के. कामत, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जे.एस. बागी, आंबेडकर सेंटरचे संचालक डॉ. एस.एस. महाजन, शाहीर आझाद नायकवडी यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, शहरातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. एस.एस. महाजन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. आर.व्ही. गुरव यांनी आभार मानले.


Friday, 12 April 2019

जागतिक पर्यावरणाच्या संवर्धनासाठी

खारफुटीचे संरक्षण अत्यावश्यक: डॉ. उंटावळे

शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागात आयोजित राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना डॉ. ए.जी. उंटावळे यांच्यासह कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, डॉ. श्रीमती व्ही. डी. जाधव, डॉ. एस.एस. कांबळे, डॉ. डी.के. गायकवाड व डॉ. श्रीमती एन.एस. चव्हाण. 

शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागात आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करताना डॉ. ए.जी. उंटावळे, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत (डावीकडून) डॉ. श्रीमती व्ही. डी. जाधव, डॉ. श्रीमती एन.एस. चव्हाण, डॉ. डी.के. गायकवाड व डॉ. एस.एस. कांबळे.


वनस्पतीशास्त्र विभागात राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

Dr. A.G. Untawale
कोल्हापूर, दि. १२ एप्रिल: जागतिक पर्यावरणाच्या संवर्धनासाठी खारफुटीचे संरक्षण व संवर्धन अत्यावश्यक बाब आहे. तसे न झाल्यास मानवी अस्तित्वासाठी ते मारक ठरणार आहे, असे प्रतिपादन मॅनग्रोह्व्ज सोसायटी ऑफ इंडियाचे कार्यकारी सचिव डॉ. ए.जी. उंटावळे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागातर्फे मॅनग्रोह्व्ज अॅन्ड कोस्टल रिसोर्सेस या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. नीलांबरी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
डॉ. उंटावळे यांनी आपल्या व्याख्यानात खारफुटीच्या संदर्भातील अनेक तथ्यांचा वेध घेतला आणि तिचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, पर्यावरणाच्या दृष्टीने खारफुटीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. केवळ सागरी जल पर्यावरणाबरोबरच इतर पर्यावरणाच्या दृष्टीनेही त्याचे मोठे महत्त्व आहे. निसर्गातील अतिरिक्त कार्बन शोषून घेण्याची अन्य वनस्पतींच्या तुलनेत खारफुटीची क्षमता अधिक असते. त्याचप्रमाणे सागराला जमिनीवर अतिक्रमणापासून रोखणारी ती नैसर्गिक भिंत आहे. पायाभूत सुविधा निर्माणाच्या नावाखाली खारफुटीचा होत असलेला ऱ्हास अंतिमतः मानवी अस्तित्वाच्याच मुळावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खारफुटीचे संरक्षण व संवर्धन यासाठी शासकीय, शैक्षणिक, संशोधकीय तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या स्तरांवरही प्रयत्न व जनजागृतीची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, खारफुटीच्या प्रश्नासंदर्भात शिवाजी विद्यापीठाने केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावरही मोठे योगदान दिले आहे. विद्यापीठाच्या संशोधकांनी संशोधन व जनजागृती यासाठी काम केले आहे. भारताला सुमारे ७२०० किलोमीटरचा लाभलेल्या सागरी किनाऱ्याच्या नैसर्गिक संरक्षणासाठी खारफुटीचे महत्त्व खूप आहे. त्याच्या संरक्षण व संवर्धनासाठी मॅनग्रोह्व्ज सोसायटी ऑफ इंडियाच्या सहकार्याने शिवाजी विद्यापीठ सक्रिय योगदान देण्यासाठी सदैव तत्पर आहे. या खारफुटीच्या संदर्भात संस्थेने चालविलेल्या कार्याबद्दल कुलगुरूंनी डॉ. उंटावळे आणि संस्थेमधील सर्वच घटकांचेही अभिनंदन केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी घालून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. परिषदेची स्मरणिका व मंगलवन या विशेषांकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. श्रीमती एन.एस. चव्हाण यांना खारफुटीसंदर्भातील संशोधनाबद्दल ‘फेलोशीप ऑफ मॅनग्रोव्ह्ज सोसायटी ऑफ इंडिया हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अधिविभाग प्रमुख डॉ. डी.के. गायकवाड यांनी स्वागत, डॉ. (श्रीमती) एन.एस. चव्हाण यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. एस.एस. कांबळे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. एस.आर. यादव, डॉ. जी.बी. दीक्षित, डॉ. एन.बी. गायकवाड यांच्यासह शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, 1 April 2019

विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रासाठी

‘सोक्टास’कडून दोन लाख रुपयांचा निधी



कोल्हापूर, दि. १ एप्रिल: शिवाजी विद्यापीठाने कौशल्य विकासाच्या अनुषंगाने चालविलेले कार्य महत्त्वाचे असून त्याला अधिक चालना देण्यासाठी सोक्टासकंपनीच्या व्यावसायिक सामाजिक दायित्वाच्या अंतर्गत दोन लाख रुपयांचा निधी विद्यापीठास प्रदान करताना अत्यानंद होतो आहे, अशी भावना कागल येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील सोक्टास इंडिया प्रा. लि. या कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सदानंद गुप्ता यांनी येथे व्यक्त केली.
सोक्टास कंपनीतर्फे व्यावसायिक सामाजिक दायित्वाच्या अंतर्गत विद्यापीठाच्या कौशल्य व औद्योगिक विकास केंद्रासाठी दोन लाख रुपयांच्या निधीचा धनादेश कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्याचा कार्यक्रम आज विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते.
श्री. गुप्ता म्हणाले, सामाजिक दायित्वाच्या भावनेतून उद्योगाकडून देण्यात येणारा निधी योग्य हातांत पडून त्याचा योग्य विनियोग व्हावा, अशी कंपनीची भावना आहे. त्यातूनच विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रामार्फत युवकांसाठी राबविण्यात येणारे अनेक उपक्रम पाहण्यात आले. केंद्र सरकारच्या स्कील इंडिया या उपक्रमांतर्गत अनेक उपक्रम विद्यापीठाकडून राबविण्यात येतात. त्याला मदत म्हणून आम्ही ही मदत विद्यापीठाला देण्याचे ठरविले.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, सोक्टास कंपनीने अत्यंत विश्वासाने विद्यापीठाला हे अर्थसाह्य केले आहे. त्याचा विनियोग कौशल्य विकास केंद्रातर्फे योग्य कारणांसाठी केला जाईल. अशा प्रकारे व्यावसायिक सामाजिक दायित्वाच्या सहाय्याने स्कील ऑन व्हील्ससारख्या विविध उपक्रमांची व्याप्ती वाढविणे शक्य आहे. त्या दृष्टीनेही प्रयत्न करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
यावेळी अधिष्ठाता व कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. यावेळी वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. पी.एस. पाटील, डॉ. भारती पाटील, इनोव्हेशन व इनक्युबेशन केंद्राचे समन्वयक डॉ. आर.के. कामत, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांच्यासह कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते.