कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के |
कोल्हापूर, दि. १ मे: कोरोना साथीच्या कठीण प्रसंगात विद्यापीठाशी संबंधित
सर्वच घटकांनी शासनामार्फत वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या निर्देशांचे काटेकोर
पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी.
शिर्के यांनी आज येथे ऑनलाईन पद्धतीने बोलताना केले.
कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सकाळी आठ वाजता सर्व संबंधित घटकांना विद्यापीठाच्या ‘शिव वार्ता’ या युट्यूब वाहिनीद्वारे संबोधित केले आणि ६१व्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१वा वर्धापनदिन साधेपणाने करण्याबाबत तसेच जिल्हास्तरावर एकाच ठिकाणी शासकीय ध्वजवंदन करण्यात यावे, असे निर्देश जारी केले आहेत. यामुळे शिवाजी विद्यापीठ प्रशासनातर्फे दरवर्षी सकाळी आठ वाजता होणारा ध्वजवंदन समारंभ यंदा स्थगित केला. त्याऐवजी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी ऑनलाईन स्वरुपात शुभेच्छा दिल्या.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यापीठाने २२ मार्चपासून ऑनलाईन स्वरुपात
परीक्षा घेण्यास सुरवात केली आहे. विद्यार्थी त्यांना सामोरे जात आहेत. याउपरही
ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणींमुळे ऑनलाईन परीक्षा देता येऊ शकत नसेल, अशा
विद्यार्थ्यांची परीक्षा कोरोना साथीचे वातावरण निवळण्यानंतर ऑफलाईन स्वरुपात
घेण्यात येईल. सद्यस्थितीत मात्र सर्वांनी शासन व प्रशासन यंत्रणांना कोरोनाविषयक
नियमांचे काटेकोर पालन करून पूर्णपणे सहकार्य करावे.
No comments:
Post a Comment