Saturday 1 May 2021

‘महाराष्ट्र दिन विशेष’ मुलाखत:

महाराष्ट्राकडून सदैव देशाचे ज्ञाननेतृत्व: डॉ. प्रकाश पवार

 

डॉ. प्रकाश पवार

('महाराष्ट्राच्या भवितव्याची दिशा' या मुलाखतीची ध्वनीचित्रफीत)


कोल्हापूर, दि. १ मे: महाराष्ट्राने सदैव देशाचे ज्ञाननेतृत्व केले आहे. देशाच्या सत्तेचा मार्ग हा उत्तरेतून जातो, असे म्हटले जाते; मात्र, देशाच्या ज्ञानाचा महामार्ग हा आजही महाराष्ट्रातूनच जातो, असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विचारवंत डॉ. प्रकाश पवार यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१व्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या शिव वार्ता या युट्यूब वाहिनीला महाराष्ट्राच्या भवितव्याची दिशा या विषयावर दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी ही मुलाखत घेतली.

डॉ. प्रकाश पवार म्हणाले, राष्ट्रीय पातळीवर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते शरद पवार यांच्यापर्यंत महाराष्ट्राने सुसंस्कृत व अभ्यासू नेतृत्वगुणांची छाप पाडली आहे. तथापि, केंद्रीय स्तरावर महाराष्ट्रातील नेतृत्व मोठ्या प्रमाणावर दिसत नाही, याचे प्रमुख कारण म्हणजे उत्तरेकडे उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, जम्मू-काश्मीर आदी मोठी राज्ये आहेत. त्यांच्या लोकसभेतील जागा अधिक आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास उत्तर ही मागास तर दक्षिण ही प्रगत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह दक्षिणेकडे अनेक चळवळी उदयास आल्या. त्यांनी देशाला सामाजिक, सांस्कृतिक चेहरा देण्याचे काम केले. म्हणजे एकीकडे केंद्रीय सत्तेचा मार्ग उत्तरेतून जात असला तरी अंतिमतः ज्ञानाचा मार्ग मात्र महाराष्ट्रातूनच जातो. आजही हे नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. प्रसंगी आपली विचारसरणी बाजूला ठेवून मानवी जीवनातील समस्या सोडविण्यासाठी धावून जाण्याची वृत्ती आजही महाराष्ट्राच्या नेतृत्वात आहे. कोरोनाच्या काळातला लॉकडाऊनचा पॅटर्न महाराष्ट्राने देशाला दिला. केरळ पॅटर्न हा कमी घनतेच्या प्रदेशासाठी होता; मात्र, लोकसंख्येची दाटी असलेल्या बड्या शहरांमध्ये संसर्ग आटोक्यात आणण्याचा पॅटर्न महाराष्ट्र देऊ पाहतो आहे. तो केंद्राने व्यापक हिताच्या दृष्टीकोनातून निरपेक्ष भावनेने स्वीकारण्याची गरज आहे.

डॉ. पवार पुढे म्हणाले, केवळ राज्यांतर्गतच नव्हे; तर देशपातळीवरील राज्य-प्रांताशी महाराष्ट्राचे दृढ सांस्कृतिक बंध ऐतिहासिक काळापासून निर्माण झालेले आहेत. येथील समृद्धीमुळे येथे बहुभाषिक, बहुसांस्कृतिकतेचा विकास या भूमीत झाला आहे. त्यातून येथे एक वैचारिक, सांस्कृतिक प्रगल्भता निर्माण झाली आहे. राजकारणनिरपेक्ष भाषिक, सांस्कृतिक सलोख्याचे दर्शन येथे त्यामुळेच घडते.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना कार्य करण्याचे, त्यांचे निर्णय त्यांच्या पातळीवर घेण्याचे स्वातंत्र्य प्रदान करण्याची आजघडीला मोठी गरज असल्याचे सांगून डॉ. पवार म्हणालेबळवंतराय मेहता, वसंतराव नाईक आदींच्या प्रयत्नांमुळे सन १९६२ ते १९७०च्या कालखंडात केंद्र, राज्य, प्रांत ही राजकारणाची केंद्रे होती, तर स्थानिक स्वराज्य संस्था या जिल्हा, तालुका, गाव पातळीवरील निर्णय घेणाऱ्या व्यवस्था होत्या. सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे आमच्या गावात, आमचेच सरकार ही भावना सर्वदूर दृढमूल झालेली होती. मात्र, काळाच्या ओघात या संस्था निधी वाटप करणाऱ्या मध्यस्थ यंत्रणा बनून राहिल्या आहेत. त्यातून त्यांना बाहेर काढून पुनश्च स्वतंत्रपणे काम करण्याची, निर्णय घेण्याची संधी मिळावी, ही महाराष्ट्राच्या ६१व्या वर्धापन दिनाची मागणी आहे. ती पूर्ण करण्याची आज गरज आहे.

महाराष्ट्र विविध क्षेत्रांत प्रगतीपथावर असला तरी संसाधनांच्या उपलब्धतेसह भौगोलिक, शैक्षणिक, औद्योगिक आदी स्वरुपाच्या अनेक विषमताही येथे आहेत. त्यामुळे निर्माण होणारी सामाजिक विषमतेची दरी सांधली तर या प्रगतीची दिशा अधिक उज्ज्वल असणार आहे. त्या दिशेने घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाची महाराष्ट्राला खरी गरज आहे, असेही ते म्हणाले.

ही सविस्तर मुलाखत शिवाजी विद्यापीठाच्या शिव वार्ता या युट्यूब वाहिनीवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.


No comments:

Post a Comment