Tuesday 11 May 2021

विद्यापीठात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त

रामन स्पेक्ट्रोमीटरचे ऑनलाईन प्रशिक्षण


कोल्हापूर, दि. ११ मे: शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त सुविधा केंद्रातर्फे (कॉमन फॅसिलिटी सेंटर) राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त रामन स्पेक्ट्रोमीटर वापराबाबत विशेष ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. 

रामन स्पेक्ट्रोमीटर हे पदार्थ विश्लेषणात्मक अभ्यासासाठी एक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान आहे. अधिविभागातील संशोधक विद्यार्थ्यांना याविषयी सखोल ज्ञान मिळावे याउद्देशाने प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाअंतर्गत रेनिशॉ युके सेल्स लिमिटेडचे अभियंते युवराज पाटील यांनी बेंगलोर येथून संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. युवराज पाटील यांनी उपकरणाची रचना, कार्यपद्धती याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच, पदार्थविज्ञान अभ्यासाच्या दृष्टीने उपकरण अधिक प्रभावीपणे कसे वापरता येईल, यासंदर्भात मार्गदर्शन केले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठ व अधिविभाग बंद असताना विद्यार्थ्यांची संशोधकीय मानसिकता विचलित होऊ नये, यासाठी अशा सहज आणि मूलभूत उपक्रमांचे महत्त्व ओळखत विद्यापीठाने आयोजन केल्याबद्दलही त्यांनी कौतुक केले. या दोन दिवसीय प्रशिक्षणाचा लाभ कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि  सोलापूर येथील विद्यार्थ्यांनीही घेतला. या प्रशिक्षणाचे आयोजन सीएफसी विभागप्रमुख डॉ. आर. जी. सोनकवडे यांनी केले.

भारताचे तीन महत्त्वाचे विज्ञान दिवस

भारताचे महान भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी रामन इफेक्टचा शोध लावला. त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. ३० ऑक्टोबर १९०९ हा भारताचे आण्विक शिल्पकार डॉ. होमी भाभा यांचा जन्मदिवस. तसेच, डॉ कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली ११ मे १९९८ रोजी पोखरण येथे भारताने दुसरी अणुचाचणी यशस्वी केली. भारताच्या वैज्ञानिक वाटचालीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या अशा या तीन घटनांच्या सन्मानार्थ देशभरात २८ फेब्रुवारी रोजी 'राष्ट्रीय विज्ञान दिवस', ३० ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय 'शास्त्रज्ञ दिवस' तर ११ मे रोजी 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस' साजरा केला जातो.


No comments:

Post a Comment